वेळ पाळणे?!
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो संयोजकांकडून आलेल्या निरोपाप्रमाणे बरोबर अकरा ते साडेअकरा असा वेळ देण्यात आली होती. त्याप्रमाणे पावणे अकरा वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो. त्यावेळी संयोजकांपैकी एका प्रमुख व्यक्तीचे भाषण सुरू होते. त्यांचेच भाषण बरेच लांबले सहाजिकच पुढील कार्यक्रम देखील लांबतच गेला. आम्हाला सांगितलेल्या वेळेपेक्षा जवळपास २५-३० मिनिटे उशीरा संधी देण्यात आली. कार्यक्रमातील सहभाग घेऊन आम्ही बाहेर पडलो. तेव्हा या उशिराबदद्दल आमची थोडी चर्चा झाली. त्यावेळी गंमतीने मी म्हटले, " आपल्याकडे कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झाला तर तो वेळेवर उशिरा सुरू झाला असे म्हटले पाहिजे." त्याच्या पुढे उशीर झाला तर मग उशीरा उशीरा, खूप उशीरा, फारच उशीरा असे शब्द वापरले पाहिजेत." सोबतच्या व्यक्तीला देखील ते पटल्यासारखे झाले आणि तो हसला.
वेळ पाळण्याबाबतचा इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग हा छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आहे. मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केल्यानंतर मोगली फौजेच्या जोडीने महाराज आदिलशाही मुलखावर चालून जाऊ लागले. स्वराज्यातून पुन्हा आदिलशाहीत गेलेला पन्हाळगड जिंकायचे ठरले. योजना झाली. सरनौबत नेतोजी पालकर यांनी दुसरीकडून येऊन महाराजांच्या तुकडीला मदत करायची होती. महाराजांनी पन्हाळगडावर हल्ला चढवला. पण नेतोजी वेळेवर पोचले नाहीत. जवळपास एक हजार मावळे धारातीर्थी पडले. महाराजांना माघार घ्यावी लागली. महाराजांनी, " समयास कैसे पावला नाहीत ?" असे नेतोजींना खडसावून विचारले. सैन्यातून काढून टाकले. नेतोजी मोगलांना सामील झाले. त्यानंतर आग्र्याहून महाराजांची सुटका झाल्यावर संतापलेल्या औरंगजेबाने नेतोजींना दग्याने कैदेत टाकले. बळजबरीने मुसलमान केले. हा पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
( कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले छायाचित्र )
सध्या आपण साधारणपणे ठरलेल्या वेळेपेक्षा काही वेळ उशीरा कार्यक्रम सुरू होणे हे जणू गृहीत धरले आहे. त्यामुळे संयोजकांनाही आणि उपस्थितांनाही वेळ पाळण्याचे बंधन मान्य नसते किंवा ते बंधन राहत नाही. वेळेवर कार्यक्रम सुरू होणे ही अतिशय कमी वेळा होणारी गोष्ट आहे असे अनुभवायला येते. त्यामुळे आयोजकही उशीर गृहीत धरतात तसे उपस्थितही उशीर गृहीत धरतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काहीजण उपरोधाने 'इंडियन स्टॅंडर्ड टाइम' याऐवजी 'इंडियन स्ट्रेचेबल टाइम' असंही म्हणतात.
परंतु याला काही अपवाददेखील आहेत. आजकाल लग्न समारंभातील वेळ पाळली जाणे हे वऱ्हाडी मंडळीचा नाचण्याचा उत्साह आणि फोटो काढण्याची हौस यावर अवलंबून असते. बर अशा प्रसंगी वेळ पाळायचा आग्रह धरला तर वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेचजण तो आग्रह धरत नाहीत. काही महिन्यांपूर्वी एका लग्नाला गेलो असता वेळेवर लग्न लागल्याचा अनुभव आला. यासाठी मी नवऱ्या मुलाचे विशेष अभिनंदन केले. नवरदेवाला मी गंमतीने म्हणालो, " तुमच्या मित्रमंडळींनी नाचण्याच्या उत्साहाला आवर घातला म्हणून लग्न वेळेवर लागले. याबद्दल तुमचं अभिनंदन!" नवरदेव म्हणाला, " मी सांगून ठेवले होते. त्यामुळे वेळ पाळली गेली.
वेळ पाळणे हा एक स्वभावाचा पैलू आहे. काहीजणांचा उपजत स्वभाव असतो तर काहीजण एखाद्या प्रसंगानंतर प्रयत्न करून असा स्वभाव बनवतात. तर काहीजण असे असतात की त्यांना वेळ पाळण्याची काही फिकिर वाटत नाही. त्यामुळे काहीजण अडचणी असूनही वेळेवर हजर असतात तर काहीजण सहज शक्य असूनही वेळ पाळत नाहीत.
" यांच्या येण्याजाण्यावरून लोक घड्याळ लावतात." असे ठिकठिकाणी काही व्यक्तींबद्दल साधारण ४०-५० वर्षांपूर्वी बोलले जात असे. ही मंडळी वेळेची पक्की असत. अर्थात त्याकाळी व्यवधानेदेखील कमी होती. वाहतुकीची साधनेदेखील मर्यादित होती. राहण्याची आणि कामाची ठिकाणे जवळजवळ असत. त्यामुळे ही मंडळी बहुधा चालत किंवा सायकलवर कामाच्या ठिकाणी जात असत.
आता शहरीकरणामुळे अनेक गुंतागुंती तयार झाल्या आहेत. त्याचा एक परिणाम म्हणजे वाहतुकीच्या खोळंब्यामुळे होणारा उशीर. पुण्यासारख्या शहरात वेगवेगळी प्रकारची विकास कामे सुरू असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि त्याचा परिणाम उशीर होण्यामध्ये होतो. होणाऱ्या संभाव्य उशीराचा विचार करून जर आधी निघायचे असे ठरवले तर काही वेळा अनपेक्षित अडचण येते. अपघात, गाडी बंद पडणे यासारखी कारणे पूर्व सूचना न देता उद्भवतात आणि वाहतुकीची कोंडी होते परिणाम म्हणून उशीर होतो. काही वेळा थोड्या पावसानेदेखील वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. अशा कोंडीत सापडल्यावर वेळ पाळण्याची इच्छा असूनही वेळ पाळता येत नाही. सामान्य माणसांबरोबर महत्वाच्या व्यक्तीदेखील यातून सुटत नाहीत. ९ जून २०२४ ला भारताच्या नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. शपथविधीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निघालेले मा. मंत्री श्री. रणवितसिंग बिट्टू हे वाहतूक कोंडीत अडकले. वेळेवर पोचायचे म्हणून ते गाडीतून उतरून चक्क पळत सुटले आणि बैठकीला पोचले. पण अशी उदाहरणे विरळच. काही वेळा उतरून चालण्याएवढीदेखील जागा रस्त्यावर उरलेली नसते किंवा अंतर एवढे लांब असते की पळत जाऊनदेखील वेळ पाळता येणे शक्य नसते.
अशी आपल्या नियंत्रणाबाहेरची कारणे असली की 'हीना' या चित्रपटातील एका गाण्याची ओळ आठवते, " मैं देर करता नहीं, देर हो जाती है "
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
वेळेचे महत्व छत्रपतींच्या काळापासून ते अगदी कालच्या मंत्रिमंडळापर्यंत सुंदर मांडणी केली आहे सर.. एक stanza आहे इंग्लिश मध्य if u dont value time, the time wont value you... 🙏
ReplyDeleteसर धन्यवाद
Deleteसुंदर विवेचन सुधीर जी
ReplyDeleteधन्यवाद
Deleteदैनंदिन जीवनात आपल्याला आलेल्या अनुभवाचे एका सुंदर लेखात रूपांतर कसे केले जाते याचे हा लेख एक उत्तम उदाहरण आहे त्याबद्दल सुधीर सरांचे करावे तितके कौतुक थोडेच. सुधीर सरांच्या ठाई असलेल्या या प्रतिभेस सलाम.
ReplyDeleteधन्यवाद डॉक्टर
Deleteअत्यंत ओघवत्या शैलीत मांडलेला खूप महत्त्वाचा मुद्दा. 7 habits of highly effective people by Stephen Covey किंवा वेळेच्या व्यवस्थापनावर एवढं बोललं जातं. स्वयंशिस्तीविषयीच्या लेखाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद!
Delete