विश्वबंधुत्व दिन

     ११ सप्टेंबर १८९३ या दिनांकाने इतिहासात आपली नोंद अजरामर करून ठेवली आहे. याच दिवशी अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेच्या उद्घाटन प्रसंगी स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेल्या , "अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो!" या शब्दांनी उपस्थित हजारो श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडली गेली, नसानसातून विद्युत संचार झाला, मनाची स्पंदने जुळली. या परिषदेच्या एक दिवस आधी आगगाडीच्या डब्यामध्ये अनामिकपणे रात्र घालवलेल्या स्वामीजींवर जणू प्रसिद्धीचा प्रखर झोत पडला. स्वामीजींच्या या शब्दांचा प्रभाव इतका का पडला? याचे कारण स्वामीजींचे शब्द हे मनापासून उच्चारलेले होते. जे पोटामध्ये होते तेच ओठांवर आले.‌ स्वामीजींनी अन्य एके ठिकाणी म्हटले आहे, " शब्दांचा प्रभाव हा एक तृतीयांश असतो तर व्यक्तिमत्त्वचा प्रभाव दोन तृतीयांश असतो. " स्वामीजी उदार, व्यापक व्यक्तिमत्त्व असल्यानेच शब्दांचा हा विलक्षण प्रभाव पडला.


( जागतिक सर्वधर्मपरिषदेचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

        स्वामी विवेकानंद यांच्या या छोट्याशा भाषणात साधारणपणे पाच मुद्दे होते. पहिला म्हणजे स्वागताबद्दल कृतज्ञता आणि सर्व हिंदू पंथ, संप्रदाय यांच्या वतीने उपस्थितांना केलेले अभिवादन. दुसरा मुद्दा म्हणजे भारताच्या सहिष्णु आणि 'सर्व पंथ सत्य आहेत' या धारणेच्या परंपरेची ओळख. तिसरा मुद्दा होता तो हजारो वर्षांपासून भारताने पीडितांना दिलेला आश्रय. त्यांनी चौथा मुद्दा सांगितला तो कोणत्याही मार्गाने उपासना केली तरीही ईश्वराची प्राप्ती होते ही हिंदू श्रद्धा. त्यांचा पाचवा मुद्दा म्हणजे जगात संकुचित पंथाभिमान, धर्मांधता यांचा अंत होऊन समन्वयाचे नवे युग अवतरावे ही व्यक्त केलेली अपेक्षा. ( इंटरनेटवरून हे मूळ भाषण कृपया वाचावे. )

        स्वामी विवेकानंद यांच्या या छोट्याशा भाषणाने तत्कालीन पाश्चिमात्यांना समन्वयाचा आणि सहजीवनाचा मार्ग दाखवला. कारण सोळावे शतक ते एकोणीसावे शतक या चार शतकांत पाश्चात्त्यांनी जगभर रक्तपात आणि धर्मांतर यांचे लोट वाहवले होते. त्याधीच्या काही शतकांमध्ये पश्चिमेतील ख्रि श्च न आणि मध्यपूर्वेतील मु स्लि म यांच्यात रक्तरंजित धार्मिक संघर्ष झाला होता. या सगळ्याच्या मुळाशी होता तो ' माझाच पंथ खरा ' हा अभिमान. या अभिमानाचा परिणाम हा संघर्षात, अत्याचारात आणि रक्तपातात झाला होता. 

     या पंथाभिमानी लोकांना शांततामय सहजीवन हे शब्दच जणू माहिती नव्हते. त्यामुळे सतत अस्तित्वाचा , वरचढ ठरण्याचा संघर्ष या ना त्या मार्गाने चालूच होता. एकदा सहजीवनाचे तत्व नाकारले की पुढील गोष्टी हा त्याचा तार्किक परिणाम होता. 

     या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले विचार हा जणू एक काळोखी रात्र संपून दिवस उजाडतानाचा सूर्यप्रकाश होता. या विचारकिरणांमध्ये पुढील वाट काहीशी दिसू लागली होती. या वाटेवर सर्वांनी एकमेकांशी संघर्ष न करता चालण्याचे स्वामीजींचे आवाहन कळकळीचे आणि प्रामाणिक होते.  ते शांततेचे आश्वासन होते. सहकार्याचे नवे युग घडवण्यासाठी कळकळीने घातलेली ती एक साद होती. ही साद म्हणजेच विश्वबंधुत्वाचे आवाहन होय. या आवाहनासाठी हा दिवस कायमस्वरूपी कालपटलावर नोंदला गेला आहे. 

     या दिवसाला १३१ वर्षे उलटून गेल्यावर आज काय स्थिती आहे? हे आवाहन प्रामाणिकपणे आचरून जगात समन्वयाचे प्रगतीचे युग निर्माण करण्याच्या दृष्टीने अजून पुष्कळ आव्हाने आहेत. अजूनही पंथाभिमानाची पट्टी अनेकांच्या डोळ्यांवरून निघाली नाही. त्यामुळे भल्याबुऱ्या मार्गाने आपापल्या पंथाचा अधिकाधिक प्रसार करण्याची चढाओढ सुरू आहेच. प्रसंगी हिंसाचाराचाही आश्रय घेतला जातो आहे. हिंसा घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. विश्वबंधुत्व या ध्येयाच्या दिशेने बरीचशी वाटचाल अजून बाकी आहे. मग काय त्या युगनायक स्वामी विवेकानंदांचे शब्द वाऱ्यावर विरून गेले? तर नाही! स्वामीजींचेच वचन आहे की, " अशा शब्दांतील व्यापक कल्पना आसमंतात राहतात. वेळ आली की त्या साकार रूप घेतात."

    स्वामी विवेकानंदांच्या मुखाने तत्वरूपाने जगाच्या पटलावर विश्वबंधुत्व हा मुद्दा ठाशीवपणे मांंडला गेला आहे. स्वामीजींच्या विचारांचे, वक्तव्यांचे आणि जीवनाचे अध्ययन केले की एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते ती म्हणजे ही परिस्थिती प्रत्यक्षात येण्यासाठी भारताची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.  स्वामीजींचे शब्द सत्यात येण्यासाठी भारत सक्षम, समर्थ व्हावा यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत.


सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )



Comments

  1. प्रेमाने आणि आपुलकीने जग जिंकता येतं याचे उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद.. सुंदर लेखन केले सर🙏

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय सुंदर लेखन व विचार. भारतीय संस्कृतीतल्या थोर महापुरुषांचा सुधीर सरांचा अभ्यास आणि प्रसंगानुरूप त्याची मांडणी खरोखरच कौतुकास्पद आहे. सरांचा ब्लॉग जेव्हा वाचण्यात येतो तेव्हा अंतर्मुख होऊन आपण समाजासाठी देशासाठी आणखी काहीतरी करायला पाहिजे अशी भावना होते. होते. धन्यवाद सर.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख