छ.शिवराय : मानवाच्या प्रतिष्ठेचा आग्रह धरणारा महापुरुष

          छ.शिवाजी महाराजांचे चरित्र हे सदैव प्रेरणादायक आहे.‌ या महामानवाचे नवनवीन पैलू समजतात तसे आपण थक्क होतो. २०२३-२४ हे महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष. यानिमित्ताने मी पुन्हा एकदा महाराजांच्या उत्तुंग आयुष्यावरील व्याख्यानांचे श्रवण केले‌. पुस्तकांचे, लेखांचे वाचन केले. यातून महाराजांचा एक पैलू पुन्हा समजला. तत्कालीन भारतामध्ये माणसांना गुलाम करून विकण्याचे प्रचलन होते. यातून बादशहांना महसूलदेखील मिळे. युरोपियनांना स्वस्त कामगार मिळत. पण अशा या अमानुष व्यापाराला शिवरायांचा विरोध होता. 

             ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)

          युद्धात जिंकलेल्या भूभागातील माणसांना गुलाम करून त्यांना नोकर म्हणून वागवणे अथवा त्यांची खरेदी विक्री करणे हे प्रचलन मोगल, तुर्क पठाण, हबशी या सर्व राज्यकर्त्यांमध्ये बघायला मिळते. तपन रायचौधरी या संशोधकाने स्थानिक साधनांच्या आधारे पुढील माहिती दिली आहे. '१६४५ मध्ये तंजावर,जिंजी आणि मदुराई येथील हिंदू नायक राजांचा विजापूरच्या मुस्लिम सैन्याने पराभव केला. त्यावेळी जवळपास दीड लाख लोकांना गुलाम करून विजापूर आणि गोवळकोंडा येथे नेण्यात आले.' या एका घटनेवरून गुलामगिरीच्या प्रसाराचा आवाका थोडाफार लक्षात येतो. ऐतिहासिक काळात मुस्लिम सत्ताधीशांनी एकूण किती लोकांना गुलाम केले हे सांगणे शक्यतेच्या पलीकडे आहे.

            मध्ययुगीन भारतात गुलामी गुलामंच्या व्यापारात युरोपातील डच,पोर्तुगीज,इंग्रज, फ्रेंच यासारखे देश सहभागी होते. या गुलामगिरीच्या गुलामांच्या व्यापाराबद्दल तत्कालीन कागदपत्रे अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.त्यातून फारच त्रोटक माहिती मिळते. परंतु एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते ती म्हणजे मसाल्याचे पदार्थ कापूस, मोती, लाकूड यासारख्या वस्तूंबरोबरच हाडामासाच्या जिवंत माणसांचादेखील हे लोक व्यापार करायचे. त्याचे कारण काय तर स्वस्तात मजूर मिळाले पाहिजेत. त्यामुळे अशा माणसांना विविध मार्गाने गुलाम करून अमानुष वागणूक देत त्यांचा व्यापार सर्रास चालायचा. एकोणिसाव्या शतकाच्या जवळपास मध्यापर्यंत यामध्ये कोणालाच गैर वाटायचे नाही. जणू काही त्यांच्या वरचढपणाचा अधिकारच ते गाजवित होते. उपलब्ध असलेल्या अपुऱ्या माहितीवरून अनेक संशोधकांनी याबद्दल लेखन केले आहे. त्यामध्ये एक आहेत रिचर्ड बी. ॲलन. त्यांनी हिंदी महासागरातील देशांमधून युरोपात होणाऱ्या गुलामांच्या व्यापाराबद्दल शोधनिबंध लिहिला आहे. भारत तसेच अन्य आशियाई देश,  त्याचबरोबर आफ्रिकन देशातूनदेखील हा व्यापार चालायचा. १५००-१८५० या साडेतीनशे वर्षांच्या काळात अंदाजे सुमारे ५ लाख माणसांचा गुलाम म्हणून व्यापार केला आहे. माणुसकीला काळीमा लावणारा हा प्रकार आहे.

( रिचर्ड बी.ॲलन यांच्या 'Satisfying the want of labouring people ' या २०१० च्या शोध निबंधातून)

     या कालखंडात गुलामांची किंमत किती असावी याचे एक उदाहरण ॲलन यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीच्या कागदपत्रांतून दिले आहे. १७६३ मध्ये पुरुषाची किंमत ७० डॉलर्स तर महिलेची किंमत ५० डॉलर्स इतकी होती. तर १७६५ मध्ये पुरुषांची किंमत १०० ते ११० डॉलरपर्यंत पोहोचली. हा व्यापार किती अमानुष होता याचे अजून एक उदाहरण  दिले आहे. १७६५  मध्ये मुंबईवरून २४५ स्त्री पुरुष मुले त्यांना जहाजात घालून सुमात्रा बेटावरील फोर्ट मार्लबोरो येथे नेण्यात आले. त्यापैकी केवळ १६५ जणच जिवंत पोहोचू शकले. काय ही अमानुषता! या वर्णनातून यातून क्रौर्याची केवळ कल्पना करणेदेखील अशक्यप्राय आहे.

      अमानुषपणाच्या या पार्श्वभूमीवर महाराजांची कृती समजावून घेण्यासारखी आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी ज्यांंना चिटणीस म्हणून नियुक्ती दिली त्या बाळाजी आवजी यांचे वडील आवजी हरी चित्रे हे जंजिऱ्याच्या सिद्धीच्या पदरी चाकरीला होते. काही कारणांमुळे गैरमर्जी झाल्याने सिद्दीने आवजींना पोत्यात घालून समुद्रात बुडवले आणि आवजींची पत्नी, मुले यांना गुलाम म्हणून राजापूरच्या बाजारात विक्रीसाठी ठेवले. बाळाजींच्या मामानेच त्यांना विकत घेऊन मुक्त केले. सुंदर अक्षर असणाऱ्या बाळाजींनी राजापूरच्या ठाणेदाराकडे नोकरी करताना संधी साधून महाराजांना पत्र लिहिले. ते वाचून महाराजांनी राजापूरच्या स्वारीच्यावेळी बाळाजींना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतले. जंजिऱ्याच्या सिद्दीच्या गुलामांच्या व्यापाराला पायबंद घालण्यासाठी महाराजांनी दंडा, राजपुरीवर हल्ला चढवून ती आपल्या ताब्यात घेतली. यातून सिद्दीच्या उपद्व्यापाला काहीसा आळा बसला. ( संदर्भ : राष्ट्रनिष्ठेचा नंदादीप खंडो बल्लाळ लेखक नाना ढोबळे )

       औरंगजेबाच्या हुकुमावरून शाहिस्तेखान स्वराज्यात येऊन पुण्यात ठाण मांडून बसला. त्यावेळी महाराजांनी १२ ऑक्टोबर १६६२ यादिवशी कारीचे सर्जाराव जेधे यांना पत्र पाठवून या संकंटाला तोंड देण्यासाठी सज्ज रहायला सांगितले. " जासुदांनी रोका आणला. प्रस्तुत मोगल तुमच्या तपियात धावून येताती. मोगल येतील आणि बंद धरून नेतील. ये गोष्टीचे पाप तुमचे माथी बसेल." बंद धरून नेणे म्हणजे गुलाम करणे. मोगली फौज लोकांना पकडून गुलाम करून नेईल तर ते पाप तुमच्या डोक्यावर चढेल असे बजावले. पापपुण्याची कल्पना लक्षात घेऊन महाराजांनी जबाबदारीची जाणीव जेध्यांना करून दिली. ( संदर्भ अभ्यासक डॉ.केदार फाळके यांचे भाषण)

       राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी महाराज बाहेर पडले. डच ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी निकोलास क्लेमेंट आणि हर्बर्ट डी.यागर यांनी वलिकुंडपुरम येथे ६ ऑगस्ट १६७७ यादिवशी महाराजांची भेट घेतली. स्वराज्याच्या मुलुखात व्यापाराची परवानगी मागितली. ती देताना महाराजांनी लोकांना गुलाम करता येणार नाही हे कलम स्वतः सांगून घालायला लावले. त्यात लिहिले, " पूर्वी हा प्रदेश मुस्लिम राजवटीखाली होता आणि तुम्ही मुक्तपणे स्त्री व पुरुष गुलामांची खरेदीविक्री करू शकत होता. परंतु आता हे असे चालू दिले जाणार नाही कारण माझे लोक त्याला विरोध करतील. तरीही तुम्ही जर हे करू पाहाल तर तेही होऊ दिले जाणार नाही. जर तुम्ही गुलामांना स्वतःच्या घरात किंवा जहाजात पकडून घेऊन जाल तर त्यांना मुक्त केले जाईल." २४ ऑगस्ट १६७७ रोजी झालेला हा करारनामा संशोधक श्री.निखिल बेल्लारीकर यांनी पोर्तुगीज कागदपत्रांमधून उजेडात आणला. 

        या सर्व घटनांमधून मानवाच्या प्रतिष्ठेचा आग्रह धरण्याची महाराजांची भूमिका लक्षात येते. तसेच या भूमिकेत सातत्य आहे हेही समजते. तत्कालीन अन्य राज्यकर्ते महसुलासाठी माणसांच्या व्यापार चालू देत होते. अशा या अंधकारमय वातवरणात शिवरायांची उक्ती, कृती ही उठून दिसते. 

      साधारण १८४८ मध्ये युरोपियनांनी गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली पण महाराजांनी त्याबद्दल १६६२ पासूनच ती भूमिका घेतली आहे. याचा पुरावा उपलब्ध आहे. त्यामुळे हे प्रमाणवर्ष धरता येईल. फक्त स्वतःलाच आधुनिक मानणाऱ्या पाश्चात्त्यांच्या विचारांत माणुसकीच्या प्रतिष्ठेचे महत्त्व लक्षात येण्यापूर्वी जवळपास १८६ वर्षे आधीच छ. शिवाजी महाराजांनी ती प्रतिष्ठा स्थापित करण्याचा प्रयत्न स्वतःच्या अधिकारात केला. यातून त्यांची महानता आणि द्रष्टेपण दिसून येते. माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा जपणारा हे 'जाणते राजे'. त्यांना त्रिवार मुजरा!

सुधीर गाडे पुणे 

Comments

  1. माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा जपणारा हे 'जाणते राजे'. त्यांना त्रिवार मुजरा.. सुंदर सादरीकरण...नेहमी प्रमाणे.... 🙏

    ReplyDelete
  2. आज आपण जे काय ताठ मानेने जगतो आहोत त्याचे संपूर्ण श्रेय शिवरायांना आहे. शिवरायांना माझा त्रिवार मुजरा. नेहमीप्रमाणे सरांनी शिवरायांची फारशी प्रचारात नसलेली आठवण व त्यायोगे त्यांचे मोठेपण याचे अतिशय उत्तमरीत्या सादरीकरण केले. खूप खूपधन्यवाद सर.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरे आहे डॉक्टर. धन्यवाद. नमस्कार.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख