भारतीयांच्या बदललेल्या सवयी
आपल्या प्राचीन देशात अनेक सवयी, पद्धती हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत. परंतु गेल्या काही काळात या पद्धतींमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात अशा काही बदलांचा विचार आपण करूयात.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
एखादी व्यक्ती भेटल्यानंतर तिला हात जोडून नमस्कार करणे ही आपली भारतीय पद्धत आहे. परंतु पाश्चात त्यांच्या विशेषतः इंग्रजांच्या प्रभावामुळे आता हस्तांदोलन हे सर्रास रूढ झाले आहे. हस्तांदोलन केले नाही तर आपण त्या व्यक्तीचा सन्मान केला नाही असेदेखील काही जणांना वाटते. वेगळा मुद्दा म्हणजे कोरोना काळात हस्तांदोलन टाळा असे सांगितले जात होते.
अभिवादन करण्याच्या विविध पद्धती भारतात प्रचलित आहेत. त्यातील भेटलेल्या माणसाला राम राम म्हणणे ही पद्धत बहुदा सर्वात जास्त प्रचलित आहे. परंतु आता याची जागा विशेषतः तरुण पिढीमध्ये हाय हॅलो या शब्दांनी घेतल्याचे दिसून येते. मी ११-१२ वीत शिकत असताना माझ्या एका मित्राने त्याच्या दुसऱ्या एका मित्राची एकदा ओळख करून दिली. त्याला मी नमस्कार म्हणालो तर त्या दोघांनाही ते वेगळेच वाटले होते.
अशीच गोष्ट बसण्याच्या, जेवण्याच्या सवयींबाबत लक्षात येते. पूर्वी सर्वजण मांडी घालून बसत असत. तसेच जमिनीवर मांडी घालून बसून जेवण्याची पद्धत होती. आता मात्र शाळा महाविद्यालयातील तरुणांनादेखील मांडी घालून बसण्याची सवय नसते. तासभर मांडी घालून बसणे त्यांना अवघड जाते. जेवण देखील आता बऱ्याच प्रमाणात टेबल खुर्चीवर बसून करण्याची पद्धत रूढ झाली आहे. तसेच हाताने जेवण्याऐवजी काटे, चमचे यांचाही उपयोग रूढ झाला आहे. प्रसिद्ध मराठी साहित्य दिवंगत पु. ल. देशपांडे यांनी गमतीने असे लिहिले आहे की दुसऱ्या महायुद्धापूर्वी माणसे जेवून उठत असत नंतर ती उठून जेवू लागली. पूर्वीच्या लग्न,समारंभामध्ये देखील मांडी घालून पंगती लोक बसत आणि जेवायला वाढले जाई. परंतु आता जवळपास सर्व ठिकाणी बुफे पद्धत आढळते. हे चित्र पुलंच्या वाक्याप्रमाणे दिसते.
मध्यंतरी एक परिचित कार्यकर्ते सांगत होते की त्यांच्याकडे सुट्टीसाठी आलेल्या नातवंडांना भारतीय पद्धतीच्या स्वच्छतागृहाचा वापर करता आला नाही. कारण त्यांना त्याची सवय नाही. आता बऱ्याच ठिकाणी पाश्चात्य पद्धतीची स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हादेखील सवयीतला बदल आहे.
वेशभूषेच्या बाबतीत भारतात मोठी विविधता आहे. परंतु आता विशेषतः पुरुषांमध्ये पॅन्ट शर्टचा प्रसार सगळीकडे झालेला दिसतो. तर महाविद्यालयीन युवतींमध्ये देखील पॅन्ट शर्टचे प्रमाण वाढलेले दिसते. एक निरीक्षण म्हणजे लग्नसमारंभात नवरा मुलगा सूटबूट घातलेला आणि नवरी मुलगी शालू किंवा पैठणी नेसलेली असे चित्र सर्रास दिसते. पुलंनीच आणखी एके ठिकाणी म्हटले की जोपर्यंत कंपनी इंग्रजी साहेबाकडे होती तोपर्यंत कारकून मंडळी धोतर, कोट घालून येत आणि जशी मालकी भारतीय माणसाकडे आली तसे शर्ट पँट घालून येणे सुरू झाले.
मोबाईल फोनवर संदेश लिहिण्यासाठी भारतीय लिपीचा वापर होण्याऐवजी रोमन लिपीच मोठ्या प्रमाणावर वापरली जाते असेदेखील दिसते.
'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे ' अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊया' ही आपली परंपरा आहे. त्यामुळे दीपप्रज्वलन हे महत्त्वाचे मानले गेले आहे. परंतु आता वाढदिवसाला औक्षण करण्याच्या जागी मेणबत्त्या विझवणे, केक कापणे बऱ्याच ठिकाणी अनुभवायला येते.
भारतीय पंथ , संप्रदाय हे पुनर्जन्म संकल्पना मानणारे आहेत. त्यामुळे मृत व्यक्तिच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी सदिच्छा व्यक्त करण्याची पद्धत मागे पडून त्याला शांती लाभो हे पाश्चात्य वळणाचे वाक्य सर्रासपणे वापरले जाते.
सवयीतला हा बदल म्हणजे काळाबरोबर जुळवून घेणे आहे की स्वत्व हळूहळू सोडणे आहे हा चर्चेचा मुद्दा आहे.
स्वामी विवेकानंद एका आपल्या मित्राला म्हणाले , " अरे, कामाच्या ठिकाणी पाश्चात्य वेशभूषा करावी लागते असे असले तरी घरी भारतीय पद्धतीचा वेश नक्कीच घालता येईल." हा प्रसंग लक्षात घेऊन सण, समारंभात भारतीय सवयी, परंपरा जपण्याची खटपट आपल्याला नक्की करता येईल.
सुधीर गाडे पुणे
अरे, कामाच्या ठिकाणी पाश्चात्य वेशभूषा करावी लागते असे असले तरी घरी भारतीय पद्धतीचा वेश नक्कीच घालता येईल."... अगदी बरोबर आहे... छान माहिती सादर केली सर..
ReplyDeleteआठवण करून देणे काळाची गरज.....
Deleteधन्यवाद!
Delete