मातीची महती

       जगातील काही देशात स्वतःच्या देशाला पितृभूमी असे म्हटले जाते. परंतु भारतात प्रामुख्याने मातृभूमी असे म्हटले जाते. जगातील प्राचीन ग्रंथ असलेल्या अथर्ववेदात असे म्हटले आहे,‌‌ 

" माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः" 

यातून भूमीविषयीचा मातृभाव स्पष्टपणे प्रकट झाला आहे. आपले शेतकरी बांधवदेखील सहजपणे मातीला काळी आई म्हणतात हे याच प्राचीन वृत्तीचे प्रकटीकरण आहे. 

     दुष्ट रावणाचा वध केल्यानंतर बंधू लक्ष्मणाला लंकेची भुरळ पडली. त्यावेळी प्रभू श्रीरामांंनी त्याला सांगितले.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । 

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥

सोन्याच्या लंकेचे मोल माता आणि मातृभूमी यांच्यापुढे काहीच नाही. 


( २५/१०/२०२३ मेरा देश मेरी माटी अभियान) 

    मातृभूमीबद्दलचा हा विलक्षण भक्ती भाव वेगवेगळ्या महान व्यक्तिंच्या जीवनामध्ये प्रकट झाला आहे. जुलमी इंग्रजांची राजवट उलथून टाकण्यासाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी निरनिराळ्या माध्यमातून प्रयत्न केले. जाहीर भाषणांतून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. व्यापाराच्या माध्यमातून इंग्रज देशाची पिळवणूक करतात हे ध्यानात घेऊन स्वदेशीचा आग्रह धरला. शेवटी सशस्त्र क्रांतीचा निर्णय घेतला वंचित समाज घटकांना बरोबर घेऊन १८७७ ते १८७९ अशी जवळपास दोन वर्षे सशस्त्र उठाव केला. दुर्दैवाने हा उठाव अयशस्वी ठरला. आपल्याच देशभगिनींच्या वाचाळपणा आणि फितुरी या दुर्गुणांमुळे खबर मिळून २० जुलै १८७९ या दिवशी त्यांना इंग्रज अधिकारी डॅनियल याने पकडले. न्यायबुद्धीचे सोंग घेतलेल्या इंग्रज सरकारने खटल्याचे नाटक केले आणि शेवटी आजन्म कारावासाची शिक्षा कायम झाली. डिसेंबरमध्ये येमेनमधील एडनला रवानगी होताना वासुदेव बळवंतांनी आपल्या देश बांधवांना मूठभर माती देण्याची विनंती केली. त्यांनीच सुरू केलेल्या शाळेतील (भावे स्कूलमधील) एका शाळकरी मुलाने त्यांना ती माती दिली. जेव्हा ते एडनच्या तुरुंगात पोचले त्यावेळी त्यांचा अतोनात छळ झाला. तिथून निसटण्याचा प्रयत्न या प्रचंड ताकतीच्या महापुरुषाने केला पण तो अयशस्वी झाला. आपला मृत्यू जवळ आला आहे हे ओळखून आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉ.मनोहर बर्वे यांना वासुदेव बळवंत म्हणाले, " माझा मृत्यू झाल्यावर माझ्या देहावर ही माती टाका म्हणजे मला माझ्या मातृभूमीच्या कुशीत चिरनिद्रा घेतल्याचे समाधान लाभेल." केवढी ही भक्ती! १७ फेब्रुवारी १८८३ ला वासुदेव बळवंतांनी शेवटचा श्वास सोडला. डॉ बर्वे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि भडाग्नी दिला.

     भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करणारा आणखी एक महामानव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.  बॅरिस्टरीचे शिक्षण घेता घेता युरोपीय क्रांतिकारकांशी संधान बांधून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठावाचे प्रयत्न करण्याचा निश्चय करून ते इंग्लंडमध्ये लंडनला पोचले. परंतु एका हळव्या क्षणी त्यांना मातृभूमीची तीव्रतेने आठवण झाली आणि ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर जन्म झाला एका अजरामर कवितेचा. ती कविता म्हणजे 

"ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला "

प्रासाद इथे भव्य जरी भारी मज आईची झोपडी प्यारी यातून श्रीरामांच्या वचनांची आठवण होते.

    भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करणारा आणखी एक महामानव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. ' शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ' या न्यायाने दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत जर्मनीशी मैत्री करून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र प्रयत्न करावेत या हेतूने ते इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन जर्मनीमध्ये पोहोचले. तत्कालीन जर्मन सत्ताधीश, लक्षावधी ज्यूंना ठार मारणारा क्रूरकर्मा , ॲडॉल्फ हिटलर याच्याशी वाटाघाटी करून संघर्ष सुरू ठेवला. महायुद्ध जसजसे पुढे सरकत गेले तसतसे वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले. जर्मनीतून बाहेर पडून जपानमध्ये जायचे आणि जपानच्या कैदेत असणाऱ्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना उभी करायची हा निर्णय ठरला. कोणताही मार्ग सुरक्षित नव्हता. त्यामुळे समुद्राखालून पाणबुडीने जपानपर्यंत पोहोचायचे असे नेताजींनी ठरवले. यात यश येण्याची शक्यता ५० टक्केदेखील नाही असे जर्मन अधिकाऱ्यांकडून कळताच ते म्हणाले, " यशाची एक टक्के जरी शक्यता असेल तरीही हा प्रयत्न मी करणार."

    सुभाषबाबू आपले सहकारी आबिद हसन यांच्याबरोबर ८ फेब्रुवारी १९४३ या दिवशी किएल येथून पाणबुडीने प्रवासास निघाले. या पाणबुडीचा कमांडर होता वेर्नेर म्यूसेनबर्ग. जपानकडून निघालेल्या पाणबुडीचा कमांडर होता मासाओ तेराओका. या दोन्ही पाणबुड्यांची भेट २८ एप्रिलला मादागास्करच्या नैऋत्य दिशेला झाली. अत्यंत खवळलेल्या समुद्रात साहस करून नेताजी आपल्या सहकाऱ्यांसह जपानी पाणबुडीवर पोहोचले. कमांडरला त्यांनी एक विनंती केली की जेव्हा भारताच्या सगळ्यात जवळून पाणबुडी जाईल तेव्हा ती समुद्राच्या पृष्ठभागावर न्यावी. असलेल्या धोक्याची जाणीव कमांडरने करून दिली. परंतु आग्रहाने नेताजींनी ही गोष्ट करायला लावली. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर आली नेताजींनी मातृभूमीच्या दिशेने हात जोडून अतिशय विनम्र भावाने प्रणाम केला. कल्पनेनेच तिचे दर्शन घेतले. या साहसी प्रवासाच्या शेवटी ते  ६ मे रोजी साबांग येथे पोहोचले. नंतर विमानाने टोकियोला१६ मे रोजी उतरलो. आझाद हिंद सेनेने 'न भूतो ' अशा प्रकारचे कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली केले.



                                               ( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहायाने काढलेले चित्र )

       भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे सुरू झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत आपल्या देशाची, धर्माची ध्वजा फडकवली. विलक्षण प्रसिद्धी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपले कार्य जवळपास तीन वर्षे अमेरिका आणि युरोपच्या भूमीत पार पाडले. १८९६ च्या शेवटी भारतात जाण्याचे ठरले तेव्हा स्वामीजींच्या एका मित्राने त्यांना विचारले, " स्वामीजी उत्तरले, 

" येथे येण्यापूर्वी भारत मला प्रियच होता. आता तर मला भारताची धूळही मला पवित्र आहे, भारताची हवा पवित्र आहे, भारत पवित्र भूमी आहे, तीर्थस्थान आहे. तीर्थ!"


सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. तुम्ही खुप रूपयाला भिडणारे लेखन करता सर... असेच लेख लिहीत जा... जेणेकरून लोकाना ऊर्जा मिळेल.. 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख