छ. शिवराय : अखिल भारतीय दृष्टी

     भारताचा मध्ययुगीन इतिहास लिहिताना तुर्क, पठाण, मोगल, इंग्रज, फ्रेंच इत्यादी लुटारू आक्रमकांच्या दृष्टीने लिहिला गेल्याचे आढळते. त्यामुळे ही तत्कालीन आक्रमक मंडळी छ. शिवाजी महाराजांना बंडखोर, लुटारू अशी विशेषणे वापरत असत. जणू काही ते स्वतःच इथले मालक आहेत असा हा आविर्भाव. चोराच्या उलट्या बोंबा त्या ह्याच! छत्रपती शिवरायांचा लढा हा भूमिपुत्रांचा लढा असून तो स्वातंत्र्यलढा आहे ही भूमिका त्यांनी कधीच मान्य केलेली दिसत नाही. तसेच महाराजांचे विचार, दृष्टी महाराष्ट्रपुरती किंबहुना त्यांच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्राच्या, तामिळनाडूच्या आणि कर्नाटकाच्या काही भूमिपुरती मर्यादित होती अशीदेखील समजूत दिसते.

            ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)

 परंतु महाराजांची दृष्टी ही केवळ आपल्या ताब्यातील भूप्रदेशाएवढीच मर्यादित नव्हती तर ती अखिल भारतीय होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याचे अनेक पुरावे देता येतील. ॲबे बार्तुलमी कॅरे नावाचा एक युरोपियन प्रवासी शिवाजी महाराजांच्या जीवित काळात दोन वेळा भारतात प्रवास करण्यासाठी आला होता. त्याने आपल्या आठवणी, तसेच आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात त्याने चौल येथील महाराजांच्या सुभेदारांशी, रावजी सोमनाथ यांच्याशी, झालेला संवाद लिहून ठेवला आहे. त्याने जेव्हा रावजी सोमनाथ यांना विचारले की , "तुमच्या महाराजांचे उद्दिष्ट काय?" त्यावेळी रावजी सोमनाथ यांनी यांनी उत्तर दिले की , "आमचे महाराज अतिशय बुद्धिमान , महापराक्रमी आहेत. त्यांना सिंधू नदीच्या पश्चिमतीरापासून ते गंगेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश स्वराज्यात आणायचा आहे." म्हणजेच खंबायतच्या आखातापासून ते बंगालच्या पलीकडचा प्रदेश महाराजांना अपेक्षित आहे. याचेच वर्णन वेगळ्या शब्दांमध्ये 'अहत तंजावर ते तहत पेशावर' या शब्दांत केलेले आढळते. 

       महाराजांचे दुसरे पुत्र छ.राजाराम पालथे जन्माला आले. हा अपशकून झाला असे तत्कालीन समजुतीनुसार सगळ्यांना वाटले. पण महाराजांना ही बातमी कळताच ते उद्गारले, " पुत्र पालथा जन्मला तो दिल्लीची पातशाही पालथी घालील." यातून  अपसमजुतींना न मानणे हे जसे दिसते तसेच महाराजांचे उद्दिष्ट दिल्ली जिंकण्याचे होते हे देखील स्पष्टपणे समजते. 

       १६६५ मध्ये औरंगजेबाच्या हुकुमाने मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रावर प्रचंड फौजेनिशी चालून आला त्यावेळी, " मी तुमच्या चाकरीत येतो. आपण दोघे मिळून दिल्ली जिंकूया. तुम्ही दिल्लीवर राज्य करा." अशा आशयाचे पत्र महाराजांनी जयसिंगाला पाठवले हे लक्षात घेतले पाहिजे.

      धर्मवेड्या औरंगजेबाने १६६९ मध्ये हिंदूंची मंदिरे पाडण्याचा हुकूम सोडला. उत्तर भारतातील काशी, मथुरा यांसह अनेक ठिकाणची अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यावेळी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून याबाबत त्याची कानउघाडणी केली. यातूनही महाराजांना आपल्या ताब्यातील भूप्रदेशाशिवाय भारतभराचा विचार करायचा होता हे दिसून येते.

       बुंदेलखंडातील मुघलांच्या अत्याचार आणि आक्रमणाला कंटाळून छत्रसाल महाराजांच्याकडे चाकरी करण्याच्या उद्देशाने १६६७ मध्ये आले. परंतु महाराजांनी त्यांच्यातील क्षमता , त्यांच्या कुळाची परंपरा लक्षात घेऊन त्यांना स्वतःच संघर्ष करण्याचा सल्ला दिला. यातून आपले स्वतःचे स्वतंत्र राज्य तुम्ही उभे करू शकता असे सांगितले. आपल्या जवळची तलवार छत्रसालांना भेट दिली. या सर्व प्रसंगांने प्रेरित होऊन छत्रसालांनी बुंदेलखंडात स्वतःचे राज्य पराक्रमाने उभे केले. 

        या सर्व घटना तसेच आणखी काही प्रसंग लक्षात घेतले की महाराजांची दृष्टी ही अखिल भारतीय स्वरूपाची होती हे सहजच लक्षात येते. हिंदवी स्वराज्याचा लढा देशाच्या काही भूभागापुरता सीमित आहे असे ते मानित नव्हते हे नि:संशयपणे लक्षात येते. महाराजांचे हे भव्य दिव्य ध्येय लक्षात घेतले की समर्थ रामदासांचे वचन आठवते,

 ' उत्कट भव्य तेची घ्यावे| मिळमिळीत अवघेची टाकावे| निस्पृहपणे विख्यात व्हावे| भूमंडळी||'.

     छत्रपती शिवरायांच्या युगप्रवर्तक जीवनातून सर्व काल प्रेरणा मिळत राहील. ती हेच शिकवीत जाईल की आपले ध्येय हे भव्य,दिव्य असेच असले पाहिजे. ते साकार करण्यासाठी कठोर परिश्रम, साहस, उदारता, कल्पकता अशा अनेक गुणांचे आपण अंगिकार केला पाहिजे. 

धन्य धन्य छ. शिवराय!  धन्य धन्य ती उदात्त प्रेरणा!

सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. छत्रपती महाराज हे दूरदृष्टी ठेवून राज्य करणारा राजा होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सद्गुरू सहाय्य आणि संत सज्जनांचे आशीर्वाद हे शिवरायांना वेळोवेळी लाभले. असा जाणता राजा आपल्याला लाभला हे आपले महाराष्ट्राचे भाग्यच

    ReplyDelete
  2. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा या भूतलावर पुन्हा होणे नाही... आणि त्यांच्या महाराष्ट्रात जन्म घेणे हे प्रत्येक मराठी माणसाचे परमभाग्य... सुंदर लेख सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख