सवयीबद्दल काही....

     सवय म्हणजे काय तर वयासोबत येते ती सवय असे म्हटले जाते. याबाबत अनेक प्रकार पहायला मिळतात.



        काहीवेळा गरजेतून सवय लागत असते. याबाबत प्रसिद्ध मराठी साहित्यिक द.मा. मिरासदार यांनी पुण्यातील एका जुन्या पिढीतील वक्त्यांच्या सवयीबद्दल सांगितले होते. बऱ्याच जणांना भाषणासाठी उभे राहिले की हातांचे काय करायचे हे समजत नाही. त्यावर या वक्त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला होता. ते भाषणाला येताना खूप बटन असलेला लांब कोट घालून येत असत. भाषणाला उभे राहिले की वरून एक एक बटन काढायला सुरुवात करत. शेवटचे बटन काढले की परत खालून एक एक बटन लावत ते वरच्या बटनापर्यंत येत. पुन्हा वरून एक एक बटन काढायला सुरुवात करत. हा क्रम भाषण संपेपर्यंत चालत असे.

       गरजेतून लावून घेतलेल्या सवयीचे आणखी एक उदाहरण. प्रख्यात निवेदक , मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना सतत केसातून हात फिरवायची सवय होती. त्याबद्दल बोलताना त्यांनी खुलासा केला होता की एकदा त्यांना एका तरूणीने तुमचे केस खरे आहेत की तो विग आहे असे विचारले होते. तेव्हा त्यांनी केस खरे आहेत असे सांगितले. त्यानंतर कुणालाही परत शंका वाटू नये म्हणून केसातून परत परत हात फिरवायची सवय त्यांनी लावून घेतली.

     काहीवेळा नकळत एखादी सवय लागत असते. मी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला शिकवणारे एका प्राध्यापकांना ओके म्हणायची सवय होती. आमच्या वर्गातील एकाने एकदा एका तासात ते कितीवेळा ओके म्हणाले हे मोजले होते. जवळपास २६५ वेळा एका तासात ते ओके म्हणाले होते.

         काहीवेळा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करण्यातून सवय लागते. माझ्या एका मित्राला आभाळाकडे बघून डोळे मिचकावण्याची सवय होती. त्याला एकदा याबाबत विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या दुसऱ्या एका मित्राला अशी सवय होती. त्याची चेष्टा करायची म्हणून तो असे डोळे मिचकावू लागला. पण यातून त्याला स्वतःलाच तशी सवय लागली. नंतर काही वर्षांनी प्रयत्नपूर्वक ही सवय त्याने सोडून दिली.

        नुकताच एका समितीमध्ये सहकारी विषयशिक्षकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या समितीमधील एक ज्येष्ठ शिक्षकांना बोलत असताना ' काऽय ' असं म्हणण्याची सवय आहे. या समितीतील एक शिक्षक या ज्येष्ठ शिक्षकांचे माजी विद्यार्थी आहेत. मला सहज एकदा लक्षात आले की त्यांनाही ' काऽय '  असे म्हणण्याची सवय आहे. अर्थातच ही सवय त्या ज्येष्ठ शिक्षकांच्या अनुकरणातून लागली आहे हे उघडच आहे.

      अशा या सवयी माणसाचे वेगळेपण जपतात. त्यामुळे अशी माणसे लक्षातही राहतात.


सुधीर गाडे पुणे

(लेख आवडला तर कृपया अवश्य पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नाही.)


Comments

  1. छानच लेख यावरूनच सवयीचे आपण गुलाम असतो अशी म्हण तयार झाली.

    ReplyDelete
  2. 👌🏽👌🏽
    एखादी गोष्ट केल्यावर आपणास आनंद मिळाला की नकळत नेहमीच केली जाते आपल्या वर्तणुकीचा भाग बनते .....
    यालाच सवय म्हणायचं का?

    ही सवय चांगली की मग संस्कार रूपाने पुढे येते व वाईट असेल की मग व्यसन. ...
    मग ते मोबाईल असो की आणखी काही 🙏🏽

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख