पाश्चात्त्यांचा श्रेष्ठत्वाचा अहंगंड

        " सर्वज्ञ असलेल्या ईश्वराने संपूर्णपणे कृष्णवर्णीय शरीरात आत्मा आणि तोही अमर आत्मा घातला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. .... हे लोक मनुष्य जातीत मोडतात ही गोष्ट अशक्य आहे." १८ व्या शतकातील फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५) याचे हे अवतरण काही दिवसांपूर्वी वाचनात आले आणि मी सुन्न झालो. माणसाला माणूस म्हणण्याचे नाकारणारे हे विचार दुःखद आणि चीड आणणारे आहेत. मॉन्टेस्क्यू हा अतिश्रीमंत सरंजामदार  युरोपच्या प्रबोधन काळातील फ्रेंच विचारवंत होता. फ्रान्समधील तत्कालीन राजेशाहीच्या बेबंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कारभाराबद्दल त्याने महत्वाचे विचार मांडले. विशेषतः कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे तीनही स्वतंत्र विभाग असले पाहिजेत. त्यांचा एकमेकांच्या कामात हस्तक्षेप असता काम नये हा महत्त्वाचा विचार त्याने मांडला‌. परंतु फ्रेंचांना कृष्णवर्णीयांना गुलाम करून उसाच्या मळ्यांतून संपत्ती कशी मिळवता येईल याचे समर्थन करताना त्याने वरील निंदनीय विचार मांडले आणि वसाहती करण्यासाठी समर्थन देणारा युक्तिवाद पुरवला.


( जगातील वसाहतींचा नकाशा सौजन्य विकिपीडिया)

        दुसऱ्या सहस्रकातील शेवटची साधारण पाचशे वर्षे  बघितली की पाश्चिमात्य देशांनी जगावर अनिर्बंध सत्ता गाजवली आहे आणि जगभर लुटीचे, अत्याचारांचे, क्रौयाचे थैमान घातले हे लक्षात येते. अशा प्रकारे जगभर चाललेल्या हा अत्याचारांचा मागोवा घेतला की लक्षात येते की यामागे एक विचार आहे. तो विचार म्हणजे, " जगात केवळ आपला वंश श्रेष्ठ आहे. अन्य वंश हे कस्पटासमान आहेत. ते रानटी आहेत. त्यामुळे त्यांना सुधारण्याचा, उन्नत करण्याचा आपल्याला अधिकार आहे. नव्हे तर ते आपले कर्तव्य आहे.  यापोटी अशा अज्ञ, असंस्कृत लोकांवर कशीही सत्ता गाजवण्याचा आपल्याला परवाना आहे." हा विचार या पाठीमागे दिसतो. 

       असाच विचार व्यक्त करणारी एक कविता अमेरिका आणि फिलिपाईन्स यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात जन्मलेला आणि राहिलेला इंग्लिश साहित्यिक रूडयार्ड किपलिंग (१८६५-१९३६)  याने १८९९ मध्ये 'White man's burden ' या नावाने लिहिली. स्पॅनिशांच्या गुलामीतून मुक्तता मिळवण्याच्या उद्देशाने अमेरिकेने फिलिपाईन्समधील क्रांतिकारकांना सोबत घेऊन युद्ध सुरू केले. स्पॅनिश लोकांचा पराभव झाल्यानंतर मात्र त्या देशाला स्वातंत्र्य देण्याचे नाकारले आणि आपल्या गुलामगिरीमध्ये ठेवले. या कृत्याचे समर्थन करणारी ही कविता आहे. त्यामधील सूर पाश्चात्य पुरुषांना जगाला सुसंस्कृत बनवण्याचा भार उचलायचा आहे असा आहे. ज्यांना त्यांनी जिंकले आहे ती माणसे अर्धवट सैतानी आणि अर्धवट बालबुद्धीची आहेत. ती माणसे गोऱ्यांना विरोध करतील परंतु जगाला सुसंस्कृत बनवण्याचे काम पूर्ण होण्यासाठी गोऱ्यांनी धैर्याने, शांतपणाने या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे असे किपलिंग या कवितेत म्हणतो. वसाहतवादाचे हे किती निर्ल्लज समर्थन आहे. संघर्ष करत करत  फिलिपाईन्सला शेवटी १९४६ मध्ये स्वातंत्र्य मिळाले.

      सर्व जगाची मालकी आपल्याकडे आहे या पाश्चात्यांच्या विचाराचे आणखी एक उदाहरण म्हणजे १६६१ मध्ये पोर्तुगालचा राजा जॉन चौथा याची मुलगी कॅथरीन हिचा विवाह इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी झाला. या लग्नाचा हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी मुंबई बेट चार्ल्सला दिले. चार्ल्सने ते ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. कंपनीने तेथून आपला कारभार पुढे चालू ठेवला. त्यातून भारताला गुलामीत ढकलले. म्हणजे सर्व जग हे आमच्याच मालकीचे आहे असा हा कारभार. 

       या वसाहतवादाचा अहंगंड, स्थानिकांवर अत्याचार, त्यांची प्रचंड छळवणूक याचबरोबर आर्थिक पैलूदेखील आहे. युरोपियन देशांनी आपल्या वसाहतींमधून प्रचंड लूट केली. त्यातून हे देश श्रीमंत झाले. ॲंगस मेडिसन या अर्थशास्त्रज्ञाने सन १ ते सन २००० अशा दोन हजार वर्षांचा जगाचा आर्थिक इतिहास लिहिला आहे. सन  १ मध्ये जगाच्या जीडीपीमध्ये भारताचा वाटा साधारण ३२% होता. सन १७०० मध्ये भारताचा वाटा २४.४% पर्यंत घसरला आणि १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा तो जेमतेम ४.२ % इतका होता. अभ्यासक उत्सा पटनाईक यांनी २०१७ मध्ये इंग्लंडने भारतातून १७६५ ते १९३८ या काळात ४५ ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती लुटली असे अभ्यापूर्ण मत मांडले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार सध्या ३ ट्रिलियन डॉलरच्या जवळपास आहे आणि भविष्यात ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. हे लक्षात घेतले की ही लूट किती प्रचंड आहे हे लक्षात येते. भारताबरोबरच युरोपियनांनी जगातील अनेक देशांमध्ये असेच थैमान घातले होते. हे विचारात घेता ही लूट किती प्रचंड आहे याचा अंदाज बांधणे अतिशय क्लिष्ट आहे. परंतु या लुटीतूनच हे देश श्रीमंत झाले हे उघडच आहे.

     उर्वरित सर्व जगाला सुसंस्कृत बनवण्याचा भार असल्याच्या विचाराने आणि स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा अहंगंड असल्यामुळे माणसांना गुलाम बनविण्याचा व्यापारदेखील युरोपियनांनी केला. या गुलामांचे शारीरिक, लैंगिक शोषण केले. त्यांचा अतोनात छळ केला.‌ काही शतके ही गुलामांचा व्यापार सुरू होता. अमेरिकेने इंग्लंडपासून वेगळे होत स्वतःच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला परंतु कृष्णवर्णीयांची गुलामगिरी अशीच चालू ठेवली. १९ व्या शतकात अमेरिकेत यातून गृहयुद्धदेखील झाले.  अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेतील गुलामगिरी संपवली. परंतु त्यापूर्वी दोन शतके आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी डचांना हिंदवी स्वराज्यात व्यापाराचा परवाना देणारा करार वलिकुंडपुरम , तामिळनाडू (तेव्हाचा कर्नाटक) येथे २४ ऑगस्ट १६७७ रोजी केला. त्यात महत्वाचे कलम घातले ते म्हणजे स्वराज्यात गुलामांचा व्यापार करता येणार नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या दृष्टीने अभिमानाची आहे. छ.शिवाजी महाराजांच्या या कराराबाबत अभ्यासक श्री.निखिल बेल्लारीकर यांनी डच कागदपत्रांचा अभ्यास करून हा तपशील मिळवला आहे.

      पाश्चात्त्यांच्या अहंगंडाचे एक उदाहरण म्हणून विन्स्टन चर्चिलची उक्ती आणि कृती बघता येईल. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्लंडचे संरक्षणमंत्री असताना चर्चिल यांनी विषारी वायूंच्या वापराचे समर्थन केले. १९१९ मध्ये अफगाणिस्तान आणि १९२० मध्ये इराकमधील (त्यावेळचा मेसापोटेमिया) कुर्द बंडखोरांच्या विरुद्ध विषारी वायूंचा वापर केला. त्यावेळी  'अशा असंस्कृत लोकांच्या विरुद्ध विषारी वायूंचा वापर केला तर काय बिघडले ?" असे त्यांचे वक्तव्य होते. नंतर त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधानपद मिळाले. महायुद्धात जपानने म्यानमारचा ( त्यावेळचा बर्मा ) ताबा घेतल्यावर तिथून भारतात येणारा तांदळाचा पुरवठा थांबला आणि चर्चिलने भारताच्या गरजेकडे डोळेझाक करत भारताला होणारा धान्याचा पुरवठा मित्रराष्ट्रांच्या सैन्याकडे वळवला. त्यातून १९४३ मध्ये भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळेसच्या बंगालमध्ये (म्हणजे आजचा पश्चिम बंगाल आणि बांगलादेश) या भागात तीस लाखांहून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला त्याबद्दल बोलताना चर्चिलचे उद्गार होते, " भारत हा पाशवी लोकांचा आणि पाशवी धर्माचा देश आहे. सशांसारखी त्यांची बेसुमार पैदास झाल्याने दुष्काळ पडला. " आणखी एक उद्गार म्हणजे, " जर अन्नाचा एवढा तुटवडा आहे तर गांधी मरत का नाही." हे एक  तिरस्करणीय आणि अतिशय चीड आणणारे उदाहरण आहे.

       पाश्चात्यांच्या श्रेष्ठत्वाच्या अहंगंडाचा अजून एक पैलू म्हणजे हा पाश्चात्य पुरुषांच्या श्रेष्ठत्वाचा अहंगंड आहे.‌ किपलिंगच्या कवितेत 'व्हाईट मॅन्स बर्डन' म्हटले आहे 'व्हाईट पीपील्स बर्डन' असे म्हटले नाही. पाश्चात्यांच्या संस्कृतीतील सृष्टीच्या निर्मितीची गोष्ट बारकाईने वाचले की हे ध्यानात येते. ॲडमच्या बरगडीपासून इव्हची निर्मिती झाली ती ॲडमला एकटे वाटत होते म्हणून त्याच्या मनोरंजनासाठी झाली. त्यातूनच पाश्चात्य विचारात स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आले आहे. हे लक्षात घेतले की हा पाश्चात्य पुरुषांच्या श्रेष्ठत्वाचा अहंगंड आहे हे समजते. याचेच एक उदाहरण बघता येईल. आधुनिक लोकशाहीची जननी मानल्या गेलेल्या इंग्लंडमध्ये तसेच लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. या संघर्षानंतर पुरुषांनंतर बऱ्याच उशीरा इंग्लंडमध्ये १९२८ तर अमेरिकेमध्ये १९२० मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पुरुषांना इंग्लंडमध्ये १४२९ तर अमेरिकेमध्ये १७८७ मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला. 

        या अहंगंडाने जगाची इतकी हानी केली आहे. तिची भरपाई करण्यासाठी भारताचा विश्वबंधुत्वाचा विचार मार्गदर्शक आहे. तो आचरणात आणल्याने जगात माणुसकी वाढेल. यासाठी स्वामी विवेकानंदांचे उदाहरण मार्गदर्शक आहे. जागतिक सर्वधर्मपरिषदेतील भाषणानंतर स्वामीजी अमेरिकेत प्रसिद्ध झाले. त्यांनंतर काही दिवसांनी एका आफ्रिकन अमेरिकन माणसाने स्वामीजींचा हात हातात घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्याचा असा  गैरसमज झाला होता की स्वामीजी आपल्याच वंशाचे आहेत. त्याने स्वामीजी त्याला अतिशय प्रेमाने म्हणाले की, " बंधू, खरेच धन्यवाद!" स्वामीजींचे सहकारी म्हणाले की, " तुम्ही त्यांना आपण आफ्रिकन नाही तर भारतीय नाही असे का सांगितले नाही." स्वामीजी म्हणाले, " सर्व माणसे ही ईश्वराचाच अंश आहेत. मग तो मला त्याच्या वंशाचा समजला यात काय बिघडले." अशा उदार विचार आचारातूनच थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी विचारलेल्या " माणसा माणसा कधी होशील रे माणूस?" या प्रश्नाला " हो आपण सर्व माणसे समान " हे उत्तर मिळू शकते.


सुधीर गाडे, पुणे 


Comments

  1. मानवाने मानवाशी बंधू भावाने वागावे एकत्रित मिळून मिसळून कुठलाही भेदभाव न बाळगता आनंदाने जीवन विधीत करावे अशी जगातल्या बहुतेक सर्व धर्मांची मुळ शिकवण आहे. किंबहुना याच कारणासाठी धर्म अस्तित्वात आले परंतु हळूहळू त्यात कर्मकांड आणि उच्चनीचता, भेदभाव याचे प्रमाण वाढल्यामुळे जगामध्ये ठिकठिकाणी कलह संघर्ष गुलामगिरी शत्रुत्व या गोष्टींचा सर्व मानव जातीला असह्य असा त्रास झाला आहे. या सर्वां पासून मानव जातीला मुक्तता फक्त भारतीय तत्त्वज्ञान जे विश्वबंधुत्व सांगते त्यामुळेच मिळणार आहे हेही तितकेच खरे.
    हा विचार मांडल्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद सर.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे म्हणणे रास्त आहे. धन्यवाद डॉक्टर.

      Delete
  2. सुरेख सादरीकरण.. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख