शब्द प्रयोगांच्या गमतीजमती
मध्यंतरी एका शैक्षणिक बैठकीत असताना बरोबरच्या एका उद्योजकांना त्यांच्या कारखान्यातून वारंवार फोन येत होते. बैठक संपल्यानंतर ते म्हणाले, " तिकडे आग लागली आहे!".असं त्यांनी म्हटल्याबरोबर सगळ्यांना एकदम धक्का बसला. मग लक्षात येऊन मी म्हणालो, " आग लागली म्हणजे काहीतरी तातडीची आवश्यकता निर्माण झाली आहे. शब्दश: अर्थ घेऊ नका." मग जरा सगळ्यांना हायसं वाटलं.
बरेच वेळा चर्चा करताना शब्द, वाक्प्रयोग यामुळे गडबडी होतात. त्यामुळे एका विचारवंतांने म्हटले आहे, " चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा आपण व्याख्या निश्चित करूया." असे झाले नाही तर घोटाळे होतात.
काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. आमच्या वसतिगृहातील एक विद्यार्थिनी बाहेर एकेठिकाणी जाते असे सांगून दुसरीकडे गेली होती. हे नंतर लक्षात आल्यामुळे तिच्या वडिलांना मी भेटायला बोलावले. मी त्यांना म्हणालो, " तुमची मुलगी परवानगी एके ठिकाणची घेऊन भलतीकडेच गेली होती." भलतीकडे असं मी म्हणताच ते रागावले. आमच्या सातारा जिल्ह्यात 'भलतीकडे' हा शब्द 'दुसरीकडे' या अर्थानेही वापरतात. पण त्या पालकांच्या भागात याचा वेगळाच अर्थ होतो. पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगितल्यावर त्यांना खुलासा झाला आणि ते थोडेसे शांत झाले.
मध्यंतरी भारताचे श्रेष्ठ सेनानी फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामध्ये माणेकशा यांची सर्वांना स्वीटी म्हणायची सवय दाखवली आहे. यातून त्यांची मुलाखत घेणाऱ्या महिला पत्रकाराचा गैरसमज होतो असे दाखवले आहे. पण ती माणेकशॉ यांची सवय आहे हे लक्षात येताच त्या पत्रकार महिलेचा गैरसमज दूर होतो असे दाखवले आहे.
प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांनी एका कथेमध्ये एक प्रसंग लिहिला आहे. एका लग्नसमारंभात नवरानवरीचे अभिनंदन करताना एकजण सहज बोलून जातो, " आता याचं काही खरं नाही." नवऱ्याच्या मनात शंकेचा भुंगा घर करतो. पुढचे अनेक दिवस तो अस्वस्थ असतो. शेवटी त्याला खुलासा होतो की त्या माणसाला तसं उगीचच बोलण्याची खोड असते. हे समजले की गैरसमज दूर होतो आणि नवदांपत्याचा संसार मार्गी लागतो.
खानदेशातील एक संघाचे कार्यकर्ते नोकरीनिमित्ताने काही वर्षे मराठवाड्यात होते. एके दिवशी कामावरून घरी आल्यावर त्यांना दिसले की त्यांची पत्नी आणि शेजारी महिलेचे जोरदार भांडण सुरू आहे. थोडी चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पत्नीने 'बाई' हा शब्द उच्चारल्याने भांडणाला सुरूवात झाली. कारण या शब्दाचा खानदेशातील अर्थ आणि मराठवाड्यातील अर्थ वेगळा आहे. हे समजावून दिल्यावर ते भांडण मिटले.
एका शाळेचे मुख्याध्यापक एखाद्या गोष्टीची त्यांना आठवण करून द्या असं दुसऱ्यांना सांगताना म्हणत , "मला टच करा." पण हे वाक्य शिक्षिकांना उद्देशून म्हटले तर त्याचा वेगळाच अर्थ निघायचा.
संघाचे कार्यकर्ते एकमेकाला भेटले की बऱ्याच वेळा म्हणतात, " बसूया एकदा." असं म्हटलं की आजूबाजूच्या लोकांना काही वेगळंच वाटतं कारण 'बसूया' या शब्दप्रयोगाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. पण संघाच्या कार्यकर्त्यांना म्हणायचं असतं, " भेटून विचारविनिमय करूया." हा अर्थ माहिती नसलेल्यांचा गोंधळ होतो.
एकूण काय तर शब्द वापरताना समोरच्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बोललं पाहिजे. नाहीतर कधी कधी गोंधळ होण्याची शक्यता आहे.
सुधीर गाडे पुणे
शब्दाचा खेळ... सुदर सादरीकरण सर🙏
ReplyDeleteसर, आभारी आहे.
Delete