रामायणावरील दिनदर्शिका आणि चित्रफीत निर्मितीची गोष्ट
५०० वर्षांच्या अविरत संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर होत असताना भारतात आणि जगभरात श्रीराम भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. त्यातील एक होते श्री सतीशजी, श्री. श्रीरंग, श्री. मुकुंद हे कुलकर्णी बंधू आणि त्यांच्या भगिनी सौ. उमा सामंत . मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किन्हई या गावातील असलेल्या कुलकर्णी कुटुंबीयांनी आपला मोठा उद्योग उभा केला आहे. औद्योगिक जगताबरोबरच सामाजिक कार्यातदेखील हे कुटुंब अग्रेसर आहे. कुलकर्णी कुटुंबांमध्ये रामभक्ती पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यांनी किन्हईतील श्रीराम पट्टाभिषेक मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी केला आहे. श्री. सतीशजी कुलकर्णी आणि त्यांचे बंधू यांचे भरघोस सहकार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला नियमितपणे होत असते.
( दिनदर्शिकेचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यांचे छायाचित्र )
२०२० मध्ये श्री. सतीश कुलकर्णी यांनी रामायणावर आधारित एक दिनदर्शिका बनवायची आहे असा आपला मानस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष आर्कि. राजीवजी सहस्रबुद्धे यांच्या कानावर घातला. भारतीय कालगणना आणि ग्रेगरियन कालगणना यांचा एकत्रित उल्लेख असलेली अनेक वर्षे वापरता यावी अशी, टेबलावर ठेवता येण्याच्या स्वरूपातील दिनदर्शिका श्री कुलकर्णी यांना तयार करायची होती. त्यामध्ये रामायणातील वेगवेगळ्या प्रसंगातील चित्रे आणि ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेल्या गीतरामायणातील ओळी छापायच्या अशी त्यांची कल्पना होती. या ओळी छापण्यासाठी त्यांनी गदिमांचे नातू श्री. सुमित्र माडगूळकर यांची परवानगी घेतली होती. अशी दिनदर्शिका कुलकर्णी कुटुंबीयांनी प्रकाशित करावी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आवश्यक ते सहकार्य करावे असे ठरले. आता शोध सुरू झाला तो रामायणामधील सुयोग्य अशा चित्रांचा.
( स्वामी गोविंद देव गिरी यांचे आशीर्वाद )
याच दरम्यान अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी संकलन सुरू होते. श्री जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या या ट्रस्टचे कोषाध्यक्ष पूजनीय गोविंद गिरीजी महाराज यांची भेट खटपट करून २९ जानेवारी २०२१ यादिवशी आम्ही मिळवली. स्वामीजींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. याप्रसंगी कुलकर्णी कुटुंबियांच्या वतीने अयोध्येतील मंदिरासाठी भरघोस देणगीही देण्यात आली. तसेच किन्हईतील मातीदेखील राममंदिराच्या पायात घालण्यासाठी स्वामीजींकडे सोपविण्यात आली. या भेटीच्या वेळी स्वामी गोविंद देव गिरी यांनी रामायणातील प्रसंगांवर आधारित चांगली चित्रे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या संग्रहात आहेत असे सांगितले. ती तुम्ही यासाठी वापरावीत अशी सूचना केली. त्यानंतर मी विवेकानंद केंद्राचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.विश्वासराव लपालकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी श्री. डी भानुदास यांच्याशी बोलून आवश्यक ती परवानगी दिली आणि सर्व चित्रे उपलब्ध करून दिली. आता दिनदर्शिका छफाईचे काम मार्गी लागले होते.
याच दरम्यान श्री.सहस्रबुद्धे यांनी श्री. कुलकर्णी यांना लहान मुलांना समजेल अशी रामायणावर आधारित ध्वनीचित्रफीत बनवण्याची सूचना केली. ही सूचना श्री. कुलकर्णी यांना आवडली आणि त्यासाठी आर्थिक सहकार्य देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
लहान मुलांना समजेल अशा स्वरूपात रामायणाची गोष्ट लिहिणे, तिचे ध्वनिमुद्रण करणे आणि विवेकानंद केंद्राची चित्रे वापरून ध्वनीचित्रफीत तयार करणे असे ठरले. ध्वनिमुद्रणासाठी श्री. सुमित्र माडगूळकर यांची त्यावेळी इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली कन्या आणि गदिमांची पणती कु. पलोमा हिचा आवाज वापरण्याचे ठरले. तिच्या आई सौ.प्राजक्ता यांनी गोष्ट लिहिली. कु. पलोमा हिची तयारी करून घेऊन म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागातील स्टुडिओत ध्वनिमुद्रण करण्यात आले. श्री.कुलकर्णी यांचे परिचित आणि प्रसिद्ध कलाकार श्री.रवींद्र खरे यांनी या ध्वनीचित्रफीतीसाठी संगीत दिले.
दिनदर्शिका छपाई आणि ध्वनी चित्रफीत निर्मिती ही अतिशय उत्तम दर्जाची करण्यात आली आणि रामनवमीच्या मुहूर्तावर दिनांक १३ एप्रिल २०२१ या दिवशी या दोन्हीचे प्रकाशन छोटेखानी समारंभात करण्यात आले. त्यावेळी कोरोना साथीची दुसरी लाट सर्वत्र होती. त्यामुळे त्या वेळचे सर्व नियम पाळून मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हा प्रकाशन समारंभ पार पाडण्यात आला.
छापलेल्या दिनदर्शिका जगभरात मान्यवरांना सस्नेह भेट देण्यात आल्या. तर ध्वनीचित्रफीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. ( ही ध्वनीचित्रफीत पुढील दुव्यावर पाहता येईल.
https://youtu.be/pA2Gkl7kDvI?feature=shared )
हे सर्व करत असताना एका चांगल्या कार्यात मदत करण्याची श्रीराम कृपेने संधी मिळाली अशी माझी भूमिका होती.
सुधीर गाडे, पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
सर तुमचे भाग्य थोर स्वामी गोविंददेव गिरी यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाले. लेख नेहमीप्रमाणेच स्फूर्तीदायक🙏
ReplyDeleteहोय सर.
Deleteधन्यवाद 🙏
अभिनंदन सर. खरोखरच तुम्ही धन्य आहात.. बहुदा माझ्या आठवणी प्रमाणे आम्ही जेव्हा पुण्याला आपल्या संस्थेच्या आर्ट सायन्स कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा आपल्या कॉलेजमध्ये गदिमांचा एक मुलगा सुद्धा शिकत होता व आर्ट सर्कलचा प्रमुख होता. चूक भूल द्यावी घ्यावी.
ReplyDeleteधन्यवाद डॉक्टर.
Deleteगदिमांच्या मुलाबद्दल मला माहीत नाही.
खूप छान सर 👌😊🙏
ReplyDeleteसर, धन्यवाद
Delete