प्रतिसाद ( भाग १ )
काल्पनिक कथा भाग १
" पंडितजी कृपया आपण गाणं सुरू करा. शेठजींना यायला अजून वेळ लागेल." ओशाळलेपणाचा भाव आणून चंद्रकांतने पंडित गुणनिधी यांना सांगितले. पंडितजींनी मान डोलावली आणि काही क्षणातच स्वरधारांची बरसात सुरू झाली.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
पंडित गुणनिधी हे तर गायन क्षेत्रातील उत्तुंग नाव! त्यांच्या गायनाने रसिक अद्वितीय आनंदात चिंब भिजून जात. रसास्वादाच्या नवनवीन शिखरांवर पंडितजींचे गाणे रसिकांना घेऊन जात असे. सहाजिकच त्यांच्या मैफलींसाठी खूप मागणी होती. पंडितजीदेखील अतिशय चोखंदळपणे मैफिलींची निवड करत असत. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी कलेची विनम्र भावाने उपासना एवढे एकच उद्दिष्ट ठेवले होते. त्या उपासनेचे सर्व नियम, उपचार ते अगदी काटेकोरपणे पाळत असत. शिस्तीचे ते प्रचंड भोक्ते होते. दिवस कोणताही असो रोजच्या साधनेत कधीही खंड पडला नाही. गायन कलेची उपासना ही निर्दोष काटेकोरपणे झाली पाहिजे हे व्रत त्यांनी कायमच आचरले होते.
त्यांच्या मैफिलीचे आयोजन करू इच्छिणाऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे लोक, संस्था होत्या. काहीजण कलेचे जाणकार रसिक होते तर काहींना त्यांच्या गायनाच्या मैफिलीचे आयोजन करून आपण कसे गुणग्राहक रसिक आहोत याचे जणू प्रदर्शन करायचे असे. या दुसऱ्या गटातलेच एक मोठं प्रस्थ होते शेठ हिरालाल.
शेठ हिरालाल यांचा व्यापार धंद्यामध्ये खूप मोठा दबदबा होता. घरामध्ये पैशाचा नुसता ओघ वाहत होता. व्यवसायाच्या नवनवीन संधी शोधून त्यातून आपल्या पैशात भरभक्कम वाढ कशी करावी याचा वस्तुपाठ म्हणजेच शेठजींचे आयुष्य होते. या पैशाच्या वर्षावात कला, छंद यांची त्यांना फारशी गरज वाटत नसे. परंतु त्यांच्या वर्तुळात उठबस करताना त्यांना हे काहिसे जाणवले होते की पैशाबरोबरच रसिकतादेखील आवश्यकत आहे. थोडेफार त्याचे प्रदर्शनही केले पाहिजे.
शेठजीच्या मनाने ही गोष्ट घेतली आणि विचार सुरू केला. मग त्यांच्या हिशोबी नजरेने पंडित कलानिधी यांचे नाव अचूक हेरले. पंडितजींची मैफल आयोजित करायची असे त्यांच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे प्रयत्न सुरू झाले.
त्याच शहरात राहणाऱ्या पंडितजींनादेखील शेठजींबद्दल थोडीफार माहिती होती.' पैसा हेच सर्वस्व' मानणारे शेठजी आपल्याला मैफिलीचा आग्रह का करत आहेत हे त्यांच्या लक्षात आले नाही. बरेच दिवस पंडितजींनी वेगवेगळी कारणे सांगून निमंत्रण स्वीकारायचे नाकारले. परंतु शेठजींच्या निमंत्रणाने जणू त्यांचा पिच्छाच पुरवला आणि विचार बदलायला लावला. शेवटी पंडितजींना निमंत्रण स्वीकारावे लागले निमंत्रण स्वीकारताना पंडितजी म्हणाले, " नेहमीप्रमाणेच माझी मैफिल वेळेवरच सुरू होईल. कोणत्याही कारणासाठी त्यात उशीर चालणार नाही. केवळ गाणे हेच महत्त्वाचे असेल. अन्य कोणतेही उपचार नकोत."
पंडितजींनी घातलेली अट स्वाभाविकपणे मान्य झाली. या मैफिलीची बिदागीदेखील पंडितजींनी न मागताच घसघशीत अशी ठरवण्यात आली.
पंडितजींचे इतर दौरे , कार्यक्रम चालूच होते. बघताबघता मैफिलीचा दिवस उजाडला. मैफिलीच्या सुमारे तासभर आधी पंडितजी शेठजींच्या आलिशान घरी दाखल झाले. सोबत त्यांचा शिष्यवर्ग आणि साथीदार होते. अर्थातच थाटात स्वागत झाले. बैठकीवर बसून वाद्यांची जुळवाजुळव सुरू झाली. शेठजींनीदेखील खास यासाठी वेळ पूर्ण वेळ राखून ठेवला होता. शहरातील मोठमोठ्या लोकांना आवर्जून निमंत्रण देण्यात आले होते. यानिमित्ताने आपल्या रसिकतेचे प्रदर्शन करण्याची संधीच ते साधत होते. मैफिल सुरू होण्याची वेळ जवळ येत चालली. येणाऱ्यांची योग्य ती विचारपूस करून त्यांना
इकडे पंडितजी मैफिलीची तयारी करत होते. त्याच वेळी दिल्लीवरून एक बडी असामी अचानक शेठजींच्या घरी दाखल झाली. ही असामी येणार याची शेठजींना आधी कल्पना होतीच. अर्थातच शेठजींना त्यांच्याकडे स्वतः लक्ष देऊ लागले. त्या असामीने आणलेला प्रस्तावच इतका मोठा होता की त्याकडे दुर्लक्ष करणेपण शक्य नव्हते. चर्चा सुरू झाली. बघता बघता मैफिलीची वेळ जवळ येत चालली. शेठजींनी चंद्रकांतमार्फत थोडा वेळ थांबण्याची विनंती पंडितजींना केली. पण चर्चा पूर्ण होण्याची काही लक्षणे दिसेनात. म्हणून दहा पधरा मिनिटांनी मैफिल सुरू करण्याची सूचना पाठवली. पंडितजींनी आपल्या तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवले आणि मैफिलीत सफाईदारपणे आपली गायन कला सादर केली. उपस्थित रसिक आनंद लहरींमध्ये यथेच्छ डुंबत होते. मैफिल अगदी कळसाला पोचली आणि पंडितजींनी भैरवीचे सूर आळवायला सुरुवात केली. भैरवीच्या स्वरांनी तर जणू स्वर्गच उभा राहिला. भैरवी संपता संपता शेठजी आपल्या दिल्लीच्या पाहुण्यांना घेऊन मैफलीत दाखल झाले. अगदी थोड्या वेळातच भैरवी पूर्ण झाली. तेव्हा तर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि पंडितजी विनम्रपणे त्याचा स्वीकार करून साहित्य आवरायला सुरुवात केली. शेठजी मात्र पटकन म्हणाले, " हे काय आम्ही आलो आणि गाणे संपले. अजून तुम्हाला गावेच लागेल." पंडित शांतपणे म्हणाले, " आता भैरवी झाली आहे. आता या मैफिलीत गाणे होणार नाही." " असे कसे होणार नाही याची बिदागी दिली आहे तुम्हाला." हे शब्द ऐकले मात्र आणि पंडितजींनी हाक दिली , "सारंग बिदागीची थैली शेठजींना परत देऊन टाक." जणू काही वीज कोसळावी आणि थिजून जावे तसे सर्वजण थिजून गेले. पंडितजींचा शिष्य असलेल्या सारंगने सावकाशपणे थैली नेऊन शेठजींपुढे ठेवली. नंतर एक अक्षर देखील न बोलता पंडितजी आणि त्यांचे सर्व साथीदार शेठजींच्या बंगल्यातून बाहेर पडले.
सुधीर गाडे, पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
शिस्त पैशाच्या तराजूत ना मोजता येणारी कला सुंदर लेखन केल्या सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteसुंदर लेखन सर
ReplyDeleteसर धन्यवाद
ReplyDelete