घटनात्मक लोकशाहीतील जलद न्यायासाठीची आव्हाने
काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे लहानग्या मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिला ठार मारण्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने मुली आणि स्त्रियांवरील अत्याचारांचा मुद्दा पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आला. या घटनेनंतर सर्वत्र निषेधाची, संतापाची लाट उसळली. अनेकांनी ताबडतोब न्यायाची मागणी केली. कुणी आरोपीची खांडोळी करा असे म्हटले. तर कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्त्रीवर अत्याचार केला म्हणून रांझे गावचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून त्याचा चौरंग केला तशी शिक्षा करावी असे म्हटले. कोणीकोणी आरोपीचा एन्काऊंटर व्हावा अशी अपेक्षा केली. घडलेल्या हिडीस, नृशंस घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजमनात संताप असणे अगदी स्वाभाविक आहे. लोकांना तो संताप घटनात्मक चौकटीत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. ही घटना घडल्यावर लगेच दोन तीन दिवसांत पुण्यात शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अशी घटना होता होता राहिली. पुन्हा समाजमन क्षुब्ध झाले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ताबडतोब व्हावी यावर विकृत माणसे वगळता कुणाचेही दुमत नाही. ...