छोट्या गोष्टीतील बारकावा

      अनेकदा असे वाटते की छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे त्या कशाही केल्या अथवा थोडेफार दुर्लक्ष झाले तरीदेखील काही फरक पडत नाही.  परंतु असे नाही. इंग्लिश भाषेतील एक जुनी कविता आहे.

For want of a nail the shoe was lost; For want of a shoe the horse was lost; 

For want of a horse a rider was lost; for want of a rider a battle was los;

For want of a battle a kingdom was lost;

And all this was for a want of a nail.

    अर्थात घोड्याच्या नालेच्या खिळ्यासारख्या छोट्या गोष्टीकडे वेळेवर लक्ष न दिल्याने राज्य लयास गेले. मोठी माणसे त्यांच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे अतिशय बारकाईने लक्ष देतात आणि म्हणूनच ते आयुष्यात मोठ्या भव्य गोष्टी करू शकतात.

                 प्रख्यात कलाकार, नाट्य दिग्दर्शक कै. विजयाबाई मेहता यांनी त्यांच्या 'झिम्मा' या आत्मचरित्रात एक प्रसंग सांगितला आहे. मुंबईमध्ये टाटा ग्रुप यांच्यावतीने 'नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ची' (NCPA) स्थापना करण्यात आली. त्यासाठी एक सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्यात आले. त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नाटक सादर करण्याची कामगिरी विजयाबाई यांना सोपविण्यात आली होती. उद्घाटनाच्या आधी विजयाबाई सर्व कलाकारांना घेऊन त्या नाट्यगृहात तालीम करत होत्या. याचवेळी अचानक दरवाजा उघडून एक अधिकारी व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यांबरोबर नाट्यगृहात प्रवेश करती झाली. त्या व्यक्तीने आपल्या अचानक येण्यामुळे व्यत्यय आला याबद्दल विजयाबाईंची माफी मागितली. सर्वत्र एक फेरी मारून, एके ठिकाणी मॅटवरचा खेळा निघाला आहे तो व्यवस्थित बसवा अशी सूचना दिली. ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर विजयाबाईंना समजले की ते प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत जे. आर. डी. टाटा होते. त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा माणूस देखील छोट्या गोष्टींची बारकाईने पाहणी करतो हा अनुभव त्यांना एक वेगळी दृष्टी देऊन गेला. अशा सवयी मुळेच इंग्लिश भाषेमध्ये असे म्हटले जाते की 'God is in the details' . 

     हा प्रसंग वाचल्यानंतर पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेल्या रावसाहेब या व्यक्तीचित्राची आठवण होते. थिएटरचे मालक असणारे रावसाहेब पु. ल. देशपांडे, त्यांच्या पत्नी आणि अन्य स्नेही मंडळींचा सहभाग असलेल्या नाटकाच्या दिवशी स्वतः रंगमंच झाडून घेतात. यामध्ये आत्मीयतादेखील आहे आणि बारकावादेखील आहे.

     अशीच एक आठवण स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातदेखील आहे. प्राध्यापक शैलेंद्रनाथ धर यांनी अनेक संदर्भांचा बारकाईने अभ्यास करून स्वामीजींचे चरित्र लिहिले आहे. त्यातील एक आठवण म्हणजे आपल्या अखेरच्या काळात स्वामीजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आवश्यक झालेली विश्रांती घेण्यासाठी म्हणून देवघर या ठिकाणी गेले होते. त्यावेळी तेथील वसतिगृहात राहून शिकणारा के.एस. घोष हा विद्यार्थी आपल्या एका मित्राबरोबर स्वामीजींच्या भेटीसाठी गेला. त्यावेळी स्वामीजींनी त्यांना आरोग्य आणि स्वास्थ्य याविषयी मार्गदर्शन केले. बरोबर चालता चालता या गप्पा होत होत्या. स्वामीजींचे लक्ष घोष यांच्या बुटाकडे गेले आणि घोष यांनी बुटांची नाडी व्यवस्थित बांधलेली नाही हे स्वामीजींच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः एका बुटाची नाडी बांधून टाकली आणि दुसऱ्या बुटाची नाडी घोष यांच्याकडून बांधून घेतली. वसतिगृहात परत गेल्यावर ज्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना हा प्रसंग कळाला. त्यावेळी सर्वांनी स्वामीजींनी बांधलेली बुटाची नाडी पाहण्यासाठी गर्दी केली. रात्री घोष यांनी अनिच्छेने ही नाडी सोडली. बारकाव्याची शिकवण मिळालेले हे के.एस.घोष पुढे हजारीबाग येथील महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले आयुष्यभर ते स्वामीजींची ही भेट विसरले नाहीत.


                                                    ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र )

  महान व्यक्तींच्या अशा आठवणी आपल्यालादेखील बारकाव्याचे महत्त्व शिकवतात.


सुधीर गाडे,  पुणे 

Comments

  1. अतिशय साधा, दैनंदिन जीवनातला असा सोपा विषय परंतु मुद्देसूदपणे बारकाव्यांनिशी योग्य उदाहरणासह सहज सोप्या आणि सरळ भाषेतील लिखाण. सखोल अभ्यास आणि अभ्यासू वृत्ती असल्याशिवाय अशा विषयांची मांडणी करणे अवघड आहे. सुधीर सरांना ते अतिशय उत्तमपणे जमते. अभिनंदन आणि धन्यवाद सर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख