शब्दांचे उच्चार

           " ते काम्पुटर म्हणताएत!" एका बैठकीनंतर त्या बैठकीतील सहभागी असणारे एक जण दुसऱ्याबद्दल म्हणत होते. " असा माणूस कसा काय योग्य निर्णय घेऊ शकतो?" असा त्यांचा प्रश्न होता. 

       बऱ्याच वेळा व्यक्तींच्या उच्चाराबाबत अशी प्रतिक्रिया येते विशेषतः इंग्रजी शब्दांचे उच्चार न जमल्यास मराठी माणसाबाबत अशी प्रतिक्रिया तर हमखास येते याची अजून काही उदाहरणे म्हणजे काही जण विशेषतः कमी शिकलेले अथवा न शिकलेले लोक accident ला ऑक्सिजन, late ला लॅट, overhaul व्हराइलिंग( किंवा तत्सम)  असे उच्चार करतात. काही मेकॅनिक " गाडीचा मोसम तुटतो." असे म्हणतात यात ' मोसम' हा उच्चार ' motion' चा आहे की 'momentum' चा हे सांगणे कठीण आहे.त्यावेळी बऱ्याच शिकलेल्या लोकांची प्रतिक्रिया ही गंमत वाटण्याची, कमी लेखण्याची अथवा काही वेळा टर उडवण्याची असते. असे करणे बरोबरच आहे असे त्यातील बऱ्याच जणांना वाटते. 

( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले छायाचित्र)

        परंतु याबाबत विचार करण्यासारखे काही मुद्दे आहेत. एक तर इंग्रजी भाषा ही आपली मातृभाषा नाही. इतिहासाच्या एका क्रमामुळे त्या भाषेशी आपला जबरदस्तीचा संबंध आला आणि तो वाढतच गेला आणि आजही तसाच वाढत चालला आहे. त्यामुळे परक्या भाषेचे उच्चार तसेच जमणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. इंग्रजी भाषेत तर काहीवेळा बोलल्याप्रमाणे लिहीत नाहीत अथवा लिहिल्याप्रमाणे बोलले जात नाही किंवा एकाच अक्षराचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. यात ठराविक नियमदेखील नाहीत असे लक्षात येते. उदाहरणार्थ cut याचा उच्चार कट् असा होतो तर put चा उच्चार पट् अस न होता पुट् असा होतो. काही वेळा इंग्लिश शब्दाचे स्पेलिंग एकच असते परंतु संदर्भाने उच्चार वेगळा करावा लागतो. उदाहणादाखल date याचा उच्चार डेट् असाही होतो आणि आडनाव असेल तर दाते असाही होतो. काही वेगवेगळ्या शब्दसमुहांचे उच्चार सारखे होतात. उदाहरणार्थ Chemistry आणि Kate मधील अनुक्रमे पहिल्या तीन आणि दोन अक्षरांचे उच्चार सारखेच आहेत.त्यामुळे जर उच्चारात गडबड झाली तर त्यात काय नवल किंवा फारसे लक्षात न घेण्यासारखे आहे. 

     यातील दुसरा मुद्दा असा की इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केले. येथील ठिकाणे, व्यक्ती यांची नावे त्यांना उच्चारण्यास सोयीची नाहीत म्हणून त्यांनी बदलून टाकली. उदाहरणार्थ मुंबईचे बॉम्बे खडकीचे किरकी. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. काही उच्चार स्पष्ट असून देखील त्यांचे स्पेलिंग वेगळेच करण्यात आले. उदाहरणार्थ देव याचे स्पेलिंग Dev असे न करता deo असे केले गेले तर गाव याचे स्पेलिंग  gav  न करता gaon असे करण्यात आले. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले त्यावेळी एका अर्थाने आपला नाईलाज होता. परंतु स्वतंत्र झाल्यानंतर देखील हीच स्पेलिंग आपण वापरत राहिलो आहोत. त्यात काही वावगे आपल्याला अजूनही वाटत नाही. 

      मराठीतही काही उच्चार संदर्भाने बदलतात. उदाहरणार्थ चहा आणि चमचा यातील 'च' अक्षराचा उच्चार, जहाज आणि जटिल यातील 'ज' अक्षराचा उच्चार हे वेगळे आहेत. चला फिरायला आणि पसायदानातील 'चला कल्पतरूंचे आरव ' यातील 'चला' यांचे उच्चार वेगळे आहेत. 'पुण्याची लोकसंख्या किती ' आणि 'पुण्याची गणना कोण करी' यातील 'पुण्याची' याचा उच्चार वेगवेगळा होतो. हे काही जण लक्षात घेत नाहीत.

      यातील पुढचा मुद्दा असा की गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढतच गेले. त्यामधील विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढतच गेली. या शाळांमध्ये शिकणारी बहुतांश मुले मुली मराठीच आहेत. अनेक शाळांमध्ये त्यांना इंग्रजीचे उच्चार योग्य पद्धतीने कसे द्यावे याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ही मुले मुली चांगल्या उच्चारांसह इंग्रजी बोलायला शिकतात. परंतु काही वेळा याच मराठी मुला-मुलींचे मराठी शब्दांचे उच्चार हे योग्य नसतात. त्याबद्दल मात्र आग्रह धरला जात नाही. तिथे मात्र ते चालवून घेतले जाते. हा भेदभाव स्वातंत्र्यानंतरदेखील होणे ही खेदाची, दुःखाची गोष्ट आहे. 

       आणखी एक मुद्दा म्हणजे शब्दांचे उच्चार ही माहिती अथवा ज्ञान यांच्या अभिव्यक्तीपैकीचा एक भाग आहे. अभिव्यक्ती चुकीच्या पद्धतीने होत असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला संबंधित गोष्टीचे ज्ञान अथवा माहिती नाही असे समजणे सरसकटपणे योग्य ठरणार नाही. ज्यांचे इंग्रजी शब्दांचे उच्चार चुकतात त्यांची माहिती अथवा ज्ञान योग्य असते अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. जागतिक पातळीवर जर बघितले तर जपान, जर्मनी, चीन, इस्त्रायल अशा अनेक देशांमधील लोकांचे इंग्रजी भाषेचे उच्चार प्रमाणानुसार होत नाहीत. परंतु जागतिक स्तरावर हे सर्व देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवरच आहेत.

    उच्चारांबाबत वेगवेगळे मुद्दे पाहताना याबाबतीतली काही सन्माननीय उदाहरणे देखील लक्षात घेतली पाहिजेत. सन १८६० मध्ये स्थापन  झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक त्रिमूर्तींपैकी कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर हे इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. त्यांचे इंग्रजीचे उच्चार अतिशय प्रमाणबद्ध होत असत. काही इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्यांचे निरीक्षण नोंदवले की , "डोळे मिटून यांचे बोलणे ऐकले तर मराठी माणूस इंग्रजी बोलत आहे असे वाटतच नाही." एवढे प्रभुत्व इंदापूरकर गुरुजी यांनी मिळवले होते.

    दुसरे उदाहरण गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आहे. चित्रपट सृष्टीत पार्श्वगायनाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या काही काळात त्यांचे उर्दू शब्दांचे उच्चार त्या भाषेच्या प्रमाणानुसार होत नसत. त्यामुळे त्या वेळचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांनी एकदा असा शेरा मारला की , "वोह गाती तो बढिया है. लेकिन उस के गानों में मराठी दालभात की बू आती है". हा शेरा समजल्यानंतर लतादीदी यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले. मेहबूब नावाच्या एका शिक्षकांची रीतसर शिकवणी लावली आणि प्रयत्नपूर्वक उर्दू भाषेचे उच्चार त्या भाषेच्या पद्धतीनुसार करण्यात लक्षणीय यश मिळवले. त्यांच्या गाण्यातील उच्चार हे उर्दू भाषिक व्यक्तीचेच वाटतात असेच प्रयत्न त्यांनी संत मीराबाईंची भजने ध्वनिमुद्रित करतानादेखील केले.

       इंदापूरकर गुरुजी,लता दीदी यांची उदाहरणे सर्वांनाच नेहमी प्रेरणा देत राहतील. त्यातून अनेक जण प्रगतीदेखील करतील.

   शब्दांच्या उच्चारांच्या बाबतीत केवळ वरवर विचार करून मत बनवणे योग्य वाटत नाही. आपण याचा सर्व बाजूंनी विचार करूया.

सुधीर गाडे, पुणे 


 ( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. उत्तम लेख आहे उच्चार कुठल्याही संभाषणात खूप मोलाचं कार्य करत... मी तर सध्या प्रत्येकाचा बोलले ऐकतो आणि आणि आणि माझ्या बोलण्यात उपचाराची सुधारणा करतो🙏

    ReplyDelete
    Replies
    1. सर धन्यवाद.🙏🏽
      तुम्ही चांगली सवय लावून घेतली आहे.

      Delete
  2. छान लेख, जीभेचे वळण महत्वाचे, पण काही लोकांच्या जीभेला हाड नसते आणि त्या उगाचच दुसऱ्याचा उपमर्द करण्यासाठी वळवळतात त्याला काय करावे!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख