उत्तराखंड सहलीतील अनुभव

हिमालय पर्वत आणि गंगा नदी गेली हजारो वर्ष भारतीय माणसाला भुरळ घालीत आहे. या दोन्हीचेही पावित्र्य मनामध्ये खोलवर झिरपले आहे. त्यामुळे हरिद्वार हृषिकेश येथे सहलीला जायचे असा विचार आला. या सहलीला जायचे निश्चित केले. दुसरी गोष्ट म्हणजे कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काही दिवस थंड हवेचे अनुभवता येतील या विचाराने मी , पत्नी सौ. शैलजा, साडू श्री जवाहर उपासे व सौ. शुभदा उपासे अशा चौघांनी बरोबर जाण्याचे निश्चित केले. १३ मे ते १९ मे अशी उत्तराखंडमध्ये सात दिवस आणि सहा रात्रींची ही सहल होती. गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या या सहलीमध्ये दिल्ली, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नैनीताल, मसुरी, हृषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणांचा समावेश होता. त्यामुळे काही नवीन ओळखी झाल्या. या सहलीत विमानाचा प्रवास झाला तसा हृषिकेशमध्ये सहासीटर रिक्षाचाही प्रवास झाला. एसीबसने प्रवास झाला तशी वल्ह्याच्या होडीतून नैनीतालमधील तलावात फेरी झाली. हृषिकेशमध्ये मोटरबोटीतून गंगा नदी ओलांडली ते वेगळे . दिल्लीला कडक उन्हाळा अनुभवला तशी नैनिताल आणि मसुरी येथील अल्हाददायक थंडीदेखील अनुभवली. मैदानी प्रदेशात रखरखते ऊन हो...