निर्णय कोणता?
( काल्पनिक कथा )
"आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेलच." लॅपटॉप बंद करताना निकिताच्या मनात विचार आला आणि तिच्या आयुष्यातील गेल्या दोन-तीन वर्षांचा प्रवास तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तरळू लागला.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
निकिता ही लहानपणापासूनच एक बऱ्यापैकी हुशार मुलगी होती. दिसायला देखील पाचपन्नास जणीत उठून दिसेल असे तिचे रूप होते.लहानपणापासूनच आपली हुशारी रूप यांचं कोडकौतुक ऐकत ती मोठी झाली होती. मोठी होताना आपलं शिक्षण पूर्ण करून ती नोकरीलादेखील लागली होती. तिची नोकरी चांगली होती.
आता सहाजिकच या टप्प्यावर लग्नासाठी मुलाची शोधाशोध सुरू झाली. सर्व उपवर मुलींच्या प्रमाणेच निकिताच्यादेखील आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा होत्या. चांगलं कमावणारा, घरदार व्यवस्थित असणारा, चांगल्या घराण्यातील मुलगा तर तिला हवा होताच. परंतु तिची एक सर्वात महत्त्वाची अपेक्षा होती ती म्हणजे मुलगा दिसायला देखणा असला पाहिजे. झाले. या कमावत्या, गुणी रूपवान, मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहण्याचा क्रम सुरू झाला. कुठे घराणं होतं तर रूप नव्हतं. कुठे कर्तृत्व होतं तर घराणं नव्हतं. कुठे घराणं रूप हे दोन्ही होतं तर कर्तृत्व नव्हतं. असा काहीसा तिढा प्रत्येक वेळी होत होता. त्यामुळे आता हे लग्न कधी होते ही काळजी निकिता आणि तिच्या आई-वडिलांना पडली होती.
साधारण याच सुमाराला कुंदनचं स्थळ सांगून आलं. प्राथमिक बोलणीचालणी झाली. निकिता कुंदन यांच्या भेटीगाठी झाल्या. निकिताला हवा तसाच देखणा, घरंदाज, कर्तृत्ववान मुलगा आहे याची खात्री पटली आणि त्यांची गाडी साखरपुडा, लग्न या टप्प्यावरून पुढे जात संसाराला लागली.
नव्या नवलाईचा संसार सासरमाहेर दोन्हीकडून लाड कोड पुरवून घेत सुरू झाला. निकिताच्या दोन्हीही बाजू एकमेकांच्या तोलामोलाच्या असल्याने सर्व काही सुरळीत चालले होते. लग्न झाले तरी इतक्यात मूल होऊ द्यायचे नाही हा निकिता आणि कुंदन दोघांचा एक मताने ठरलेला निर्णय होता. आधी दोन चार वर्षे आयुष्याच्या आनंद एकत्र उपभोगूया आणि मग बाळाची जबाबदारी घेऊ या हे त्यांनी विचारपूर्वक ठरले होते. अशी ही सुखी संसाराची गाडी तिच्या रस्त्यावर चालत होत. नव्हे नव्हे तर सुखी संसाराच्या महामार्गावर धावू लागली होती.
एकेदिवशी अचानक निकिताला लक्षात आले की कुंदनच्या पाठीवर एक सुईच्या टोकाएवढा पांढरा डाग आहे. हा डाग कशाचा आहे याचा विचारदेखील तिच्या मनात आला नाही. काहीतरी लागले असेल असे समजून तिने ते सोडून दिले. पण थोड्याच दिवसात तिच्या लक्षात आले की हा डाग हळूहळू मोठा होत चालला आहे. आता तोच डाग जवळपास शर्टच्या एका बटनाएवढा झाला होता. तिने ते कुंदनच्या लक्षात आणून दिले. मग दोघांची चर्चा झाली आणि यासाठी त्वचारोगतज्ञाला भेटायचे ठरले. कुंदनने खटपट करून लवकरच त्वचारोग करण्याची भेट घेतली. त्यांनी त्या भागाची पाहणी करून काही औषधे लिहून दिली. त्याचा परिणाम झाला आणि महिन्याभरात तो डाग दिसेनासा झाला.
पुन्हा दोघांचे सहजीवन सुरू राहीले. परत दोन-चार महिने गेले. असाच एक डाग आता पोटावर उमटला होता. तो डाग बघून कुंदन जरा चमकलाच आणि त्याने तातडीने पुन्हा डॉक्टरांची भेट घेतली. पुन्हा औषधोपचार झाले. डाग आता पूर्णपणे गेला नाही परंतु थोडा कमी झाला. दिलेली औषधे संपत आली होती. त्यावेळी असाच डाग अजून एक दोन ठिकाणी उमटला आहे हे कुंदनच्या लक्षात आले आणि तो हाधरलाच. मग त्याने खटपट करून आणखी एक डॉक्टर शोधून काढले. त्यांच्या औषधाचा गुण आला पण शंभर टक्के नाही. त्यावर ते डॉक्टर म्हणाले की, " आपण आता शक्य तितके प्रयत्न केले आहेत. याच्यापुढे फार काही करता येणार नाही." डॉक्टरांचा हे म्हणणे ऐकून कुंदनला धक्का बसला.
हळूहळू ही गोष्ट निकिताच्या देखील लक्षात आली होती . ती आवर्जून वेळ काढून कुंदनसोबत डॉक्टरांकडे जात असे. त्यांच्याशी चर्चा करत असे. पण तेवढ्याने तिचे समाधान होईना. मग तिने इंटरनेटवर याबाबत शोधाशोध सुरू केली आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलेल्या निष्कर्षावर ती पोचली की हे डाग आता वाढतच जाणार. अशाच एका भेटीमध्ये निकिताने डॉक्टरांना विचारले की , " डॉक्टर संपूर्ण शरीरभर हे डाग पसरायला किती वेळ लागेल?" डॉक्टर म्हणाले, " याचे काही निश्चित उत्तर देता येत नाही. परंतु कुंदनच्या बाबतीत मी थोडा बुचकळ्यात पडलो आहे. याचे कारण मी आत्तापर्यंत बघितलेले रुग्ण हे मध्यमवयीन होते आणि त्यांच्या अंगावरील डाग वाढत जाण्याचा वेग थोडा मंद होता. परंतु मला आश्चर्य वाटते की कुंदन तरुण आहे पण त्याच्या अंगावरील डाग वाढत जाण्याचा वेग मात्र खूपच जास्त आहे. अंदाजे एक दीड वर्षातच हे डाग कुंदनच्या शरीरभर पसरतील असे मला वाटते. आतापर्यंत केलेले सर्व उपचार लक्षात घेता अजून वेगळे काही उपचार करता येतील असे मला वाटत नाही." डॉक्टरांचे हे शब्द ऐकून कुंदन आणि निकिता दोघांनाही धक्का बसला आणि काही न बोलता ते तिथून निघाले.
दोघांच्यातील संवादाचा आता हाच एक विषय होऊन राहिला होता तो म्हणजे कुंदनच्या शरीरावर वाढत जाणारे पांढरे डाग. निकिता तर फारच अस्वस्थ होती. परंतु डॉक्टरांच्या या भेटीनंतर साधारण महिनाभरात तिला लक्षात आले की कुंदनने आता हे सत्य मनानेदेखील स्वीकारले आहे आणि तो या पांढऱ्या डागांचा आता फार बाऊ करण्यात वेळ घालवत नाही.
या सगळ्या काळात निकिताच्या मनात प्रश्नांचा मोठा गुंता झाला होता. तिला राहून राहून वाटत होते की , "आपल्याला तर देखणा नवराच हवा होता पण हे काय होऊन बसले. कुंदनला कदाचित या दुखण्याची कल्पना असावी पण त्याने लपवून ठेवले." तिच्या मनात हा विचार आला आणि ती एकदम चमकली. या प्रश्नाचा सोक्षमोक्ष कसा लावावा हे तिला समजत नव्हते. मग एके दिवशी तिने कुंदनच्या नकळत डॉक्टरांशी भेट घेतली. त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी डॉक्टर उत्तरले की, " हे दुखणे इतक्या अचानकपणे उद्भवले आहे की कुंदनला त्याची आधी कल्पना होती असे मला वाटत नाही." डॉक्टरांच्या या उत्तराने निकिता निरुत्तर झाली आणि बाहेर पडली.
निकिताच्या मनातला गोंधळ अधिकच वाटला होता. आधी तिला असे वाटत होते की कुंदनने आपली याबाबतीत फसवणूक केली. त्यामुळे तिच्या मनात नकळत चीडदेखील आली होती. परंतु डॉक्टरांच्या उत्तराने मात्र आता चिडण्याचे कारण नाही हे तिच्या लक्षात आले आणि तिची निराशा झाली. निराशा होण्याचे कारण की देखणा नवरा पाहिजे ही आपली अपेक्षा होती त्या अपेक्षेपोटीच कुंदनशी लग्न केले होते. पण आता हे काय उद्भवले या निराशेतून तिच्या मनात विचार येऊ लागला. खरंतर हा विचार तिच्या मनात आधीच आला होता. तेव्हा तिला वाटत होते की कुंदनने आपली फसवणूक केली त्यामुळे घटस्फोट घेऊन या माणसापासून दूर जायचे. डॉक्टरांच्या उत्तराने ही फसवणूक नव्हती हे तिला समजले. परंतु पांढरे डाग असणारा नवरा देखील तिच्या कल्पनेत मुळीच नव्हता. त्यामुळे आता घटस्फोट घ्यावा की काय याचा विचार ती नव्याने करू लागली. विचार करताना तिच्या लक्षात आले की , "देखणा नवराच हवा ही आपली अपेक्षा आता पूर्ण होत नाही हे तर खरेच आहे." पण तिच्या मनात अजून एक विचार आला की देखणं रूप हीच सुखी संसाराची किल्ली आहे का?
लग्नाला आता दीड दोन वर्षे होऊन गेली होती. या काळात कुंदन आणि त्याचे आई वडील यांनी अगदी प्रेमाने तिला स्वीकारले होते. निकिता आपले आई-वडील घर सोडून सासरी आली त्यामुळे तिला तिथे रुळायला आपण पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे या धोरणानेच या सगळ्यांनी तिच्याशी वागणे ठेवले होते. निकिता विचार करू लागली तेव्हा इतर मैत्रिणींपेक्षा आपल्याला सासरी रुळायला फार अवघड गेले नाही हे तिच्या लक्षात आले. त्यामुळे ही मंडळी स्वभावाने चांगली आहेत याची खूणगाठ पटली. पण पुन्हा मनातली देखणा नवराच पाहिजे ही अपेक्षा उफाळून वर आली.
आपल्या मनातील विचारांच्या या झगड्याने निकिता अगदी हतबल झाली होती. काय करावे हे तिला लवकर सुचत नव्हते. बर आपल्या मनाचा निर्णय झाल्याशिवाय कोणाशीही अगदी आई-वडील मैत्रिणी यांच्याशी देखील बोलायचे नाही असे तिने ठरवले होते. याच्यातच काही दिवस गेले पण निकिताच्या मनातील घालमेलीचा निर्णय अजून लागत नव्हता आणि अशाच वेळी तिच्या मनात आले की " आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेलच."
सुधीर गाडे पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments
Post a Comment