आनंद लुटण्याचा प्रकार

         आनंद सर्वच प्राणीमात्रांना होतो. पण मानवाचे वेगळेपण असे की त्याला आनंद घेण्याचे विविध प्रकार आणि साधने माहिती आहेत. तसेच मानवाने आपली बुद्धिमत्ता, सृजनशीलता यांच्या आधारावर त्याने आनंदाची नवनवीन साधने निर्माण केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून माणूस विविध प्रकारे आनंद मिळवू शकतो. 

         आनंद मिळवण्याचे किंवा लुटण्याचे प्रकार वयोमानानुसार बदलत जातात. वय, अनुभव, पार्श्वभूमी यामुळे यात वेगवेगळ्या प्रकारचे स्तर होत जातात. 


    ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)

      समुद्राचे अथांगपण जवळपास सर्वच माणसांना भावते‌. समुद्रकिनारी गेल्यावर बहुतेक सगळ्यांनाच समुद्रात डुंबण्याची इच्छा होते. पण अगदी लहान वयातील मूल ज्यावेळी समुद्रकिनारी जाते त्यावेळी ते बावरून जाते. पण पाण्याचे आकर्षण हे असतेच. पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा त्या मुलाला होते. आईवडील अथवा कोणी नातेवाईक अशा लहान मुलाला घेऊन समुद्राच्या अगदी काठावर उभे राहतात. थोड्याच पाण्यात त्याला नेतात. समुद्राच्या लाटा पायांवर येऊन आदळतात आणि परत जातात. लहान मुलाला याचे अप्रूप वाटते. थोड्या वेळाने या लाटांना सरावलेले मूल तिथेच लाटांवर किंवा लाटांबरोबर उड्या मारू लागते. अंगी भरपूर उर्जा असल्याने पुन्हा पुन्हा उड्या मारत राहते. तसेच या वयात लाटांचा आनंद घेण्याचा तोच एक प्रकार माहिती असल्याने आणि उपलब्ध असल्याने ते बराच काळ अशा उड्या मारत, हसत खिदळत, आनंद घेत राहते. सोबतच्या वडिलधाऱ्यांना सुरूवातीला कौतुक वाटते पण काही वेळाने यातल्या तोचतोचपणामुळे कंटाळा यायला लागतो.‌तसेच वयोमानानुसार उर्जा, उत्साहदेखील कमी असतो. मग सुरूवातीचे कौतुक हे कटकटीत रूपांतरित होण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा जबादारीचा ताण वाढवणारेदेखील असते. 

      पण याच समुद्र किनाऱ्यावर जर तरूण तरूणी असतील तर ते बिनधास्तपणे समुद्रात शिरतात. मोकळेपणाने डुंबू लागतात. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागतात. या किनाऱ्यावर होड्या, मोटरबोटी, समुद्री खेळांची साहसी साधने असतील तर हा पर्यायदेखील हा युवा वर्ग अनुभवून पाहतो. नवनवीन अनुभव घेतो. उपलब्ध साधने, परिस्थिती यात काही प्रयोगही करतो. त्याच्यावर दुसऱ्याच्या जबाबदारीचा ताण नसतो. तारूण्याची उर्जा अंगात असल्याने थोडी बेफिकिरीदेखील असते. 

      याच समुद्रकिनारी वृद्ध व्यक्ती असेल तर ती अगदी जपून वावरते. पाण्यात केवळ पाय बुडवण्याच्या आनंदावर समाधान मानते. जुन्या आठवणींना उजाळा देत राहते. सोबतच्या लहानमोठ्यांची काळजी करत राहते.

       आनंद देणारा समुद्र एकच पण तो घेण्याचे प्रकार वेगवेगळे. वय, वृत्ती,मनस्थिती या प्रमाणे आनंद घेण्याचा प्रकार मात्र बदलतो.

      आनंद घेण्याचा प्रकार व्यक्तिच्या मानसिक स्थितीनुसारदेखील बदलतो. उदाहरणार्थ झाडावर एखादा पक्षी बसला आहे तो मधुर स्वरात कूजन करत आहे. अशावेळी एखाद्या मांसाहारी व्यक्तिला तो पक्षी मारून त्याचे मांस खाण्यातून आनंद मिळवावा वाटेल तर एखाद्या प्रेमिक व्यक्तिला त्या पक्षाला पाहून आपल्या प्रिय व्यक्तीच्या आवाजाची आठवण येईल. 

       याबरोबरच एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आनंद कशात आहे. स्वामी विवेकानंद यांंनी एका व्याख्यानात असे म्हटले आहे की, " मानवजातीच्या दोन शाखांनी आनंद मिळवण्याच्या दोन पद्धती शोधून काढल्या. प्राचीन ग्रीकांंनी आनंद हा बाहेर म्हणजे सृष्टीमध्ये शोधायला सुरुवात केली. ते सृष्टीच्या भव्यतेने, सौंदर्याने भारून गेले आणि ते सृष्टीत सौंदर्य शोधू लागले. पण प्राचीन भारतीयांनी आनंदासाठी स्वतःच्या अंतरंगात शोधायला सुरुवात केली. त्यातून योग , प्राणायाम, ध्यान धारणा यांचा विकास झाला. अंतरंगात आनंद शोधण्याची ही पद्धत काळाच्या कसोटीवर टिकून राहिली. त्यामुळे आपण आनंदरूप आहोत हे लक्षात घेऊया." 


सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. योग , प्राणायाम, ध्यान धारणा तसेच नामस्मरण, जप जाप्य इत्यादी गोष्टीमुळेच आपली ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती अनेक परकीय आक्रमणांपुढे टिकून राहिली आहे.
    थोडक्यात परंतु अतिशय सुंदर रित्या आनंदाचे विवरण.
    धन्यवाद सर.

    ReplyDelete
  2. आनंदाच्या डोही आनंद तरंग.... प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी... डोकं स्थिर एकांत आणि शांतता ही देखील किती आनंद देऊन जाते... सुंदर लेखन केलं सर🙏🙏

    ReplyDelete
  3. अत्यंत सुरेख 'चिंतन'.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख