गुणसागर श्रीराम

  आध्यात्मिकता हा प्राचीन भारताचा मूळ स्वभाव आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतातील व्याख्यानांमध्ये वारंवार याचा उच्चार केला आहे आध्यात्मिकतेचा हा प्रवाह नेमका किती वर्षांपासून वाहतो आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. आध्यात्मिकतेच्या या प्रवाहाची निर्गुण उपासना आणि सगुण उपासना अशी दोन अंगे आहेत. जनसामान्यांना निर्गुण तत्वाची उपासना करणे जड जाते. त्यासाठी आदर्श तत्त्व साकार रूपात त्यांना हवे असते. हा साकार रूपातील आदर्श म्हणजे श्रीराम! म्हणूनच ' रामो विग्रहवान् धर्मः' असे म्हटले जाते. म्हणजे राम हे धर्माचे रूप आहे. भारतभूमीच्या हजारो वर्षांच्या जीवनप्रवाहामध्ये या महामानवाने आपल्या जिवंतपणीच देवत्वाची मान्यता मिळवली असे ते  मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम! सार्वकालिक प्रेरणा देणारे असे श्रीरामांचे चरित्र आहे. या चरित्रातील अनेक गोष्टी सदैव मार्गदर्शक आहेत. 'चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ' हे लक्षार्थाने आणि वाच्यार्थानेही खरे आहे. त्यातील मोजकेच पैलू पाहूया.


( कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून काढलेले चित्र फेसबुक वरून साभार)

राम चरित्र वाचताना अनेक मुद्दे लक्षात येतात त्यामध्ये मला प्राधान्य वाटते ते त्यांच्या जनमानसावर पडलेल्या मोहिनीचे. ऋषी वाल्मिकी यांच्या रामायणानुसार वयाच्या १२ व्या वर्षी श्रीराम विश्वामित्रांच्या बरोबर पराक्रमासाठी बाहेर पडले. मारीच, सुबाहू यांना शासन केल्यानंतर जनकनंदिनी सीतेबरोबर विवाह करून ते अयोध्येमध्ये परत आले. आपल्या बाल राजकुमाराने गाजविलेल्या पराक्रमाचे कौतुक अयोध्यावासियांना वाटले हे तसे स्वाभाविक मानले पाहिजे. कारण वयाचा हा काळ साधारणपणे खेळण्या बागडण्याचा असतो.  विवाहानंतर अयोध्येमध्ये राम सीता यांचा १२ वर्षांचा काळ गेला आहे. बालवयातून ऊर्जावान तारुण्याकडे रामांच्या जीवनाचे मार्गक्रमण याकाळात झाले आहे. सामान्य माणसाच्या जीवनात ही वर्षे बऱ्याचदा मानसिकदृष्ट्या वादळी जातात. बंडखोर वृत्तीदेखील या वयामध्ये दिसून येते. परंतु आपले विचार, आचार आणि व्यवहार यांनी सर्वच अयोध्यावासियांच्या मनात जणू रामचंद्रांनी घरच केले. त्यामुळे कैकयीला दिलेल्या वरदानामुळे रामांना वनवास आणि भरताला राज्य मिळणार याचा आनंद सगळ्या अयोध्येत केवळ दोनच व्यक्तिंना झाला आहे. त्या म्हणजे मंथरा आणि कैकयी. जो रघुनंदन अजून राज्यावर अधिष्ठित झाला नाही त्याने जनांना इतके प्रभावित करून सोडणे ही विलक्षण गोष्ट आहे. कारण तसे बघायला गेले तर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही राजकुमारांची परिस्थिती सारखीच आहे. परंतु रामाचे अद्भुत व्यक्तिमत्त्व जनमानसावर गारुड करते झाले. त्याचे बोलणे चालणे सलगी देणे यामुळे अयोध्यावासियांना त्याने आपलेसे करून सोडले.. म्हणूनच वनवासात जाताना आबालवृद्ध अयोध्यावासी रथामागे मैलोनमैल गेले. ती रात्र ते वनातच राहिले. 'राजा लोकानुरंजनाय' हे राज्यावर बसण्यापूर्वीच श्रीरामांनी करून दाखवले. तसेच हे प्रजेनेही खरे करून दाखवले. दोघेही एकमेकांवर तेवढेच निस्सीम प्रेम करत होते.

      श्रीरामांच्या चरित्रातला अजून एक पैलू म्हणजे समाजातील वंचित घटकांशी असणारा त्यांचा व्यवहार. अयोध्येतून बाहेर पडल्यानंतर निषादराज गुहाची भेट झाल्यावर त्याला रघुनाथाने कडकडून आलिंगन दिले आहे. दुष्कर्मात सहभागी अहिल्येबाबत करूणामय दृष्टीकोन दथरथात्मजाने दाखवला आणि तिला समाज जीवनात पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. यातूनच पतितपावन हे विशेष कौसल्यासुताने सार्थ केले. मतंग ऋषींच्या आश्रमातील वयोवृद्धा शबरी माता हिच्या भावनांचा आदर करीत त्यांनी तिचा पाहुणचार प्रेमाने स्वीकारला आहे. नागरजीवनापासून दूर असणारे अथवा वेगळे असणारे वानरराज सुग्रीव आणि त्यांचे सहकारी यांच्या मनामध्ये आत्मियतेचा भाव उत्पन्न झाला तो केवळ श्रीरामांच्या स्नेहपूर्ण व्यवहाराने. त्यामुळे सीतामाईचा शोध आणि सुटका हे राम कार्य व्यक्तिगत न राहता ते सर्व समाजाचे कार्य बनले. तशा अर्थाने वानरसेनेचा श्रीरामांच्या व्यक्तिगत आयुष्याशी कोणताही पूर्वसंबंध नाही. परंतु 'राम कार्य हे माझेच कार्य' या भावनेने हनुमंत तर भारले गेलेच परंतु सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबुवंत आणि विशाल वानर समूह या भावनेने भारित झाला आणि एका समृद्ध ,शक्तिमान, प्रतापी पण अत्याचारी राजाचा आणि त्याच्या साथीदारांचा संपूर्ण पराभव या सर्वांनी मिळून केला. 

अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम्।

अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयो: समा॥ 

ओंजळीत घेतलेली फुले ज्याप्रमाणे दोन्ही हातांना सारखीच सुगंधित करतात त्याप्रमाणे सज्जन सर्वांवर सारखेच प्रेम करतात. हे सज्जनांबाबतीचे वचन श्रीरामांना चपखल लागू पडते. या लोकप्रीतीच्या आधारावर जे राज्य उभे राहिले ते आदर्शवत ठरले. पिता दशरथ यांची राजा म्हणून असलेली दीर्घ, समृद्ध कारकीर्द ही आदर्श ठरली नाही‌. तर मूलभूत तत्त्वांच्या आधारावर म्हणजेच धर्माच्या आधारावर असलेले रामराज्य हे आदर्श ठरले. राज्यकर्त्यांचा हा सर्वकालिक आदर्श हा उच्च कोटीचा मापदंड आहे. त्या मापदंडाच्या कसोटीला उतरणे हे आव्हानात्मक आहे परंतु हे आव्हान स्वीकारून त्या कसोटीच्या मापदंडाप्रमाणे कारभार करणे आणि त्यात शक्य तेवढे यश मिळवणे महत्त्वाचे ठरते आहे.

       अशा अनेक गुणांच्या समुच्चयाने मानव श्रीरामांचे जीवन आदर्शवत असे झाले. त्यामुळे त्यांना हयातीतच समाजाने देवत्व बहाल केले. महर्षी वाल्मिकींनी देवत्व लाभलेल्या श्रीरामांचे  काव्यरुपाने चरित्रकथन केले. सर्वसामान्यांची या देवत्वावरची श्रद्धा हजारो वर्षे अभंग आहे. काळाच्या कसोटीला उतरलेली ही श्रद्धा मानवाला सदैव स्फूर्ती देत राहील. 


सुधीर गाडे, पुणे 


Comments

  1. अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम्।
    अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयो: समा॥
    अप्रतिम... लेखन... 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. समाजातील वंचित घटकांशी असणारा राजकारण्यांचा, राज्यकर्त्यांचा व्यवहार
    याला आजच्या लोकशाहीच्या काळात सुद्धा महत्व आहे. जो त्यांच्याशी चांगला व्यवहार करतो तोच लोकशाहीत राज्य करण्यासाठी निवडून येण्याची क्षमता राखू शकतो. यावरूनच आपणास असे दिसते की रामचरित्र/ श्रीराम हे कालातीत आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख