पुस्तक परिचय 'मी कसा झालो?'
अंगभूत गुण आणि कर्तृत्व, योगायोग, मिळालेल्या संधी आणि त्या संधीचे रुपांतर यशात करण्यासाठी केलेली धडपड अशा अनेक गुणांनी ज्यांचे आयुष्य विविधरंगी झाले अशी व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे. त्यांच्या गळ्यात सत्काराचे हार पडले तसे तुरुंगात जाण्याची वेळदेखील आली. स्तुतीसुमनांचा वर्षाव आणि शिव्याशापांचा भडिमार अशा दोन्ही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे दंतकथा वाटाव्यात अशा घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. या आयुष्याची वाटचाल कशी झाली याचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे 'मी कसा झालो?'.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
१३ ऑगस्ट १८९८ ते १३ जून १९६९ असे जवळपास सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्या आयुष्यतील १९५३ पर्यंत झालेली वाटचाल सांगणारे हे पुस्तक आहे. तोपर्यंत आचार्य अत्रे यांनी काव्य, विडंबन, शिक्षण, नाट्य, राजकारण , चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. अशा बहुपेडी आयुष्याची ओळख करुन देणारे अवघड काम या पुस्तकात सहजपणे पूर्ण झाले आहे.
माणसाच्या आयुष्याचे कप्पे पाडता येत नाही. परंतु या पुस्तकात आचार्य अत्रे यांनी आपल्या आयुष्यातील विविध क्षेत्रातील वाटचालींवर प्रत्येकी एक असे प्रकरण लिहिले आहे. प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक 'मी वक्ता कसा झालो?', 'मी शिक्षक कसा झालो?' अशा पद्धतीचे दिले आहे.
पुस्तकाची सुरुवात 'मी कुठे झालो?' या प्रकरणाने झाली आहे. या प्रकरणात अत्रे यांनी आपले गाव सासवड आणि शिक्षणाच्या निमित्ताने जिथे त्यांना यावे लागले ते पुणे शहर यांचे वर्णन केले आहे. या वर्णनामधील तपशीलातून आचार्य अत्रे यांच्या बालपणी, तरुणपणी या ठिकाणची परिस्थिती, समाजजीवन, नागरी सुविधा यांची कशी परिस्थिती होती याची माहिती मिळते. या वर्णनातून या दोन्ही ठिकाणांचे तत्कालीन तपशीलवार चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. तांबट आळीतील भांड्यांची ठकठक, नळातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज आणि आगगाडीची शिट्टी हे आवाज अत्रे यांनी पुण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच ऐकले. त्याचे त्यांना विशेष वाटले.
नंतरच्या प्रकरणात काव्य क्षेत्रातील वाटचाल अत्रे यांनी सांगितली आहे. योगायोगाने बालकवी आणि राम गणेश गडकरी या दोघांचे लहान भाऊ भावे हायस्कूलमध्ये अत्रे यांच्या वर्गात होते. त्यांच्या माध्यमातून अत्रे यांची दोघांशी झालेली ओळख, दोघांच्या काव्यरचनांमुळे भारावलेले अत्रे, गडकरी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यांचे मार्गदर्शन, स्वतःचे काव्य प्रसिद्ध करण्यासाठी केलेल्या खटपटी या सगळ्याचे वर्णन वाचायला मिळते.
या पुस्तकातील 'मी शिक्षक कसा झालो?' या प्रकरणात अत्रे यांच्या वडिलांच्यया आकस्मिक मृत्यूमुळे त्यांचा शिक्षण क्षेत्रात झालेला प्रवेश, आलेले वेगवेगळे अनुभव, पुण्यातील कॅंप एज्युकेशन सोसायटीवर मिळवलेला ताबा, तेथे केलेले प्रयोग, लंडनला जाऊन घेतलेले शिक्षण, महाराष्ट्रभर दिलेली शैक्षणिक विषयांवरची व्याख्याने, सुलभ शिक्षणासाठी लिहिलेल्या वाचनमाला, अशा गोष्टींची माहिती मिळते.
आचार्य अत्रे आपल्या विनोदी वक्तृत्व शैलीमुळे पुण्यामध्ये प्रसिद्ध झाले. तसेच त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्यदेखील लोकांच्या डोळ्यात भरले. या पार्श्वभूमीवर अचानकपणे बालमोहन नाटक मंडळींचे दामू अण्णा जोशी यांनी आचार्य अत्रे यांना नाटक लिहिण्याची केलेली विनंती, अनिच्छेने दिलेला होकार , जोशी यांचा पाठपुरावा, वर्तमानपत्रातील बातमीने पुरवलेला नाटकाचा विषय, रंगीत तालमीमध्ये पडलेले 'साष्टांग नमस्कार ' हे पहिले व्यावसायिक नाटक, याच नाटकाला अगदी पहिल्या प्रयोगापासून प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद आणि हास्यकल्लोळ अशा अनेक गोष्टींचे वर्णन नाट्य क्षेत्रातील कामगिरीचे वर्णन वाचताना समजतो. काही नाटकांचे विषय वास्तवावर आधारित , काही नाटकांचे प्रवेश पात्रांची भाषणे स्वप्नामध्ये स्फुरणे याचे वर्णन चकित करून सोडते.
अशाच प्रकारे अन्य प्रकरणांमध्ये आचार्य अत्रे यांच्या राजकीय ,चित्रपट, पत्रकारिता समाजवाद या क्षेत्रातील कामगिरी वाचायला मिळते. सर्व ठिकाणी अतिशय योगायोगाने त्यांचा प्रवेश झाला. परंतु प्रवेश झाल्यानंतर आपल्या गुणवत्तेने अत्रे यांनी त्या सर्व क्षेत्रावर आपली छाप उमटवली हे लक्षात येते. पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी केलेला झंझावाती प्रचार, निवडणुकीत त्यांच्या काँग्रेस पक्षाला मिळालेले यश, नगरपालिकेत हुकलेले महापौर पद, चित्रपट क्षेत्रात केलेली कामगिरी, त्यासाठी स्थापन केलेली कंपनी, त्याच कंपनीतूनच बाहेर पडण्याचा आलेला मानहानीकारक प्रसंग, मुंबईमध्ये मराठी माणसाने प्रथमच स्टुडिओ विकत घेण्याचा केलेला पराक्रम, चित्रपटासाठी उभारलेले कर्ज, महायुद्धामुळे बुडीत गेलेला व्यवसाय, त्यामुळे झालेला कर्जाचा डोंगर, हे सगळे चढ उतार या वेगवेगळ्या प्रकरणांत वाचायला मिळतात.
प्रसिद्धीचा परिणाम लोकांची प्रशंसा मिळवण्यात जसा होतो. तसा विनाकारण काही जणांची पोटदुखी उसळते. त्यातून दुःख भोगावे लागते. हे या पुस्तकातील 'मी आरोपी कसा झालो?' या प्रकरणात वाचायला मिळते. कोणताही संबंध नसताना आचार्य अत्रे यांना आर्थिक उलाढाल करणाऱ्या कंपनीच्या घोटाळ्यामध्ये आरोपी करण्यात आले. मनाला विलक्षण ताण देणारी ती दोन-तीन वर्षे , तो ताण या टोकापर्यंत वाढला की आत्महत्येचे विचारदेखील काही वेळा मनात येऊन गेले याची दिलेली कबुली, दारू पिण्याची सुरूवात या काळातच झाली याचीही कबुली या प्रकरणात वाचायला मिळते. परंतु शेवटी उच्च न्यायालयातील निर्दोष मुक्ततेने या वेदनादायक कालखंडाचा शेवट झाला हे समजते.
या पुस्तकातील शेवटचे 'मी कोण आहे?' हे प्रकरण म्हणजे या पुस्तकाचा कळस आहे. आचार्य अत्रे यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान या प्रकरणात वाचायला मिळते. आपण ठरवून काही केले नाही. पण जे वाट्याला आले त्यात कठोर मेहनत घेतली. आयुष्यात चुका केल्या , टीका केली, वाद खेळले पण कृतघ्नपणा, दांभिकपणा कधी केला नाही. मनापासून अधिकाधिक कर्म करतो तोच खरा संन्यासी, हाच कर्मयोगी असे ते म्हणतात. निसर्गसौंदर्याचे निरीक्षण, मुलांना गोष्टी सांगणे, दु:खितांना हसवणे, जिथे वाटले तिथे मोर्चात सामील होणे असा आयुष्याचा प्रवाह आहे असे ते म्हणतात. खिडकीतून घरात डोकावणाऱ्या मांजराच्या उत्सुकतेने आपण आयुष्याकडे पाहतो आहोत असे ते म्हणतात. 'मी जीवनाचा यात्रेकरू आहे.' ही भूमिका ते मांडतात.
आचार्य अत्रे यांची सहज सोपी भाषाशैली मनाला भावते. प्रवाही भाषा, चपखल वर्णन, नावे गावे स्थळे यांचे वर्णन केलेले तपशील वाचकाला माहिती पुरवतात. आचार्य अत्रे यांच्या विशाल व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या पुस्तकात सहजपणे समजतात. हिंदीमध्ये 'गागर में सागर' म्हणतात तसे आचार्य अत्रे यांच्या विविधरंगी आयुष्याचे दर्शन या पुस्तकात वाचकाला घडते.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
माणसाच्या आयुष्याचे कप्पे पाडता येत नाही. परंतु या पुस्तकात आचार्य अत्रे यांनी आपल्या आयुष्यातील विविध क्षेत्रातील वाटचालींवर प्रत्येकी एक असे प्रकरण लिहिले आहे. यावरून पुस्तकाचा सुंदर परिचय होतो........सुंदर लेखन सर 🙏🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteआचार्य अत्र्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात विविध क्षेत्रातील वाटचाल याचा सारांश या पुस्तकात आहे... सुंदर लेखन सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Delete