स्वामी विवेकानंदांची कार्यशैली
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कार्याने पवित्र भारतभूमीला पुन्हा एकदा स्वत्वाची जाणीव करून दिली. आत्मविश्वास जागृत केला आणि शिकागो येथे १८९३ मध्ये भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून दिले. हे करत असताना त्यांची कार्यशैली कशी होती याबद्दल काही विचार मनात येतात.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
स्वामीजींचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस हयात असताना त्यांनी अनेक वेळा आपल्या प्रिय शिष्याला सांगितले होते की , " नरेन, तुला काली मातेचे कार्य करायचे आहे." परंतु ते नेमके कसे करायचे किंवा काय कार्य करायचे याबाबतची स्पष्ट कल्पना त्यांना मिळाली नव्हती. गुरूंच्या निधनानंतर सुमारे चार वर्षांनी स्वामीजी भारत भ्रमणासाठी बाहेर पडले. भारताची परिक्रमा पूर्ण केल्यावर भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी येथे १८९२ च्या शेवटी त्यांना कार्याची स्पष्ट कल्पना मिळाली. त्यानंतर ते सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी तेथे आपला ठसा उमटवला. आपले कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी ठीक ठिकाणी व्याख्याने देण्याचा विचार केला आणि अमेरिकेतील ' पॉंडस् लेक्चर ब्युरो ( किंवा स्लेटन लेसियम ब्युरो ) ' या एका व्यावसायिक ब्युरोबरोबर व्याख्यान दौऱ्याबाबत करार केला. या करारातून अधिकाधिक नफा मिळवावा या उद्देशाने या ब्यूरोने त्यांच्या व्याख्यानांचा सपाटाच लावला. यातून स्वामीजींना 'झंझावाती हिंदू' असे विशेषणदेखील मिळाले. परंतु स्वामीजींना स्वतःला दिलेले हे विशेषण योग्य वाटत नव्हते. त्यांना हळूहळू हे लक्षात आले की यातून आपल्याला केवळ प्रसिद्धी मिळते आहे. परंतु अपेक्षित असे कार्य घडत नाही. त्यामुळे त्यांनी भरपूर आर्थिक नुकसान सोसून आपल्या श्री. टी. डब्ल्यू. पामर या अमेरिकन स्नेह्यांच्या मदतीने या करारातून सुटका करून घेतली.
आता पुढे कसे कार्य करायचे याचे स्वामीजी साधारण एप्रिल १८९४ ते जानेवारी १८९५ या काळात दीर्घ चिंतन करत होते. याच दरम्यान कु. सारा फार्मर यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील मेइनमध्ये ग्रीन एकर या ठिकाणी अन्य पंथांच्या विद्वानांबरोबर स्वामीजी राहिले. याठिकाणी चर्चा, ध्यान, प्रवचन, व्याख्यान इ. उपक्रम स्वामीजींनी केले. पण यातूनही अपेक्षित कार्य होत नाही असे त्यांच्या ध्यानात आले.
आतापर्यंत स्वामीजींचा कार्याचा प्रसार धनिक, अभिजन वर्गात झाला होता. परंतु कळत नकळत आपण एका चौकटीत अडकून पडलो आहोत हे स्वामीजींच्या लक्षात आले. तसेच काही जणांनी अतीव प्रेमातून का होईना पण आपल्यावर अधिकार गाजवायला सुरूवात केली आहे हेदेखील त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यासारख्या सर्वसंगपरित्यागी संन्याशाच्या दृष्टीने हे योग्य नव्हते. विचाराअंती स्वामीजींनी आपल्या व्याख्यानांच्या मिळालेल्या मानधनातून स्वतःच्या स्वतःच्या नियंत्रणात असलेली व्यवस्था केली आणि ते न्यूयॉर्क येथे तुलनेने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वस्तीत, वेस्ट स्ट्रीट, श्री. लेऑन लॅंडसबर्ग या एका निर्धन व्यक्तीबरोबर ते जानेवारी १८९५ पासून राहू लागले. तेथेच त्यांनी वेदांताचे निःशुल्क वर्ग सुरू केले. हळूहळू या वर्गाची माहिती सर्वत्र पसरू लागली आणि वर्गाला उत्सुक लोकांची गर्दी होऊ लागली. ज्या धनिकांनी अशा वस्तीत वर्ग यशस्वी होणार नाहीत असे पूर्वी सांगितले होते तेदेखील वर्गाला येऊ लागले. या वेदांत वर्गासोबत काही ठिकाणी व्याख्याने , उत्सुक व्यक्तींबरोबर चर्चा, काहीजणांना योग, ध्यान याचे मार्गदर्शन असे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले.
वेदांताचे हे वर्ग काही महिने चालले. पण हळूहळू त्यांना मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला. स्वामीजींना पुढे काय करावे याचा पुन्हा विचार करावा लागला. परंतु न्यूयॉर्कमधील वर्गात येणाऱ्या कु. मेरी एलिझाबेथ डचर यांनी आपल्या थाउजंड आयलँड पार्क येथे वेदांताचे निवासी वर्ग आयोजित करण्यासाठी स्वतःचे घर उपलब्ध करून दिले. तिथे जून १८९५ ते ऑगस्ट १८९५ या काळात सात आठवडे हे वर्ग आयोजित केले गेले. मोजक्या बारा व्यक्ती या वर्गाला उपस्थित होत्या. यामध्ये रोज ते हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करीत. या मार्गदर्शनपर व्याख्यानांची स्वामीजींच्या शिष्यांनी काढून ठेवलेली टिपणे नंतर ' इन्स्पायर्ड टॉक्स ' या नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. या वर्गात असलेल्या व्यक्तींवर वर्गाचा चांगला परिणाम झाला. निवडक व्यक्तींबरोबर संवाद ही कार्यशैली स्वामीजींनी पुढे चालू ठेवली.
( स्वामीजींचे वास्तव्य जिथे झाले ते थाउजंड आयलँड पार्क येथील घर, छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
या सगळ्या प्रयत्नांतून स्वामीजींचे विचार समजून घेऊन, ते आत्मसात करून अपेक्षित कृती करू इच्छिणाऱ्या समर्पित व्यक्तिंचा एक गट हळूहळू तयार झाला आणि स्वामीजींचे कार्य स्थिरावले आणि त्याचा विस्तार होऊ लागला.या सगळ्यातून स्वामीजी आपल्या कार्याचे सतत चिंतन करत होते आणि कार्य यशस्वी होण्यासाठी आपली शैली बदलली पाहिजे हे लक्षात आल्यावर ते बदलही करत गेले हे लक्षात येते.
अमेरिका युरोपमधील आपल्या सुमारे साडेतीन वर्षांच्या वास्तव्यानंतर स्वामीजी जानेवारी १८९७ ला भारतात परत आलेला. त्यांचे अभूतपूर्व असे भव्य स्वागत करण्यात आले. फेब्रुवारी १८९७ मध्ये ते कोलकाता येथे परतले. तेथेदेखील त्यांचे भव्य स्वागत झाले.
या पार्श्वभूमीवर स्वामीजी पुढील कार्याबाबत विचार करू लागले. आपल्या गुरूंनी दिलेल्या 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा ' या शिकवणीला अनुसरून पुढील कामाची घडी बसवावी असे त्यांनी ठरवले. श्री रामकृष्णांनी आपल्या आयुष्यात हा विचार बीजरूपाने दिला होता पण प्रत्यक्षात विशेष कृती मात्र केली नव्हती. त्यामुळे स्वामीजींच्या काही गुरुबंधूंना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे या गुरुबंधूंमध्ये चर्चा, काही प्रसंगी वाद झाले. परंतु स्वामीजींनी अतिशय धीराने यातून मार्ग काढला आणि सर्वांना गुरूंची शिकवण पुन्हा एकदा सांगितली. त्यातून रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना एक मे १८९७ या दिवशी झाली. ' आत्मनो मोक्षार्थं जगद्हिताय च ' ( स्वतःचा मोक्ष आणि जगाचे कल्याणदेखील ) हे ध्येय वाक्य डोळ्यासमोर ठेवून या संस्थेने कामाला सुरुवात केली. श्री रामकृष्णांची शिकवण आचरणात आणणे सुरू झाले.
कोणतेही कार्य यशस्वी करायचे असेल तर काय करावे याचा वस्तुपाठच स्वामीजींच्या कार्यशैलीतून शिकायला मिळतो. कार्याच्या, कार्यपद्धतीच्या यशस्वीतेचे कठोर मूल्यमापन सतत करत राहिले पाहिजे, आवश्यकतेनुसार आधीची कार्यशैली सोडून नवी कार्यशैली आचरली पाहिजे, सर्वांच्या सहभागासाठी सखोल चर्चा आणि त्यानंतर सहमती घडवून कार्याला सुरुवात केली पाहिजे ही सूत्रे यातून सहजच लक्षात येतात. ही सूत्रे सर्व क्षेत्रात आचरणात आणण्यासारखी आहेत. ती अनुसरल्यास यश निश्चित आहे.
या युगद्रष्ट्या महापुरुषाला विनम्र अभिवादन!
सुधीर गाडे, पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
समाजवादी' विवेकानंदांची ओळख करून देणारा हा लेख.समाजवादी माणूस झापडबंद नसतो. भोवतालच्या सम्स्यांना तो निर्भयपणे आणि मोकळ्या मनानं भिडतो. ऊतम सादरीकरण सर🙏
ReplyDeleteधन्यवाद सर.
Delete'समाजवादी' याऐवजी 'समाजाचा विचार करणारे' हा शब्द प्रयोग जास्त योग्य आहे. 🙂
उत्तम लेख, मनःपूर्वक धन्यवाद सर
ReplyDeleteनमस्कार सर
Deleteसुधीर गाडे सरांच्या कडून वेगवेगळ्या वेळी स्वामीजींची नव्याने वेगवेगळी ओळख होते. सरांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक करावे तितके थोडेच. खूप खूप धन्यवाद सर.
ReplyDeleteडॉक्टर नमस्कार
ReplyDelete