युगनायकाचा जिव्हाळा
' दुरून डोंगर साजरे ' अशी एक म्हण आहे. काही मोठी माणसे दुरूनच चांगली वाटतात परंतु जर त्यांच्याजवळ जाण्याचा प्रसंग आला तर त्यांच्यामधील सवयी या आपल्याला चांगल्या वाटत नाहीत असा या म्हणीचा आशय आहे. तसेच जी माणसे अतिशय बुद्धिमान असतात, ज्ञानमार्गी असतात ती अनेकदा इतरांशी रूक्षपणे वागताना दिसतात. परंतु याला अनेक अपवाद आहेत. यापैकी एक अपवाद म्हणजे युगनायक स्वामी विवेकानंद हे होत.
१८९३ मध्ये शिकागो येथील सर्व धर्म परिषदेच्या वेळी स्वामीजींची राहण्याची व्यवस्था जॉन लेयॉन या धनवंतांच्या घरी करण्यात आली होती. स्वामीजींना या घरात आपुलकीचा अनुभव आला. ते जॉन लेयॉन यांच्या पत्नी श्रीमती एमिली लेयॉन यांना मदर असे संबोधत. त्यांची नात कॉर्नेलिया कॉंगर हिने नंतर आपल्या आठवणी लिहून ठेवल्या. १८९३ मध्ये कॉर्नेलिया ही सहा वर्षांची होती. स्वामीजी तिच्याशी अगदी सहजपणे संवाद साधत. ती त्यांच्या मांडीवर बसत असे. त्यांना गोष्ट सांगण्याचा हट्ट करत असे. स्वामीजी ही तिचा हट्ट पुरवीत. वेगवेगळ्या गोष्टी ते तिला सांगत असत. भारताचे वर्णन करून सांगत असत. स्वामीजींनी सांगितलेल्या भारताविषयीच्या गोष्टी तिला खेळवून टाकत - माकडे काय , मोर काय , वडाची झाडे , फळे आणि भाज्यांनी ओसंडून भरलेले भारतातील बाजार! स्वामीजींच्या फेट्याबद्दल तिला खूप कुतूहल वाटत असे. " ही वेगळी हॅट कसली ?" असा तिला प्रश्न पडत असे. कारण दरवेळी डोक्यावर घालताना तो फेटा परत गोलगोल गुंडाळावा लागे. छोटी कॉर्नेलिया स्वामीजींना फेटा परत परत बांधायला सांगे. स्वामीजीदेखील कौतुकाने तो फेटा पुन्हा पुन्हा बांधून दाखवत. हसून खेळून संवाद साधणारे स्वामीजी ध्यानस्थ बसले की मात्र वेगळे वाटतात हेही तिला जाणवत असे.
(छायाचित्र साभार पुढील दुव्यावरून
https://shop.advaitaashrama.org/product/vivekananda-for-children/ )
स्वामीजींची अशीच एक आठवण स्वामीजींचे शिष्य स्वामी अखिलानंद यांना एका तरूणीने सांगितली. ही मुलगी लहान असताना एके दिवशी तिची आई तिला बागेत घेऊन गेली. आईला बाजारात जायचे होते. त्यावेळी तिला तिथे स्वामीजी बसलेले दिसले. या माणसावर विश्वास ठेवावा असे आईला वाटले. ती आपल्या मुलीला स्वामीजींकडे सोपवून काम पूर्ण करून आली. पुढे ही मुलगी पंधरा सोळा वर्षांची झाल्यानंतर आईने स्वामीजींचे छायाचित्र पाहिले आणि स्वामीजींना ओळखले. तिने मुलीला तिच्या लहानपणी घडलेला हा प्रसंग सांगितला. ही मुलगी पुढे योगायोगाने स्वामी अखिलानंद यांना भेटली. पुढे ती त्यांची यांची शिष्या बनली.
स्वामीजी पहिल्यांदा अमेरिकेत गेल्यावर त्यांची योग्यता ज्यांनी सर्वात प्रथम जाणली ते हार्वर्ड विद्यापीठात ग्रीक विषयाचे प्राध्यापक असलेले प्रो.जॉन राइट. "आपल्याला परिचय पत्र मागणे म्हणजे सूर्याला झळकण्याचा काय अधिकार असे विचारण्यासारखे आहे." या शब्दात त्यांनी स्वामीजींचा गौरव केला. स्वामीजी त्यांच्या मदतीमुळे सर्व धर्म परिषदेत पोचू शकले. प्रोफेसर राईट यांना स्वामीजींनी अनेक पत्रे लिहिली. ऑक्टोबर १८९३ मध्ये राइट यांन लिहिलेल्या एका पत्रात स्वामीजींनी राइट यांचा मुलगा ऑस्टिन याला उद्देशून एक ताजा कलम लिहिला. त्यात ते म्हणतात, " प्रिय ऑस्टिन, तू जेव्हा खेळात दंग असतोस तेव्हा तुझ्याबरोबर आणखी एक खेळगडी तुझ्याबरोबर खेळत असतो. त्यच्या तुझ्यावरील प्रेमाला तोड नाही ; आणि खरंच तो इतकी मजा मजा करत असतो. तो सतत खेळातच दंग असतो - कधी त्याची खेळणी म्हणजे खूप प्रचंड मोठे चेंडू असतात - आपण त्यांना म्हणतो पृथ्वी आणि सूर्य ; तर कधी तो तुझ्यासारख्या छोट्या मंडळीत हसत खेळत रमतो. त्याला जर आपण पाहू शकलो तर मग त्याच्याबरोबर खेळताना किती मजा येईल नाही ? बघ विचार."
अमेरिकेतील ज्या कुटुंबांमध्ये स्वामीजींना अतिशय आपुलकीची वागणूक मिळाली त्यामध्ये महत्त्वाचे नाव आहे ते श्री जॉर्ज डब्ल्यू हेल आणि श्रीमती बेले हेल या कुटुंबीयांचे. त्यांच्या दोन मुली मेरी आणि हॅरिएट तसेच त्यांच्या बहिणीच्या दोन मुली इजाबेल आणि हॅरिएट या चौघींशी स्वामीजींचे बहीण भावाचे नाते तयार झाले. एके दिवशी स्वामीजींनी मेला सुरी मागितली. त्यांना पायाची नखे कापण्यासाठी सुरी हवी आहे हे लक्षात आल्यावर मेरी नखे कापण्याच्या सर्व साधनांचा संच घेऊन आली. तिने स्वामीजींच्या पायाशी बसून त्यांच्या पायातील मोजे काढले, त्यांची नखे कापली आणि परत मोजे पायात घातले. नंतर ती त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली आणि एखाद्या सेवकाने मोबदला मागावा तशी म्हणाली , " स्वामीजी, मला माझ्या कामाचा मोबदला हवा एक डॉलर. तुम्ही जर केशकर्तनालयात गेला असता तर तिथे तुम्हाला एवढेच पैसे द्यावे लागले असते." असे म्हणून ती थट्टेने हसली. स्वामीजीदेखील हसले आणि गमतीत म्हणाले , " माझ्या चरणांना स्पर्श करण्याचे आणि माझी नखे कापून देण्याचे भाग्य तुला लाभले. त्याबद्दल तूच माझे देणे लागतेस." मग दोघेही बराच वेळ मोठ्यामोठ्याने हसत राहीले.
स्वामीजी अखेरच्या काळात बेलूर मठात राहत असत. त्यावेळी तिथे अनेक प्राणी पाळले होते. मठातील गाईंना चारा घातला की नाही याची स्वामीजी आवर्जून चौकशी करत. त्यांना स्वतः चारा खाऊ घालत. मठातील 'हंसी' या बकरीचे दूध स्वामीजींच्या चहासाठी वापरले जाई. या बकरीचे करडू 'मटरू' हे सगळीकडे स्वामीजींबरोबर हिंडत असे. स्वामीजी त्याच्यासोबत पळापळ करत असत. त्याच्या पायातील घुंगरांचा आवाज स्वामीजींना आवडत असे. मठामध्ये बाघा आणि लायन असे दोन कुत्रे होते. त्यांचाही स्वामीजींना लळा होता. एकेदिवशी बाघाने एक शिष्याच्या निष्काळजीपणामुळे ठाकूरांच्या म्हणजे श्री रामकृष्णांच्या पूजेसाठी ठेवलेल्या पाण्यात तोंड घातले. म्हणून त्याला गंगेपार सोडून देण्यात आले. परंतु बाघा शेवटच्या नावेतून परत आला. नावाडी आणि अन्य प्रवाशांच्या विरोधाला त्याने जुमानले नाही. रात्री मठातील स्वच्छतागृहाजवळ पडून राहिला. पहाटे स्वामीजी स्वच्छतागृहाकडे निघाले असताना तेथे मुटकुळे करून पडलेल्या बाघाला त्यांचा पाय लागला. बाघा स्वामीजींकडे दीनवाणेपणाने बघत राहिला. सृवामीजींनी बाघाला मठातच राहू द्यायचे असे सांगितले. ( स्वामीजींच्या मृत्युनंतर बऱ्याच काळाने बाघाचा मृत्यू झाला. गंगेच्या पाण्यात सोडून दिलेला मृतदेह परत मठाजवळ येऊन पडला. शेवटी बाघाला मठाच्या आवारात पुरण्यात आले.)
स्वामीजींच्या अशा आठवणी समजल्या की आपण भारावून जातो. या युगनायकाचा अकृत्रिम जिव्हाळा आपल्या मनाला स्पर्श करतो.
सुधीर गाडे, पुणे
शेवटी बाघाला मठाच्या आवारात पुरण्यात आले.
ReplyDeleteअतुत नाते.... प्रेम आणि जिव्हाळा...
सुदंर खजीना उलगडला सर तुम्ही 🙏🙏
धन्यवाद सर!
Deleteसर,अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेखन
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद!
Delete