सश्रद्ध शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सश्रद्धपण! ईश्वरी अस्तित्वावरती , त्याच्या सगुण साकार रूपांवर महाराजांची निरतिशय श्रद्धा होती.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
आपले कार्य हे ईश्वरी कार्य आहे याच्यावर महाराजांची अभंग श्रद्धा अगदी लहानपणापासून होती. १६४५ मध्ये दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांचे अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे , "हे राज्य व्हावे असे श्रींचे मनात फार आहे. पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन करून तो आम्हास यश देणार आहे." यावेळी शिवराय फक्त पंधरा वर्षांचे होते हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु इतक्या लहान वयातच त्यांना आपल्या ईश्वरी कार्याचा साक्षात्कार झाला होता आणि ईश्वरी कृपेने हे कार्य सिद्धीस जाणार आहे यावर त्यांची ठाम श्रद्धा होती हे सहजपणे समजते.
अफजलखानाचे स्वराज्यावरील आक्रमण प्राणांतिक संकट होते. यावेळी वय, अनुभव, फौजफाटा, धनसंपत्ती या सर्वात शिवराय तुलनेने कमी होते हे लक्षात घेतले पाहिजे. अफजलखान हा त्या काळातील अतिशय प्रसिद्ध , कसलेला मुरब्बी सेनापती आणि धूर्त, कपटी , दगलबाज राजकारणी होता. त्यामुळे या भेटीतून नेमका काय प्रकार घडेल याबद्दल साशंकता होती. तेव्हा एके दिवशी शिवरायांनी सर्वांना सांगितले की, "आम्हाला भवानी मातेचा साक्षात्कार झाला आहे आणि ती आम्हाला अपेक्षित यश देणार आहे."
प्रतापगड नव्याने बांधून काढल्यानंतर शिवरायांनी खास गंडकी नदीतून मागवलेल्या शिळेमधून भवानी मातेची मूर्ती तयार करून घेतली. तिचे मंदिर उभारले. देवीची नित्य पूजा,अर्चा सतत चालू राहील याची व्यवस्था केली.
शाहिस्तेखान पुण्यातच जवळपास तीन साडेतीन वर्षे ठाण मांडून बसला होता. जणूकाही स्वराज्याला विळखा घालून बसलेला प्रचंड, सुस्त अजगरच. परंतु स्वतः छापा मारून त्याचा निप्पात करावा हे धाडस शिवरायांनी दाखवले कारण भगवान शंकराचा तसा साक्षात्कार त्यांना झाला होता. ( याचा उल्लेख काही समकालीन युरोपीय पत्रांमध्ये आढळतो.)
शिवरायांनी साधू, संत, बैरागी यांना ठिकठिकाणी केलेली मदत तर प्रसिद्धच आहे. अध्यात्मिक उन्नती गाठलेल्या व्यक्तींपुढे ते अतिशय श्रद्धा भावाने नम्र होत. अशा व्यक्तींना ते आवश्यक ती सर्व मदत देऊ करत असत. राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली. या मोहिमेत अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी पाडलेल्या देवळांचा महाराजांनी जीर्णोद्धार केला. तेथील पूजा अर्चा नित्य सुरू रहावी यासाठी दाने दिली.
महाराजांच्या सश्रद्धपणाचे असे आणखी काही प्रसंग सांगता येतील. ज्याची श्रद्धा अशी अभंग असते त्याला देव आणि दैवही सहाय्यक होते.
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे.
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।
याचा एक अर्थ असा होतो की अधिष्ठान, कर्ता , कार्य, ( कार्यसिद्धी व्हावी यासाठी) विविध प्रयत्न जेथे असतात तेथे पाचवे दैव प्रसन्न होते आणि कार्य पूर्ण होते.
महाराजांच्या कार्यामागे ईश्वरी श्रद्धेचे अधिष्ठान होते, विलक्षण कर्तृत्व असलेले शिवराय हे कर्ते, हिंदवी स्वराज्याची स्थापना हे कार्य, महाराजांनी केलेले वेगवेगळे नवनवीन प्रकारचे विविध प्रयत्न हे चार घटक असल्यानेच दैवही महाराजांना सहाय्यभूत झाले.
शिवरायांच्या जीवनातील अनेक विलक्षण प्रसंग बघितले की हा श्लोक मध्ययुगात महाराजांइतका कोणालाच लागू पडत नाही हे निश्चितच लक्षात येते. या युगपुरूषाला त्रिवार वंदन!
सुधीर गाडे, पुणे
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे.
ReplyDeleteअधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।
याचा एक अर्थ असा होतो की अधिष्ठान, कर्ता , कार्य, ( कार्यसिद्धी व्हावी यासाठी) विविध प्रयत्न जेथे असतात तेथे पाचवे दैव प्रसन्न होते आणि कार्य पूर्ण होते. सुंदर माहिती दिली सर🙏
सर, धन्यवाद!
Deleteअधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
ReplyDeleteविविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।
खरंय, 👍
होय.
Deleteजपून ठेवावा व लहान मुलांना आवर्जून सांगावा असा लेख. अशा प्रकारच्या सत्य गोष्टी मधूनच संस्कारी पिढी तयार होते. आणि राजांचे अंगी एवढे सदगुण होते की त्यांच्यानंतर असे व्यक्तिमत्व आज पर्यंत तरी माझ्या ऐकण्यात नाही. नेहमीप्रमाणे सरांचे लेखन अतिशय छान
ReplyDeleteधन्यवाद डॉक्टर!
Delete