समासाच्या निमित्ताने...
काही महिन्यांपूर्वी इ.१२ वीच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून काम करत होतो. काम करताना एक गोष्ट पुन्हा लक्षात आली की बरेच विद्यार्थी उत्तरपत्रिका मिळाली की पानांवर असलेल्या समासाशेजारी आणि पानाच्या कडेला वर खाली पेन्सिलने आखून उत्तर लिहिण्यासाठी चौकट तयार करत होते. काहीजण तर उजवीकडे जवळपास एक इंचाचा समास आखत होते. खरं तर उत्तरपत्रिकेत छापलेला समास पुरेसा असतो. पण उत्तराच्या सजावटीसाठी कुणाच्यातरी डोक्यातून ही कल्पना निघाली आणि आता ती बरीच रूळली आहे. अशी चौकट असल्याने उत्तरपत्रिका दिसताना चांगली दिसते आणि तपासताना परीक्षकाकडून जास्त गुण मिळतात अशी समजूत बहुधा पसरली आहे. पण या सगळ्यात कागद किती वाया जातो हे मात्र लक्षात घेतले जात नाही. तसेच गुण देताना उत्तराचा आशयच लक्षात घेतला जातो. अगदी अपवादात्मक परिस्थितीत सजावट विचारात घेतली जाते. हे काही ध्यानात घेतले जात नाही. मध्यंतरी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एक फार बोधप्रद वाक्य ऐकण्यात आले. ते म्हणतात, " आशयगर्भ लेखनाला सजावटीची गरज नसते." हे अर्थपूर्ण वाक्य खरे तर सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला तर अशा समांसांच्या चौकटीची फार आवश्यकता नाही हे समजते. ही सवय लावून घेतली तर कागदाचीही बचत होईल.
(छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
मध्यंतरी एक बातमी होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुख्य उत्तरपत्रिकेला लावण्यासाठीच्या पुरवण्या बंद करून जास्त पानांची उत्तरपत्रिका द्यायला सुरुवात केली. यातून उत्तरपत्रिकेला लावलेल्या पुरवण्या गहाळ झाल्याने होणारे नुकसान टळेल. तसेच गैरप्रकारांना आळा बसेल असेही सांगितले गेले. हा निर्णय तसा विद्यार्थी हिताचा वाटतो पण त्यासाठी आपण केवढी मोठी किंमत मोजतो आहोत हे बहुधा लक्षात घेतलेले दिसत नाही. कारण काही विद्यार्थ्यांना ही पाने खूप जास्त होतील आणि ती अंतिमतः वाया जातील. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांची दीर्घोत्तरे लिहायची सवय कमी झालेली आढळून येते आहे. हे सर्वसाधारण निरीक्षण लक्षात घेतले की जास्त पानांच्या उत्तरपत्रिकेतील काही पाने वाया जाणार हे उघडच आहे. केवळ पैशाच्या रूपात ही किंमत मोजून उपयोग नाही तर याचा पर्यावरणावर होणारा परिणामदेखील लक्षात घेतला पाहिजे. हा परिणाम लक्षात घेतला तर किंमत किती मोठी आहे हे नक्की समजेल.
असाच एक मुद्दा शाळा महाविद्यालयांमध्ये असलेल्या पर्यावरणशास्त्र या विषयाचा. या विषयामध्ये नैसर्गिक संपत्ती किंवा कागद यांचा जपून वापर करायला शिकवले जाते. नकार, बचत आणि पुनर्वापर ( रिफ्यूज, रिड्यूस, रिसायकल ) अशी त्रिसूत्री सांगितली जाते. पण विरोधाभास हा की या विषयासाठीचे प्रकल्प तयार करताना मात्र कागद मोठ्या प्रमाणावर वापरला जातो कारण नक्कल करा, छापा, कापा, चिकटवा (कॉपी, प्रिंट, कट ,पेस्ट) असे मोठ्या प्रमाणावर केले जाते. म्हणजे शिकवण आणि कृती यामध्ये अंतर पडते. नुकसान पर्यावरणाचेच होते.
अजून एक गोष्ट म्हणजे शाळा महाविद्यालयात लिखाणकामावरही भर दिला जातो. वह्या, प्रयोगवही, गृहपाठ यासाठी मोठ्या प्रमाणावर कागद वापरला जातो. पूर्वी वह्यांची कोरी राहिलेली पाने वापरून वह्या तयार केल्या जात. वापरल्या जात. आता हे प्रमाण तसे कमी झाल्याचे दिसून येते. शाळा महाविद्यालयातील उत्तरपत्रिका इ. ठराविक पद्धतीने नष्ट करून त्याचा कागद करून पुन्हा वापरला जातो. पण एकूण कागद वापराच्या तुलनेत याचे प्रमाण कमी आहे. एकूणात काय की कागद फार वाया जातो.
ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन काही सकारात्मक बदल नक्कीच करता येऊ शकतात. चांगल्या सवयी आत्मसात करता येतील. कागदाचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करता येऊ शकतो.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
विचार करायला लावणारा लेख 👌
ReplyDeleteसर धन्यवाद!
Deleteआशयगर्भ लेखनाला सजावटीची गरज नसते. आपण फार उत्तम उदाहरण दिली आहेत आणि शाळेमध्ये नक्कीच पर्यावरण शास्त्रामध्ये या गोष्टीचा विचार करण्याजोग आहे. जेणेकरून मुलांचा पर्यावरण कडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल🙏🏻🙏🏻
ReplyDelete🙏🙏🙏
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete