शब्दांची फसगत

      काही दिवसांपूर्वी एक फलक बघितला. त्याच्यावर 'Painting by' असे लिहिले होते. फलक वाचल्यावर एकदम माझ्या मनात आले की कोणते चित्र काढले आहे निसर्ग चित्र व्यक्तीचित्र कल्पनाचित्र यापैकी कोणते चित्र आहे असे वाटून गेले पण नंतर लक्षात आले की पेंटिंग हा शब्द 'चित्र काढणे' यासाठी वापरलेला नसून 'रंग देणे' याअर्थी वापरला आहे. त्यामुळे त्या इमारतीला ज्यांनी रंग दिला आहे त्यांनी आपली जाहिरात किंवा माहिती होण्यासाठी फलक लावलेला होता.



        शब्दांची अशी काही वेळेला फसगत होते किंवा शब्दांमुळे वेगळाच बोध होतो. यामध्ये ऐकणाऱ्याची समजूत आणि सांगणाऱ्याचे म्हणणे यात अंतर पडलेले असते. त्यामुळे अशी वेळ येते.

        संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक श्री दादा लाड अनेक दशकांपासून किसान संघाचे काम करतात त्यांनी मला एकदा त्यांचा अनुभव सांगितला त्यावेळी मी धुळे जिल्ह्यात प्रचारक म्हणून काम करीत होतो धुळे जिल्ह्यात दोंडाईचा तालुक्यात मालपुर जवळ सुराय अक्कलकोट नावाचे एक गाव आहे माझ्या पूर्वी अनेक वर्ष दादा किसान संघाचे काम करीत होते त्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी त्यांच्याकडे किसान संघाचे मंत्री म्हणून जबाबदारी होती त्यांनी त्या अक्कलकोट गावामध्ये निरोप पाठवला की आमच्या दिवशी किसान संघाचे मंत्री भेटायला येणार आहेत गावातील कार्यकर्ते मंत्री येणार म्हणून अतिशय आनंदित झाले त्यांनी त्या पद्धतीने तयारी केली आणि ज्यावेळी दादा त्या गावात पोचले त्यावेळी त्या माणसाचा हिरेमोड झाला त्या माणसाला मंत्री म्हणजे सरकार मधील मंत्री एवढाच अर्थ माहित होता त्यामुळे सरकारी मंत्र्यांची गाडी त्यांचा लवाजमा अशी अपेक्षा होती परंतु दादा मात्र एका सामान्य कार्यकर्त्यासारखे त्या ठिकाणी पोचले त्यांना मंत्री म्हणजे मंत्र किंवा सल्ला देणारा अशा पद्धतीचा अर्थ त्यामध्ये अपेक्षित होता.

    काही गावे डोंगर उतारावर वसलेली असतात आणि स्वाभाविकपणे वरती खाली असे शब्द ठिकाण , पत्ता सांगताना वापरले जातात. एका कार्यकर्त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते अशा डोंगर उतारावरील गावात राहत होते. त्यांचे जुने घर हे उताराच्या खालच्या बाजूला होते. तर नवीन घर त्यांनी वरच्या बाजूला घेतले होते आणि ते दोन मजली घर होते. एका व्यक्तीला त्यांनी भेटायला बोलावले आणि सांगितले, " उद्या मी खालच्या घरी असेन." या व्यक्तीला त्यांचे नवीन घर माहीत होते आणि त्या गावात बहुधा नवखा असल्यामुळे वरचा खालचा हे भौगोलिक स्थाने दर्शवणारे शब्द म्हणून वापरले जातात हे त्याला माहिती नव्हते. त्यामुळे तो ठरल्यावेळी नवीन घरी आला आणि खालच्या मजल्यावर त्यांना शोधू लागला. ते भेटले नाहीत म्हणून फोन केला आणि थोडा वेळ संभाषण झाल्यानंतर हे लक्षात आले की 'खालच्या' या शब्दाचा अर्थ त्या कार्यकर्त्यांना 'गावातील जुने घर' असा अभिप्रेत होता. तर भेटायला आलेल्या व्यक्तीने नवीन घराचा खालचा मजला असा अर्थ घेतला होता. त्यामुळे हा घोटाळा झाला होता.

      एका राजाची गोष्ट सांगितली जाते. राजा जलक्रीडा करताना आपल्या राणीच्या अंगावर पाणी उडवायला लागला. दोघेही जलाशयामध्ये स्नानाला गेलेले होते, त्यावेळी ती म्हणाली, ‘मोदकै: ताडय l ‘ त्यावेळी तो म्हणाला, ‘मोदकै: ताडय ? अरे, कोण आहे रे तिकडे? ‘ ताबडतोब सगळे सेवक धावले. राजा म्हणाला, ‘ताबडतोब मोदक (लाडू) भरलेली ताटेच्या ताटे घेऊन या.’ मोदकाची ताटे आणल्यावर त्याने राणीच्या अंगावर एकेक मोदक(लाडू) मारायला सुरुवार केली. तेव्हा राणीने कपाळाला हात लावला. आता काय करायचे या राजाला? ‘मोदकै: ताडय ‘ म्हणजे ‘मा उदकै: ताडय l ‘ उदक म्हणजे पाणी, उदकाने, पाण्याने माझे ताडन करू नकोस. पाण्याने मला मारू नकोस. असा भाव त्याच्यामध्ये आहे. राजाला संधीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे फसगत झाली.

     ऐतिहासिक काळात पेशवे घराण्यात भाऊबंदकी सुरू झाली. राघोबादादा यांनी पुतण्या नारायणराव याला धरावे असा हुकूम गारद्यांना दिला. पण त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी ध चा मा केला आणि नारायणरावाची हत्या झाली. असे सांगितले जाते. म्हणजे शब्दातील फेरफार जिवावर बेतला.

     पूर्वी तार पाठवताना गमतीजमती होत. याची काही उदाहरणे प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी सांगितली आहेत. 'बाबूज मॅरेज फिक्स्ड विथ लिमयेज डॉटर ' याऐवजी 'बाबूज गॅरेज मिक्स्ड विथ लेमन वॉटर ' ' सेंड लंगोट ' याऐवजी ' सेंड लॉंग कोट ' अशा तारा पाठवल्या जायच्या 

      अशी शब्दांमुळे काहीवेळा फसगत होते. काहीवेळा याची गंमत वाटते तर काही वेळा त्रासही होतो.

सुधीर गाडे पुणे 

Comments

  1. आपल्या मराठी भाषेत एकाच शब्दांचे प्रसंगानुरूप अनेक अर्थ निघतात त्यामुळे अनेक वेळा ऐकणाऱ्या ची फसगत होतेच होते. विषयाची सोदाहरण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

    ReplyDelete
  2. मराठी भाषा आणि त्यातले अगणित शब्द... प्रत्येक शब्दाचा प्रसंगानुसार अर्थ बदलतो आणि आणि हीच त्या भाषेची संपन्नता... आणि सुंदर शब्दांचा खेळ... सुंदर लेखन केलं सर... 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख