पतीपत्नींच्या अलौकिक जोड्या
आदिमानवाने समाजाची कल्पना स्वीकारून एकत्रित पणे राहायला सुरुवात केली या टप्प्यावर केव्हातरी कुटुंब व्यवस्थेचा जन्म झाला. माणसांच्या शारीरिक गरजा भागवणे याबरोबरच वंश सातत्य टिकवणे हा देखील हेतू यामागे आहे. पूर्वीच्या काळी लग्नाच्या पत्रिकेत ......... यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे असे लिहिले जात असे. आता पत्रिका वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जातात. परंतु विवाह संस्थेचा तो हेतू आहेच. अशा पार्श्वभूमीवर पती-पत्नी असूनदेखील हे नाते शरीरसंबंधात अडकले नाही याची काही विलक्षण उदाहरणे आहेत.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
संत तुलसीदास यांचा विवाह रत्नावली यांच्याशी झाला. त्या अतिशय सौंदर्यवती होत्या. तारुण्यात काम भावनेचा प्रचंड पगडा तुलसीदासांच्या मनावर होता. एकदा रत्नावली माहेरी गेल्या असताना त्यांच्या आठवणीने ते अतिशय व्याकुळ झाले. श्रावण महिना, पावसाळ्याचे दिवस , दुथडी भरून वाहणारी नदी यांची त्यांना काहीच पर्वा वाटली नाही. नदीकिनारी पोचल्यावर नावाड्यांनी अशा परिस्थितीत नावेतून घेण्याचे घेऊन जाण्याचे नाकारले. तेव्हा वाहत येणार्या एका मृतदेहाचा आधार घेऊन नदी पार केली. वरच्या मजल्यावर पत्नीच्या कक्षामध्ये पोहोचण्यासाठी टांगलेल्या एका दोरीचा आधार घेऊन पोचले तेव्हा ती दोरी नसून साप आहे असे लक्षात आले. हे अविचारी धाडस पाहून रत्नावली यांनी त्यांची निर्भत्सना केली. "माझ्या हाडे आणि मांस असलेल्या देहाकडे आकर्षित होऊन तुम्ही इतके साहस केले. जर याच भावनेने परमेश्वराकडे आकृष्ट झालात तर जीवन याहून कितीतरी उन्नत बनेल." पत्नीच्या या शब्दांनी जणू डोळे उघडले. तुलसीदासांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. आता फक्त ईश्वराची उपासना सुरू झाली. संत तुलसीदास यांनी रामचरितमानस या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली.
बंगालमधील कामारपुकूर येथे जन्मलेले श्री रामकृष्ण परमहंस हे बालवयापासूनच विरक्त होते. त्यांनी लौकिक आयुष्यात रमावे यासाठी त्यांच्या मातापित्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु वैराग्यभाव काही पालटला नाही. शेवटी याचे लग्न करून दिले तर हा संसारात रमेल म्हणून लग्नाचे प्रयत्न सुरू झाले. श्री रामकृष्णांनी स्वतः जयरामवाटी या खेड्यात 'सारदा' नावाची छोटी मुलगी आहे तिच्याशी माझा विवाह करून द्या असे सांगितले. श्री रामकृष्ण आणि माता सारदा यांचा विवाह झाला. परंतु दोघांचीही आध्यात्मिक उंची अलौकिक होती. पती-पत्नी असूनही कधीही त्यांचा शरीरसंबंध आला नाही. श्री रामकृष्ण कामिनी कांचनापासून शब्दशः दूरच राहिले. इतकेच नव्हे तर आपल्या पत्नीची त्यांनी मातेच्या स्वरूपात पूजा देखील बांधली.
१९२० मध्ये जयप्रकाश नारायण यांचा प्रभावती यांच्याशी विवाह झाला. याच काळात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींचे स्थान अधिकाधिक उंचावत गेले. जनसामान्य त्यांच्याभोवती आकर्षित झाले. यामध्ये प्रभावतीदेखील आकर्षित झाल्या. गांधीजींच्या आश्रमात त्या राहू लागल्या. त्यांच्या विचारांचा खोलवर प्रभाव प्रभावतींच्या मनावर पडला. यातूनच त्यांनी १९२८ मध्ये ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा वयाच्या २२व्या वर्षी केली. जयप्रकाश यांच्याशी विचार विनिमय न करता ही प्रतिज्ञा त्यांनी घेतली हे समजताच गांधीजींऐ प्रभावतींना जयप्रकाश यांच्याशी विचारविनिमय करण्यास सांगितले. प्रभावतीची जयप्रकाशांना याबद्दल पत्र लिहिले. परंतु जयप्रकाश यांनी अशा गोष्टींची पत्राद्वारे चर्चा होऊ शकत नाही असे कळवून या निर्णयासंबंधीची आपली नाराजी कळविली. ही नाराजी लक्षात घेऊन पुढे त्यांनी दुसरा विवाह करावा अशी चर्चा प्रभावतीजींनी केली. परंतु जयप्रकाश यांना ते मान्य झाले नाही. पत्नीने आपल्या संमतीविना जरी ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा घेतली असली तरीदेखील आपली नाराजी दूर ठेवून त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात आचरणात आणला.
पहिल्या दोन उदाहरणात अध्यात्मिक पार्श्वभूमीचे पती-पत्नी असल्याने त्यांचे उदाहरण वेगळे आहे. परंतु जयप्रकाश यांच्या उदाहरणाचे महत्त्व वेगळे आहे. अशा पती-पत्नीच्या अलौकिक जोड्या या अपवादच आहेत. त्या नियम सिद्ध करतात.
सुधीर गाडे, पुणे
एकमेकांच्या सहवासात ...एकमेकाचा उत्कर्ष होणे... आपुलकी जिव्हाळा प्रेम विश्वास यामुळेच या नात्याला साता जन्माचं नातं असं असे म्हणतात सुंदर लेखन केले सर 🙏
ReplyDeleteहोय सर.
Deleteधन्यवाद!🙏