ही तर देवीची कृपा
भारतात सगुण उपासनेची दीर्घ परंपरा आहे. त्यामध्ये देवीची उपासना करणारे अनेक जण आहे. भारतामध्ये ५२ ठिकाणी देवीची शक्तीपीठे आहेत अशी श्रद्धा आहे. याशिवाय ठीक ठिकाणी ग्रामदेवतेच्या रूपामध्ये देवीची उपासना चालते. श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवीची उपासना करणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी विसाव्या शतकामध्ये लक्षणीय कार्य केले अशांमध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचेही नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात देवीच्या कृपेचे काही अनुभव लिहिले आहेत. यापैकी एक अनुभव असा. केशव सोळा सतरा वर्षाचा असताना १९०२ मध्ये त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि इंग्रजांच्या न्यायालयात नोकरी करून निवृत्त झालेल्या त्यांच्या आजोबांच्या म्हणजे तात्यांच्या तुटपुंज्या निवृत्तीवेतनावर जीवन जगण्याचा खडतर प्रसंग त्यांच्या कुटुंबियांवर आला. ते पनवेल येथे राहत होते. केशवाने त्यावेळची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण व्हावे यासाठी त्यांच्या वडिलांचे स्नेही दत्तात्रय गणेश मेढेकर हे त्यांना आपल्यासोबत बारामती येथे घेऊन गेले. तेथे शिक्षण सुरू झाले. तिथे असताना केशव मेढेकरांचे पुतणे आणि आपल्या मित्रासोबत धरणाच्या धरणातून निघालेल्या कालव्यात पोहायला जात असे. एके दिवशी त्याचा अंदाज चुकून तो कालव्याच्या पाण्यात बुडू लागला. त्यांच्या मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्याने प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत जाऊन केशवला वाचवले. शुद्धीवर आणले. सर्व मुलांनी घरी गेल्यावर याची वाच्यता करायची नाही असे ठरवले होते. परंतु ते घरी पोचले तेव्हा पनवेलवरून तार आली होती , 'केशवची प्रकृती कशी आहे ते लगेच उलट तारेने कळवावे.' 'केशव बुडता बुडता वाचला आता तो ठीक आहे.' असे कळवले गेले. इकडे पनवेलला त्यांच्या घरी आजोबा देवी समोर धरणे धरून बसले होते देवीचे ते निस्सीम उपासक होते. यापूर्वी देखील त्यांना देवीच्या कृपेचे अनेक अनुभव आले होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे उठल्यानंतर झाडलोट, अंघोळ, पूजाअर्चा काहीही न करता ते देवीसमोर बसले होते. ज्या क्षणी केशव बुडत होता त्या क्षणी त्यांनी देवीची आर्त आळवणी केली. ती आळवणी फळाला आली. देवीची कृपा झाली.
पुण्यातील एक प्रसिद्ध नेत्रशल्यविशारद डॉ.विवेक कानडे हे माझ्या परिचयाचे आहेत. त्यांनी त्यांचा सुमारे २५-३० वर्षांपूर्वीचा त्यांचा अनुभव मला सांगितला. पुण्यात त्यांच्या कुटुंबियांचा एक वाडा होता. तो जीर्ण झाल्याने पाडून नवीन बांधायचे ठरले. त्यांच्या वाड्यात परंपरेने चालत आलेले एक देवीचे ठाणे होते. देवीची उपासना घराण्यात चालत आली होती. वाड्यातील भाडेकरूने न्यायालयात दावा दाखल केला. या डॉक्टरांचे वडील न्यायालयात नोकरीला होते. त्यांना न्यायालयीन कामकाजाचे बारकावे माहीत होते. पण दावा निकाली निघत नव्हता. मग कुठूनतरी त्यांना समजले की त्यांच्यावर करणी ( काळी जादू) केली आहे. त्यावर जो तोडगा काढायचा त्यात मांसाचा नैवेद्य दाखवावा लागेल. पण हे पडले शाकाहारी. काय करावे असा प्रश्न पडला. तेव्हा एका परिचितांच्या मदतीने त्यांनी तोडगा केला आणि लागलीच दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने झाला. भाडेकरूला वाडा सोडावा लागला. त्याठिकाणी नवीन इमारत उभी केली. त्यामध्ये आजही देवीची उपासना सुरू आहे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
आमचे आजोबा कै. कृष्णाजी पांडुरंग गाडे वाडवडीलांचे फलटण तालुक्यातीलच बीबी हे गाव सोडून साखरवाडीला आले. त्यांचा दुकानदारीत चांगला जम बसला. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण त्यावेळची जनसमजूत मुलगा हवा. मुलगा होईना. गावातील लोकांच्या सांगण्यानुसार त्यांनी जवळच्या होळ गावानजीक नीरा नदीच्या पात्रात असलेल्या श्री ढगाई देवीला नवस केला की ' मुलगा होऊ दे. तुझे मंदिर बांधीन.' नवस फळाला आला. मुलगा झाला. आता मंदिर बांधायचा नवस पूर्ण करण्याची वेळ आली. पण अडचण अशी की देवीचे ठाणे नदीपात्रातच होते. बांधकाम चालू असताना नदीला जर पाणी आले तर बांधकाम कसे करणार. मग आजोबांनी श्री ढगाईला कौल लावला. बांधकाम चालू असताना नदीला पाणी येऊ नये. उजवा कौल मिळाला.बांधकाम सुरू झाले आणि खरच बांधकाम पूर्ण होईपर्यंत नदीला पाणी आले नाही. नदीतील खडकावर छोटेसे मंदिर बांधून झाले. नवस पूर्ण झाला.
अशा काही घटना समजल्या की तर्क संपून जातो. बुद्धिचा टेंभा मिरवता येत नाही. मान्य करावे लागते की ' ही तर देवीची कृपा!'.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
नमस्कार सर तुमच्या लेखातून देवीचे अनुभव डोळ्यासमोर जिवंत झाले जिवंत झाले.. काही गोष्टी समजण्याच्या पलीकडे असतात आणि श्रद्धेच्या कसोटीवर ते उत्तम उतरतात🙏
ReplyDeleteसर नमस्कार. श्रद्धेमुळे विलक्षण गोष्टी अनुभवायला येतात.
Delete