हिंदूं समाजाच्या भाव जागरणाचा स्पृहणीय प्रयत्न

       अंधारलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिवे उजळले. जवळपास हजार डोळे समोर खिळले आणि सुस्वरात आरती सुरू झाली.

 नमोस्तुते जय देवी सुर सरिते गोदावरी माता |

कैसै हो वर्णित शब्दों मे तव गाथा ||

 ( छायाचित्र कु. सिद्धांत उपासे )

         मानवी जीवनाचा प्रवाह हजारो शतक वर्षांपासून या भारत भूमीमध्ये अखंडित वाहत आलेला आहे. या भारतभूमीविषयी ज्यांची भक्ती आहे असा हिंदू समाज आपल्या परंपरेचे पालन आजदेखील करत आलेला आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी बुद्धी आणि भावना यांचा प्रभाव दिसतो. बऱ्याच वेळा असे दिसते की या दोघींपैकी कोण वरचढ ठरणार त्यावर निर्णय होतो. साधारणपणे उचंबळून आलेल्या भावना माणसाला विलक्षण गोष्टी करायला भाग पाडतात. अनेक वेळा अशा गोष्टी माणसाचे आयुष्य वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यामुळे या भावनांची जोपासना करणे, त्यांचे जागरण करणे आणि त्यांना योग्य दिशेने प्रवाहित करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदू संस्कृती हजारो वर्षांची असल्याने अनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात उदयाला आल्या. त्यापैकी काही स्थिर झाल्या तर काही काळाच्या प्रवाहात नाहीशादेखील झाल्या. अशा पार्श्वभूमीवर भाव जागरणासाठी नवनवीन उपक्रमांची आवश्यकता असते. अशाचपैकी एक उपक्रम म्हणजे रामतीर्थ गोदावरी सेवा समिती नाशिक यांच्यावतीने रामकुंडावर दररोज सायंकाळी सात वाजता होणारी गोदावरी नदीची आरती.नुकताच या आरतीच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला. या आरतीचे शब्द लिहिले आहेत मित्रवर्य श्री महेंद्र वाघ याने तर त्याला संगीतबद्ध केले आहे श्री. जीवन धर्माधिकारी यांनी.

     या सोहळ्यात सहभागी होताना मनात वेगवेगळे विचार दाटून आले. दररोज नियमितपणाने ही आरती होते. वादळ वारा, पाऊस यामुळे त्यात खंड पडत नाही. त्यामुळे ही अखंड सुरू असलेली एक साधना आहे. उपासना आहे. दुसरा भाग यामध्ये आयोजक म्हणून सहभागी होणाऱ्या युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. या युवा वर्गाचे वेगवेगळे गट आहेत. त्यांनी आपापले दिवस ठरवून प्रत्येक दिवशी या उपासनेत सेवा म्हणून सहभागी होण्यासाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यांच्या क्रमाप्रमाणे ते यामध्ये सहभागी होत असतात. युवा वर्गात मुलींचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. ज्या दिवशी आम्ही आरतीत सहभागी झालो त्यादिवशी आरतीसाठीची दीपमाळ हातात धरणाऱ्या तीन मुली होत्या. तर दोन मुले होती. अर्थातच त्यांना मदत करणाऱ्या गटामध्ये अनेक मुले मुलीदेखील होती. भारतीय पारंपरिक  वेशात ही मुले मुली यात सहभागी झाली होती. त्यांचे नयना रम्यपोशाख मनावरती ठसले. आरतीचे विधी सुरू होण्याच्या आधी हिंदी भाषेतून आरतीचा भावार्थ सांगितला जातो. हिंदी भाषेतून सांगितल्यामुळे बहुतेक भारतीयांना त्याचा अर्थ कळण्यास मदत होत होते हे लक्षात येते. नंतर त्या दिवशीचे यजमान म्हणून जी निश्चित झाली आहेत अशी कुटुंबे पुढे येऊन त्यांच्या हस्ते मंत्रोच्चारासहित विधिवत पूजा केली जाते. शेवटी संकल्प म्हणून केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण हिंदू समाजाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. जाते संकल्प म्हणत असताना कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर जिथे अद्यापि पुन्हा मंदिर होऊ शकले नाही अशा वाराणसीचा आणि मथुरेचा विशेष उल्लेख केला जातो. त्याद्वारे या संकल्पचे उच्चारण केले जाते.

     हिंदी भाषेत रचलेल्या आरतीमध्ये गोदावरी नदीचे अवतरण कसे झाले, श्रीराम प्रभूंची पाऊले याठिकाणी कशी उमटली, या नदीच्या तीरावर संत एकनाथ स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक महापुरुषांनी आपले जीवन कसे व्यतीत केले याचे सुबोध वर्णन प्रवाही शब्दांमध्ये केले आहे. हे शब्द प्राचीन परंपरेची जाणीव करून देतात इतिहासाची आठवण जागवतात आणि भविष्यासाठी प्रेरित करतात. साधारणपणे सामूहिक आरती मध्ये घेता सूरताल सांभाळला जातोच असे नाही त्यामुळे ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या माध्यमातून ही आरती ऐकवली जाते. उपस्थित भाविक यामध्ये सहज ताल धरतात. दिव्यांच्या उजळलेल्या ज्योती, प्रवाही शब्द, मनाला भिडणारे सूर, सर्वांची निर्माण होणारी एकत्रित रंगसंगती हे सर्व मनावरती खोल परिणाम करून जाते आणि सात्विक भावांचे जागरण सहजपणे होते. ज्यामुळे हा उपक्रम निश्चितच स्पृहणीय आहे. 

       ज्यांनी वाराणसी मध्ये गंगा आरतीचा अनुभव येथे येण्यापूर्वी घेतला असेल त्यांना कदाचित हा अनुभव तेवढा प्रभावी वाटणार नाही परंतु नदीची आरती प्रथमच बघणाऱ्या व्यक्तीवर मात्र याचा अतिशय चांगला परिणाम होतो खटकणारी अजून एक बाब म्हणजे रामकुंडावरच थोड्या अंतरावर अजून एक आरती होते त्या देखील आरतीचा आवाज येतो आणि हे प्रकारच्या माध्यमातून सहभागी लोकांच्या कानावर पडतो यामुळे थोडा रसभंग होतो एकाच ठिकाणी जवळजवळ होणाऱ्या दोन आरत्या हे हिंदू समाजाच्या विविधतेचे प्रगटीकरण आहे की वैयक्तिक संबंधांचे फलित आहे हा ज्याचा त्याने ठरवायचा मुद्दा आहे.

 नदीविषयीची भक्ती भावना हिंदू समाजाच्या मनात हजारो वर्षांपासून आहे. काकासाहेब कालेलकर यांनी नद्यांना लोकमाता असे म्हटले आहे. परंतु बहुतेक सर्व नद्यांची आजची अवस्था अतिशय बिकट आहे. या आरतीसारख्या उपक्रमातून आपल्या लोकमातांची आपण डोळसपणे काळजी घ्यावी, समाजातील जलसाक्षरता वाढावी ही इच्छा मनात सहज उमटून गेली.


सुधीर गाडे पुणे 

 

(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. सनातन धर्मामध्ये नदीला माता म्हणून संबोधले जाते... तिचे पावित्र्य तिचे महात्म्य आपण सारेच जाणतो.. आजच्या घडीला सगळ्याच नद्यांची अवस्था खूप बिकट आहे.. नद्यांचे संवर्धन करणे आणि गतवैभव प्राप्त करून देणे हे ह प्रत्येक भारतीयचे कर्तव्य आहे खूप सुंदर लेखन केले सर🙏

    ReplyDelete
  2. आधुनिक काळाची गरज आणि आपल्या जुन्या भारतीय संस्कृती परंपरा याची उत्तम रित्या सांगड घालून एक आदर्श असा लेख सरांनी लिहिला आहे. जुने चांगले उपक्रम व तसेच नवीन उपक्रम हे समाजाच्या हितासाठीच असतात किंवा असावेत हे यावरून स्पष्ट होते धन्यवाद सर. एका चांगल्या आणि सामाजिक हिताच्या विषयाला आपण याद्वारे समाजाच्या नजरेला आणून दिल्याबद्दल धन्यवाद. सुधीर गाडे सरांच्या लेखासारखे लेख व गाडे सरांसारख्या व्यक्ती यामुळेच समाजाचे आरोग्य अबाधित राहते हेही तितकेच खरे.

    ReplyDelete
  3. श्री.प्रमोद बेहेरे लिहितात

    🙏🙏ऊत्तम.
    आम्ही आत्ताच ऊत्तराखंड प्रवासात (आदि कैलाश, ओम पर्वत यात्रा) गेलो होतो त्यावेळी त्या भागातील काही नद्या, तेथील निसर्ग व स्फटिकासारखे शुध्द, स्वच्छ पाणी अनुभवले...गंगेची बिहार, बंगाल मधील असेल किंवा ब्रह्मपुत्रेची नऊ किमी लांब पुलावरून दिसणारी अथांगता त्यातील एखादा व येणारा डाॅल्फिन इ. पाहिले की अक्षरशः (भक्तिप्रेमाने) आपोआप हात जुळतात. ...
    मात्र दर्दैवाने बहुतांश भारतीय माणूस फक्त पूजा करतो व कळत नकळत होणारे नद्यांचे प्रदुषण दुर्लक्षित करतो. आम्ही 2014 ला नर्मदा मैयाची (बस मधून 16 दिवसाची) परिक्रमा केली त्यावेळी विचारपूर्वक एका ए4च्या कागदावर नर्मदा मैयाचे प्रदुषण रोखण्यासाठी... मी एक सामान्य नागरिक म्हून सुध्दा काय काय करू शकतो याबाबतचे विविध पर्याय (छापून घेतले) दिले होते व सर्व ठिकाणी सकाळचे, घाटावरील स्थान झाल्यावर सर्व परिक्रमावासियांनी त्याचा आजूबाजूला प्रचार करायचा असा कार्यक्रम 10-12 दिवस ऊत्तमपणे केला...व रोज घाटावरची स्वच्छता केली.
    मला वाटत सर्वांनी मी नदी प्रदुषित न होण्यासाठी जे जे शक्य ते करीन असा अगदी.......... "पण" करण्याची नितांत आवश्यकता....पण लक्षात कोण घेतो?
    🙏

    ReplyDelete
  4. श्री. महेंद्र वाघ लिहितात
    गोदावरी आरती हा उपक्रम खूप चांगल्या हेतूने सुरू झाला आहे. पर्यावरण प्रबोधन, सामाजिक समरसता, महिला सन्मान अशी अनेक मूल्ये या उपक्रमामुळे जपली जात आहेत. आपण स्वत: गोदावरी आरती अनुभवलीत आणि त्यावर अभ्यासपूर्ण भाष्य केलेत, याबद्दल आपले मनापासून आभार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख