प्रतिसाद ( भाग २ )
( काल्पनिक कथा )
पंडित गुणनिधी यांनी शेठजींची नाकारलेली थैली हा शहरात चर्चेचा विषय झाला होता. परंतु जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने पंडितजींची दिनचर्या, कार्यक्रम सुरू होते. त्यांच्या शिष्यांना तर लोक बोलावून घेऊन घडलेल्या गोष्टीबद्दल आपली उलटसुलट मते ऐकवत असत. काही जणांच्या प्रतिक्रिया ऐकून शिष्य अस्वस्थ होत असत. होणारी चर्चा कधीमधी दबक्या आवाजात पंडितजींच्या कानी येत असे. परंतु पंडितजी मात्र या सगळ्यात अतिशय स्थिर बुद्धीने वागत होते. पुढच्या कार्यक्रमांमध्ये काय सादर करायचे, नवीन काय जोडायचे याच्या विचारात गढून जात. तयारी करत होते.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
शेठजींच्या घरी झालेल्या मैफिलीनंतर आठवडाभरातच पंडितजींचा एक कार्यक्रम शहरातच होता. शहरातील ' मुकुंद गायन सभा ' या संस्थेला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने पंडितजींच्या मैफिलीचे आयोजन केले होते. मुकुंद गायन सभा स्थापनेपासूनच नवीन पिढीकडे भारतीय शास्त्रीय संबंधी संगीताचा वारसा सोपवण्याचे काम संगीत शिक्षणाच्या माध्यमातून करत होती. गायक, कलाकार यांच्या बरोबरच रसिकांच्याही अनेक पिढ्या गायन सभेने घडवलेल्या होत्या. अशा या नामांकित सभेच्या शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम हा शहरातील सांगितिक वर्तुळात एक महत्त्वाचा टप्पा होता. संबंधित सर्वजण या कार्यक्रमासाठी अतिशय आनंदाने उत्साहाने धावपळ करत होते. शेठजींच्या घरी झालेला प्रसंग सांगोवांगीने सगळीकडे पसरला आणि आता या कार्यक्रमात काय होणार याची थोडीशी काळजीयुक्त चिंतादेखील काही जणांच्या मनात डोकावत होती.
मुकुंद गायन सभेच्या शताब्दीच्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला कार्यक्रमाची वेळ जवळ येत चालली पंडितजी आपले शिष्य आणि साथीदार यांच्यासोबत अतिशय आनंदाने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. सुरूवातीला थोडा औपचारिक आदर सत्कार झाल्यानंतर वाद्यांची जुळवा जुळव झाली आणि पंडितजींच्या गायनाला सुरुवात झाली. पंडितजींची दशकांची साधना जणू आज कळसाला पोहचली होती. पंडितजींच्या स्वर्गीय स्वरांची बरसात श्रोत्यांवरती होत होती. या स्वर्गीय स्वरलहरींमध्ये श्रोते अवर्णनीय आनंदाने जणू डुंबत होते.
पंडितजींचा आजच नूर काही वेगळाच होता. पारंपारिक गायकीमध्ये आज ते काही नवीन रंग भरत होते. त्यामुळे रसिक आश्चर्यचकित झाले होते. परंतु या आनंदाच्या अनुभवाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. दीर्घकाळ चाललेल्या या अविस्मरणीय मैफिलीची सांगता भैरवीच्या मधुर स्वरांनी झाली. हा अवर्णनीय अनुभव सर्वांना स्तब्ध करून गेला होता. काळ वेळ त्याच ठिकाणी थिजून गेली होती. गाणे संपले तरी काही वेळ सर्वत्र शांतताच होती. काही वेळानंतर मात्र टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तो सलग काही मिनिटे चालू होता.
मन भरून टाकणाऱ्या मैफिलीची सांगता झाली होती. अनेक मंत्रमुग्ध रसिकांनी हळूहळू पुढे येऊन पंडितजींच्या भोवती कडे केले होते. काही जण मात्र याच आनंदाचा अनुभव अंतःकरणात साठवून हळूहळू बाहेर पडत होते. याच वेळी संगीत सभेचे संचालक मुकुंदराव लगबगीने पुढे आले. त्यांनी तर पंडितजींना साष्टांग दंडवत घातला. पंडितजींनी त्यांना उठवून उभे केले. भारलेल्या मुकुंदरावांच्या तोंडून जणू शब्द फुटत नव्हते. याच वेळी एक किशोरवयीन मुलगी लगबगीने पुढे आली आणि तिने पंडितजींना विनम्रतेने वाकून नमस्कार केला. पंडितजींनी तिला आशीर्वाद दिला. ती मुलगी उठून उभे राहिली. त्यावेळी मुकुंदराव एकदम म्हणाले, "अगं लतिका आज नेमका तू कसा उशीर केलास." " काय सांगू भाऊसाहेब, आजच माझ्या सोबतीने काम करणाऱ्या पूजाच्या घरी अडचण आली आणि इच्छा नसतानाही मला कामावर जावे लागले." लतिकाने उत्तर दिले.
हा संवाद ऐकणाऱ्या पंडितजींनी मुकुंदरावांना विचारले, " ही लतिका कोण?" " ही आमच्या गायन सभेत गायन शिकते आहे. अगदी गोड गळा आहे हिचा. एकपाठी आहे. एकदा ऐकलं की लगेच आत्मसात करते. पण घरची ओढाताण असल्याने तिला अर्धवेळ नोकरी करावी लागते. किती आतुरतेने ती आजच्या मैफिलीची वाट पाहत होती. पण बघा ना! आजच ती नेमकी येऊ शकली नाही . " मुकुंदराव म्हणाले. हे ऐकून पंडितजींनी प्रेमाने लतिकाची विचारपूस केली. लतिकानेही अतिशय नम्रपणे सर्व गोष्टी सांगितल्या. शेवटी ती म्हणाली, " पंडितीजी, आज आपलं गाणं मला ऐकायचे होते. पण उशीर झाला. मी आपल्याला एक विनंती करते की आपण माझ्यासाठी गाल का?" " अगं मुली आता..." असं पंडितजी म्हणाले आणि क्षणभर थांबले. जणू काही विचार करत होते. काही क्षणातच ते म्हणाले, " सारंग, तंबोरा जुळव. मी गाणार आहे." सारंगच्या कानांवर हे शब्द पडले आणि त्याचा जणू आपल्या कानांवर विश्वासच बसेना. तो अदबीने म्हणाला, " पंडितजी, आता मैफिल संपली आहे. " " होय. ही मैफिल आता संपली आहे. पण मी आता लगेच दुसरी मैफिल सुरू करतो आहे. ही मैफिल आहे आता या संगीताची मनोभावे उपासना करणाऱ्या लतिकेसाठी." पंडितजींचे उत्तर ऐकले आणि लतिकेच्या हृदयात आनंदाच्या लहरी उचंबळून आल्या. काय बोलावे हे तिला समजेनाच. ती तशीच नि:शब्द उभी राहिली.
सारंग आणि बाकिच्या साथीदारांनी थोड्याच वेळात वाद्यांची परत जुळवाजुळव केली. पंडितजींनी परत एकदा गायला सुरुवात केली. उपस्थित रसिकांसाठी हा अचानक लाभच झाला. पंडितजींनी परत जवळपास तासभर मैफिल रंगवली. मैफिल संपली आणि कृतकृत्य झालेल्या लतिकेने विनम्रतेने पंडितजींसमोर लोटांगण घातले. " मुली , अशीच साधना चालू ठेव बर. देवी सरस्वतीची कृपा सदैव तुझ्यावर राहो." एक भारलेले वातावरण अनुभवून हळूहळू सगळेजण आपापल्या मार्गाला लागले.
परतताना शांतता होती. पण सारंगला राहवले नाही. तो पंडितजींना म्हणाला, " पंडितजी, एक विचारू? मागच्याच आठवड्यात आपण भैरवीनंतर गायला नकार दिला आणि आज आपण गायलात. हे कसं काय?" पंडितजी एकच वाक्य बोलले, " जशी भावना तसा प्रतिसाद!"
सुधीर गाडे, पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
जशी भावना तसा प्रतिसाद!".. उत्तम आणि सुंदर लेख🙏
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Deleteउत्तम आणि सुंदर
Deleteधन्यवाद!
Delete