पळसनाथ मंदिराला भेट

 नुकताच सोलापूरला जाऊन आलो. बरेच वर्षे उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेले पळसनाथ मंदिराबद्दल ऐकले होते. यावर्षी ते मंदिर दुष्काळामुळे उघडे पडले आहे. सोलापूरवरून येताना ते पाहण्याची संधी आहे हे लक्षात आले. मग येताना ते पहायला गेलो.

     पळसदेव गावातून आत गेलो. चौकशी केल्यावर समजले की तो रस्ता आता बंद केला आहे. पळसदेववरून पुण्याला येताना काळेवाडी नं. १ ह्या गावाचा फाटा लागतो. तिथून मंदिरापर्यंत जाता येते अशी माहिती मिळाली. त्या फाट्यावरून आत वळल्यावर साधारण २००-३०० मीटर रस्ता बरा आहे. नंतर बॅक वॉटर साठणाऱ्या भागातून जवळपास ५-६ किलोमीटर जावे लागले. तयार रस्ता नाही. पण गाड्यांच्या येणाजाण्यामुळे वाट‌ पडली आहे. त्यातून जावे लागले. ठिकठिकाणी खड्डे आहेत. त्याचे धक्के खात खात जावे लागते. थोडेफार खड्डे चुकवता येतात. पण काहींचा प्रसाद हा मिळतोच.

 दुरून मंदिराचा कळस आणि मंदिरासमोरची भिंत दिसू लागली. मंदिरासमोरची भिंत सुमारे पन्नास फूट लांब आणि पंधरा फूट उंच आहे. तिचा जमिनीपासूनचा जवळपास सहा फूट भाग दगडी असून वरती वीटकाम केलेले आहे. आत गेल्यावर मंदिराची रचना लक्षात येते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्थानिक गावकऱ्यांनी माहितीफलक लावला आहे. त्यानुसार हे सुमारे १००० वर्षांपर्वीचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे.‌ मंडप छोटा आहे.‌ मंडप, गर्भगृह हे दगडी बांधणीचे आहे. मात्र गर्भगृहावर वीटकाम करून सुमारे तीस चाळीस फूट उंचीचा कळस बांधण्यात आला आहे. शिखरावर पाकळ्यापाकळ्यांची रचना आहे. ही सर्व रचना मात्र उत्तरकालीन वाटते.



 ‌फलकावरील माहितीनुसार याच क्षेत्रात राजा नहुष याने इंद्रपद मिळवण्यासाठी नव्य्याणव यज्ञ केले होते. परंतु शंभराव्या यज्ञापूर्वी ऋषींना स्वतःची पालखी वहायला लावून त्यांचा अपमान‌ केल्याने शाप मिळाला आणि यज्ञ पूर्ण झाला नाही. त्यामुळे इंद्रपद मिळाले नाही.

  या ठिकाणी एक झाड होते. एक कपिला गाय रोज या झाडावर स्वतः दूध देऊन अभिषेक करत असे. त्यामुळे तिच्या वासराला पुरेसे दूध मिळत नसे. गाय रोज दूध झाडाला देते हे तिच्या मालकाने पाहिले आणि ते झाड तोडण्यास सुरुवात केली. तेव्हा दृष्टांत झाला की याठिकाणी शंकराची पिंड आहे. तिथे मंदिर बांध. मग मंदिर बांधले गेले.

    मंदिरातील पिंड स्वयंभू आहे. सध्या ती व्यवस्थित लक्षात येत नाही. मंदिराच्या आवारात नदीतील मऊ वाळू, शिंपले, इ.गोष्टी साचल्या आहेत. मंडप स्तंभ अजूनही भक्कम आहेत. मात्र कळसाच्या मनोऱ्यावरील‌ विटांची झीज होऊन छोटीमोठी विवरे तयार झाली आहेत. 

फलकावर लिहिलेली अजून माहिती म्हणजे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील हे मंदिर. पुत्र प्राप्ती होण्यासाठी त्यांनी नवस केल्याची माहिती फलकावर लिहिली आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय त्यांना शाहजी आणि शरीफजी असे दोन पराक्रमी पुत्र प्राप्त झाले. त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहेच.

       वर्तमानपत्रे व समाज माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्याने गर्दी होती. लोकांची गर्दी असल्याने स्थानिकांनी भेळ, पाणीपुरी, बटाटेवडा , आइस्क्रीम, अशा पदार्थांची हॉटेल्स सुरू करून चौपाटीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. खवैय्यांचीही सोय झाली आहे. या चौपाटीशेजारी या दुष्काळातही काही पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात छोट्या होड्यादेखील दिसल्या.

        इथून थोड्या दूर अंतरावर उंचावर हेमाडपंथी मंदिर दिसले. एकाला विचारले तर ते श्रीरामाचे मंदिर आहे अशी माहिती मिळाली. पण वेळ नसल्याने तिथवर गेलो नाही.‌ 

  इथे भेट देताना वाटले की काळाचा महिमा अगाध आहे. 'काल का पहिया घूमें रे भैय्या' असे एक हिंदी भजन आहे. त्याची आठवण झाली. शेकडो हजारो वर्षांचा इतिहास या क्षेत्राला आहे. महत्त्वाच्या पौराणिक, ऐतिहासिक घटना घडल्या. पण समाजाची पाण्याची गरज वाढत गेली. ती पुरवण्यासाठी काही विचार झाला आणि धरणाची निर्मिती झाली. ती करत असताना हा ऐतिहासिक ठेवा पाण्याखाली जाणार याची कल्पना आलीदेखील असेल. पण बहुधा नाईलाजाने होणारे सर्व परिणाम स्वीकारण्याचा निर्णय झाला असेल. निर्णय अंमलात आला आणि जी तपोभूमी होती ती पाण्याखाली गेली. नित्य होणारी पूजाअर्चा बंद झाली.  अख्यायिका असलेली ही भूमी जलमग्न झाली. पण हीच कदाचित त्या पळसनाथाची इच्छा असावी. असो.


सुधीर गाडे पुणे 


लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

Comments

  1. तुमच्या लेखातून मंदिरात जाऊन आल्यासारखंच भासले.. अतिशय सुंदर सादरीकरण.. मंदिर डोळ्यासमोर उभे राहिले...

    ReplyDelete
  2. उजनी धरण backwater गेलो पण या मंदिरा विषयी आत्ता कळलं.. अर्थात लेखातून. ,.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख