सर्वांगीण विचार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
१३ ऑगस्ट हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा स्मृतिदिन. या महान विभूतीबद्दल जसजशी अधिक माहिती होत जाते. तसतसे आपण अधिकच भारावून जातो. सर्वांगीण विचार करणाऱ्या अहिल्याबाई यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारे हे काही प्रसंग.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
मध्ययुगीन काळामध्ये जंगल भागात असणारा दरोडेखोरांचा वावर आणि त्यांच्याकडून होणारी लूट हे प्रकार साधारणपणे नित्याचेच म्हणता येतील. इंदूरजवळच्या जंगलात दरोडेखोरांनी एका वाटसरूला पकडले. त्याच्याकडची चीजवस्तू लुटून घेतली आणि त्याला झाडाला बांधून ते पळून जाऊ लागले. दरोडेखोर आपल्याला बांधून पळून जाताहेत हे पाहताच त्या वाटसरूने सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाचा प्रभाव पडून दरोडेखोर माघारी आले. त्यांनी त्याला सोडवले आणि विचारले की, " तू कुठे चालला आहे?" तर त्याने सांगितले की, " मी अहिल्याबाई होळकर यांना भेटायला चाललो आहे." हे ऐकताच येताच दरोडेखोर चपापले आणि त्या प्रवाशाला सोबत घेऊन ते मातोश्री अहिल्याबाई यांच्या भेटीला आले. अहिल्याबाई यांनी या वाटसरूची ओळख करून घेतली. त्याने सांगितले की, " मी शाहीर आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी मी कवने लिहितो आणि म्हणतो." हे ऐकून आपल्या वाड्यातील महिलांच्या करणुकीसाठी अहिल्याबाई यांनी त्या कलाकाराचा कार्यक्रम ठेवला. कलाकाराने अतिशय चांगल्या पद्धतीने कवने म्हणून सर्वांचे मनोरंजन केले. अहिल्याबाई यांनी त्याचा यथोचित सत्कार केला. दुसऱ्या दिवशी अहिल्याबाई यांनी त्याला परत बोलावून घेतले आणि सांगितले , " तुमच्याकडे कला आहे. परंतु ती फक्त शृंगारिक लावण्या लिहिण्यामध्ये उपयोगी पडत आहे. त्याऐवजी तुम्ही परमेश्वराचे गुणगान करणारी कवने लिहा. लोकांमध्ये आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल यासाठी त्याचा प्रचार करा." अहिल्याबाईंचे हे शब्द म्हणजे जणू तपस्विनीचीच आज्ञा होती. त्या कलाकाराने अहिल्याबाईंना वचन दिले की , " इथून पुढे मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीची रचना करेन." आपण दिलेले वचन या कलाकाराने पाळले. या कलाकाराच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. हे कलाकार होते संगमनेरचे प्रसिद्ध शाहीर अनंत फंदी.
एके दिवशी अहिल्याबाईंच्या दरबारात काही गरीब ब्राह्मणांचा घोळका त्यांना भेटण्यासाठी आला. एक वेगळीच समस्या घेऊन ही मंडळी आली होती. मुलींची लग्न जमवत असताना भरपूर हुंडा दिल्याशिवाय लग्न होऊ शकत नाही आणि आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही हुंडा देऊ शकत नाही त्यामुळे आमच्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी फिर्याद त्यांनी मातोश्री अहिल्याबाई यांच्याकडे मांडली. मातोश्रींनी लगेच आपल्या कारभाऱ्यांना बोलवून घेतले आणि आपल्या संस्थानात सर्व जातींसाठी हुंडाबंदी करण्यात आली आहे अशी आज्ञापत्रे सर्व मुलकी कारभाऱ्यांना पाठवून जनतेच्या माहितीसाठी दवंडी पिटवून माहिती देण्यास सांगितले. अहिल्याबाईंच्या तत्पर निर्णयाने समाधान पाहून ही मंडळी त्यांना धन्यवाद आणि आशीर्वाद देतच माघारी परतली.
परमार्थिक उन्नती बरोबरच ऐहिक प्रगती देखील महत्त्वाची आहे हे अहिल्याबाई जाणून होत्या उद्यमशीलतेला त्यांनी वाव देण्यासाठी विणकारांना विशेष प्रोत्साहन दिले. अहिल्याबाईंच्या वास्तव्याने जिला होळकर संस्थानाच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता ती महेश्वर नगरी माहेश्वर साड्यांच्या उद्योगासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली. या उद्यमशीलतेतून महेश्वरवासियांची ऐहिक प्रगतीदेखील साधली गेली.
अहिल्याबाई यांचे समकालीन असणारे बारामती नगरीचे विद्वान कविवर्य मोरोपंत एके दिवशी माहेश्वर नगरीत मुक्कामी आले अहिल्याबाई यांची त्यांनी भेट घेतली मोरोपंतांनी १०८ रामायण लिहिली होती. अहिल्याबाईंना मोरोपंतांच्या रचनांची माहिती होती. त्यांनी मोरोपंतांचा यथोचित आदर सत्कार केला.
एके दिवशी एक विधवा स्त्री आपले गाऱ्हाणे घेऊन अहिल्याबाई यांच्याकडे आली. पतीच्या निधनानंतर नातेवाईक मंडळी आपल्याला त्रास देत आहेत आणि आपल्या जिवाला धोका आहे असे या महिलेचे गाऱ्हाणे होते. अहिल्याबाईंनी संस्थानच्या खर्चाने या महिलेच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले. या स्त्रीने कृतज्ञतेने अहिल्याबाईंचे आभार मानले आणि संस्थानमध्ये धर्मकार्यासाठी धन देण्याची इच्छा व्यक्त केली. अहिल्याबाई यांनी तिला सांगितले की, ' बाई, तू सोमनाथ येथील मंदिराच्या व्यवस्थेसाठी धन दे. " सुरक्षित बंदोबस्तात या महिलेला सोमनाथला पाठवण्याची व्यवस्था अहिल्याबाई यांनी केली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू सदैव मार्गदर्शक आहेत. त्यांना विनम्र अभिवादन!
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
सुरेख लेखन केले सर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा सुंदर मांडला🙏🙏
ReplyDeleteसर धन्यवाद!🙏🙏
Delete