छ.शिवराय : गुणीजनांचे आश्रयस्थान
छ.शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात अतिशय प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या कर्तृत्वाची माहिती जसजशी पसरत गेली तसतसे अनेक ठिकाणांहून गुणीजन आणि निष्ठावंत शिवरायांकडे आकर्षित झाले. यामध्ये सर्व स्तरातील लोक होते. बुद्धिमंत, कलावंत, सामान्य जन सर्वचजण स्वराज्याकडे खेचले गेले. महाराजांपाशी आपल्या कलागुणांचे चीज होईल, निष्ठेची कदर होईल अशी सर्वांना खात्री होती. त्यापैकी काही उदाहरणे पाहूया.
अफजलखानाच्या वधानंतर सुमारे १८ दिवसांत नोव्हेंबर १६५९ मध्ये महाराजांनी प्रतापगडापासून ते पन्हाळ्यापर्यंत स्वतः विस्तार केला. या परिसरातील जनतेला शिवरायांच्या आचार विचार आणि धोरणामधील वेगळेपण, सच्चेपण भावले. यातच एक होते पन्हाळ्याजवळील नेबापूरचे शिवा काशीद. लोकांचे केशकर्तन उपजीविका करणाऱ्या काशीदांचे अनोखेपण म्हणजे ते शिवरायांसारखे दिसत. शिवरायांचा आणि काशीदांचा सहवास जेमतेम ६-७ महिन्यांचा. परंतु मोक्याच्या वेळी प्राण जाण्याची खात्री असतानाही शिवरायांची वेशभूषा करून ते सिद्दी जौहरला चकवा देण्याच्या प्रयत्नात सहभागी झाले आणि शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी आत्माहुती पत्करली. त्यांचे बलिदान इतिहासात चिरंजीव झाले.
जंजिऱ्याच्या सिद्दीची गैरमर्जी झाल्याने त्याच्या पदरी असलेल्या आवजी हरी चित्रे यांना समुद्रात बुडवून मारण्यात आले. आवजींची मुले,बाळे पत्नी यांना गुलाम म्हणून विकण्यासाठी नेण्यात येऊ लागले. पण आवजींच्या मेव्हण्यांनी संधान बांधून रक्कम देऊन बहीण आणि भाच्यांना सोडवले आणि राजापूरला नेले. मोत्यासारखे अक्षर असणाऱ्या बाळाजी आवजी यांच्या कानांवर शिवरायांची कीर्ती गेले. आपल्या मोत्यासारख्या अक्षरात त्यांनी पत्र लिहून शिवरायांना स्वराज्यात सामील करून घेण्याची विनंती केली. जेव्हा महाराजांनी राजापूरवर स्वारी केली. तेव्हा महाराजांनी त्यांना बोलावून घेतले आणि स्वराज्याच्या सेवेत सामील करून घेतले. बाळाजींच्या गुणांची पारख करून शिवरायांनी बाळाजी आवजी यांना अष्टप्रधान मंडळात चिटणीस केले. त्यांच्या गुणांचा उपयोग स्वराज्यासाठी करून घेतले. बाळाजी आवजी चौकस बुद्धिचे होते हे सांगणारा प्रसंग इंग्रज अधिकारी टॉमस निकल्स याने लिहून ठेवला आहे. १३ मे १६७३ ते १३ जून १६७३ असा सुमारे महिनाभर हा रायगडावर होता. एके दिवशी बाळाजींना भेटायला गेल्यावर त्यांनी इंग्रजांचा राजा, सैन्य, सामर्थ्य याबाबत बारकाईने चौकशी केली. पण " बाहेर दिसणाऱ्या झाडाची पाने जशी मोजता येणार नाहीत तशी या प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत." असे सांगून निकल्सने माहिती देण्याचे टाळले. माहिती मिळाली नाही पण या प्रसंगातून बाळाजी आवजी यांचा चौकसपणा दिसून येतो.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
स्वत:च्या बापाला कैदेत टाकणाऱ्या, भावंडांची हत्या करणाऱ्या कारस्थानी, क्रूरकर्मा औरंगजेबाच्या मगरमिठीतून शिवराय सुखरूप बाहेर पडले आणि त्यांची कीर्ती संपूर्ण हिंदुस्थानात आणि युरोपातही पसरली. या कीर्तीने त्यांच्याकडे खेचले गेले एक कवी. कवी भूषण. उत्तर प्रदेशातील त्रिविक्रमपूर ( तिकमापूरचे ) कवी भूषण म्हणतात,
देस न देस न ते गुणीजन आवत, ज्याचन ताही |
तिनमे आयो एक कवि, भूषण कहियतु जायी ||
देशादेशांतून गुणीजन शिवरायांकडे आकृष्ट झाले त्यात एक आहे कवी भूषण. आपल्या विलक्षण प्रतिभेने वेगवेगळ्या उपमा, अलंकार, कल्पना वापरून भूषणांनी शिवरायांच्या पराक्रमाचे, चारित्र्याचे, ध्येयाचे, औदार्याचे वर्णन केले. विविध छंदातील अनुप्रासयुक्त हे काव्य रसिकांना तर भुरळ घालतेच पण शिवरायांचे यथार्थ वर्णनदेखील करते. आकाशीच्या गंगेपेक्षा रायगडावरील गंगासागर भाग्याचा आहे कारण शिवरायांचे तेथे वास्तव्य आहे, शिवरायांच्या हल्ल्यामुळे शत्रूंची प्रेते पडणार आहेत हे समजल्यामुळे शिवशंकराचे भूत पिशाच्च गण आनंदीत झाले आहेत, अन्य राजांचे गुणवर्णन केल्याने अपवित्र झालेली वाणी शिवाजी महाराजांची कीर्ती गाऊन पवित्र झाली यासारख्या घोषणाच्या रचना मनाला भारून टाकतात.
शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांच्या सेवेत असणारे रघुनाथपंत हणमंते तिथून नाराज होऊन स्वराज्यात दाखल झाले. दक्षिणेतील कुतुबशाहची, दक्षिण भारताची संपूर्ण माहिती त्यांनी शिवरायांना दिली. भविष्यात औरंगजेबाचे आक्रमण होणार हे द्रष्ट्या शिवरायांनी जाणले आणि त्याविरोधात एकत्र आघाडी उघडण्यासाठी कुतुबशाहशी तह केला. जिंजीच्या गडाचे महत्त्व ओळखून शिवरायांनी जिंजी घेतली. पुढे औरंगजेबाच्या सर्वभक्षी आक्रमणाच्या वेळी छ.राजाराम महाराजांना अनेक वर्षे सुरक्षित आश्रय याच जिंजीच्या दुर्गात मिळाला. राज्याभिषेकानंतर शिवरायांच्या आज्ञेनुसार हणमंते यांनी राज्यव्यवहारकोश सिद्ध केला. त्याद्वारे मराठी भाषेत रूढ झालेल्या सुमारे १४०० पर्शियन व फारसी शब्दांना प्रतिशब्द देऊन मराठी भाषेला नवसंजीवनी दिली.
ध्येयपूर्तीसाठी गुणवंत लोकांना स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यातून महाराजांची गुणग्राहकता दिसून येते.
सुधीर गाडे, पुणे
संदर्भ निनाद बेडेकर, केदार फाळके यांची भाषणे
जयसिंगराव पवार यांची मुलाखत
देस न देस न ते गुणीजन आवत, ज्याचन ताही |
ReplyDeleteतिनमे आयो एक कवि, भूषण कहियतु जायी || ऊतम सादरीकरण सर.. तुमचे लेखन खूप स्फूर्तीदायी आहे🙏🙏
सर, धन्यवाद
Delete