मन झाले मोकळे

                   ( काल्पनिक कथा )

    "आता काय करावे ?" राजे विक्रमगुप्त स्वतःशीच उद्गारले? आजूबाजूला कोणीही दासदासी उपस्थित नव्हते. राजांनीच तशी आज्ञा दिली होती एकांत हवा होता म्हणून. राजेसाहेब आपल्या कक्षात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांच्यासमोरची समस्या गंभीर होती. 

             ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

       अगदी आठ दिवसांपूर्वीच घडलेला प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. पुन्हा पुन्हा या प्रसंगाचे त्यानना स्मरण होत होते. राजे विक्रमगुप्त आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शिकारीसाठी राजधानी बाहेर पडून जंगलात गेले होते. यावेळी जरा वेगळी वाट त्यांनी निवडली. शिकारीचा आनंद घेताना महाराजांना विलक्षण स्फुरण चढत असे. अशा अनेक शिकारी त्यांनी आजपर्यंत केल्या होत्या. रस्ता नेहमीपेक्षा वेगळा होता. वाटेवरती एका सत्पुरुषांचा आश्रम असल्याची वार्ता महाराजांच्या अग्रदूताने त्यांच्याकडे पोचवली. या सत्पुरुषाच्या दर्शनाला जावे असे राजांच्या मनात आले. मग काय 'राजा बोले आणि दळ हाले'. सर्व व्यवस्था झाली आणि राजे आपल्या सर्व लवाजम्यासह सत्पुरुषांच्या आश्रमात पोचले. आश्रमात साधीच पण नीटनेटकी व्यवस्था होती. सत्पुरुष धीरानंद एक तपस्वी होते. वैयक्तिक साधने बरोबर ते विद्यादानाचे कामदेखील करीत असत. अनेक वर्षांची त्यांची साधना होती. या साधनेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी धीरानंद नेहमीच तत्पर असत. आपल्या साधनेमुळे धीरानंद यांना भविष्य कथनाची विद्या हस्तगत होती. माणसाचा चेहरा पाहून त्यांच्या डोळ्यासमोर त्या माणसाचे भविष्य तंतोतंत उभे राहत असे. आजवर अनेकांना धीरानंद यांच्या या विद्येचा फायदा झाला होता. राजे विक्रमगुप्त आश्रमात आले. त्यांनी नम्रपणाने  धीरानंद यांना वंदन केले. जे शक्य होते ते उपहार त्यांनी भेट म्हणून धीरानंद यांना देऊ केले.‌ हिरानंद यांनी अतिशय नम्रपणाने या सर्व भेटींना नकार दिला. "तो ईश्वर माझी सर्व काळजी घेतो." असे त्यांनी राजे साहेबांना सांगितले. वार्तालाप चालू असताना धीरानंद यांची मुद्रा हळूहळू गंभीर होत गेली आणि काही वेळातच त्यांना राजेसाहेबांना सांगितले की, " आपण दोघेच एकांतात बोलूयात." त्याप्रमाणे सर्व आश्रमवासी तसेच विक्रमगुप्त यांच्याबरोबर आलेली सर्व मंडळी धीरानंद यांच्या झोपडीतून बाहेर पडली. सगळेजण बाहेर पडल्यावर धीरानंद यांनी  गंभीरपणे राजेसाहेबांना सांगितले की , "तुमचा हात दाखवा." राजांनी आपला उजवा हात पुढे केला काही क्षण एकाग्र चित्ताने धीरानंद यांनी तो हात पाहिला आणि अलगद सोडून दिला. ते तसेच काही न बोलता शांत बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर संभ्रमावस्था होती.  विक्रमगुप्त या सगळ्या प्रकारामुळे अस्वस्थ होऊ लागले. तरीदेखील तेही थोडा वेळ शांत राहिले. पण या शांततेची टोचणी विक्रमगुप्त यांना अतिशय अस्वस्थ करू लागली. आणखी काही वेळ गेल्यानंतर विक्रमगुप्त म्हणाले , "स्वामीजी कृपया आपण शांत राहू नका. आपल्याला जे काही सांगायचे आहे ते मला सांगा. आपले म्हणणे ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे." विक्रमगुप्त यांच्या या विनंतीनंतर धीरानंद गंभीरपणे बोलू लागले , "हे राजा, जन्म आणि मरण हे या जगातील अटळ गोष्टी आहेत. जो जीव जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरण आहे. परंतु मृत्यू होणार हे निश्चित माहित असले तरी प्रत्यक्ष वेळ माहिती नसल्यामुळे मनुष्य जीवनाचा आनंद घेत राहतो. त्यामुळे मी तुला जे सांगतो आहे ते तू अतिशय लक्षपूर्वक ऐक. तुझा जीवन काल आता संपत आला आहे. आजपासून दोन महिने आणि सात दिवसांनी तुझा मृत्यू निश्चित आहे." धीरानंद यांचे हे शब्द ऐकताच विक्रमगुप्त यांच्यावर जणू वज्राघातच झाला. त्या झोपडीत पुन्हा एकदा शांतता पसरली. या शांततेचा भंग धीरानंद यांनी केला आणि ते बोलू लागले , "राजा तुझे हृदय विदीर्ण करणारी ही माहिती सांगण्याची मला इच्छा नव्हती. परंतु तू स्वतःच त्याबाबत विनंती केली म्हणून मी तुला ते सांगितले. आणखी एक गोष्ट याबाबत मी तुला सुचवतो आहे ही माहिती तू स्वतःपुरती ठेवलीस तर त्यात तुझेच कल्याण आहे. इतर कोणाही मनुष्याला तू याबाबत न सांगणे तुझ्या हिताचे आहे." धीरानंद यांचे शब्द विक्रमगुप्त यांचे काळीज कापत कापत आतमध्ये उतरले. अतिशय जड अंतःकरणाने विक्रमगुप्त यांनी पुन्हा एकवार धीरानंद यांना वंदन केले आणि ते बाहेर पडले. आठ दिवसांपूर्वीचा हा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर सतत दिसत होता. दिवसा तर ते या प्रसंगाचे स्मरण करत होते पण रात्रीदेखील त्यांना निद्रादेवी वश होत नव्हती. टक्क उघड्या डोळ्यांसमोर धीरानंद यांची मूर्ती पुन्हा पुन्हा दिसत होती. शिकारीहून  परत आल्यानंतर विक्रमगुप्त यांच्या वागण्यात झालेला अचानक बदल सर्वांच्याच लक्षात आला. राणी शीलवती आणि तारूण्याचा उंबरठ्यावर उभे असलेले युवराज शौर्यगुप्त हेदेखील या वागण्यामुळे अतिशय अस्वस्थ झाले होते. सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करूनही काय घडले आहे हे मात्र विक्रमगुप्त कोणा पुढेही बोलले नाहीत. अनेक क्षण असे आले की आता हे सांगून टाकावे असे त्यांच्या मनात आले. पण त्याच क्षणी धीरानंद यांची सूचना वजा आज्ञा, " हे कोणाही मनुष्याला सांगायचे नाही.* त्यांच्या कानामध्ये निनादत नादत होती.

     सर्व प्रकारची खटपट करूनदेखील राजे साहेबांचे दुःख कोणालाच समजत नव्हते. राजदरबारातील सर्व कामकाज ठप्प झाले होते. राजधानीमध्ये सगळीकडे एकच चर्चा होती. जो तो आपली कल्पना लढवीत होता. आपला तर्क सांगत होता. सगळीकडेच एक अस्वस्थ , उदास असे वातावरण तयार झाले होते.

           विक्रमगुप्त हे धीरानंद यांच्या आज्ञेच्या बंधनात होते. घडणारी अटळ घटना प्रत्येक दिवसागणिक जवळ येत चालल्याच्या जाणीवेने ते अधिकच खचत चालले होते. याचा परिणाम शरीरावरदेखील झाला होता. कोणत्यातरी भयंकर दुखण्याने गाठल्याची कळा त्यांच्या देहावर पसरली होती. चेहऱ्याची रयाच पूर्ण पणे निघून गेली होती." कोणाही मनुष्याला सांगायचे नाही. कोणाही मनुष्याला सांगायचे नाही." हेच वाक्य पुन्हा पुन्हा त्यांच्या कानामध्ये घुमत होते.

     ही अस्वस्थता घेऊन येरझाऱ्या घालताना विक्रमगुप्त यांच्या मनात एक कल्पना सुचली. त्यांनी टाळी वाजवून दासाला जवळ बोलावले आणि आज्ञा केली. " आम्ही आता ताबडतोब उद्यानात  जाणार आहोत. रथाची व्यवस्था करा." सेवकांनी धावत जाऊ सर्व व्यवस्था केली. राजेसाहेब उद्यानात जाण्यासाठी निघाले ही वार्ता सर्व राजवाड्यात पसरली. राणी शीलवती यांनादेखील याचे आश्चर्य वाटले आणि त्या लगबगिने राजांकडे आल्या. त्या म्हणाल्या , "आम्हीदेखील आपणासोबत येऊ इच्छितो." प्रणवगुप्त शांतपणे गंभीर स्वरात म्हणाले , "आम्ही एकटेच जाणार आहोत. आपण कोणीही माझ्यासोबत येऊ नये ."

     राजांची आज्ञा पाळली गेली. एकट्या राजेसाहेबांना घेऊन रथ उद्यानाच्या दिशेने गेला. उद्यानाबाहेर राजेसाहेबांनी सारथ्याला थांबायला सांगितले. ते एकटेच शांतपणे पावले टाकीत उद्यानाच्या मध्यभागाच्या दिशेने चालू लागले. चालत चालत ते उद्यानाच्या अगदी मध्यावर पोचले. त्यांनी आजूबाजूला पाहिले. त्यांच्या आज्ञेनुसार आता उद्यानात ते एकटेच होते.

           उद्यानात मध्यभागी एक आम्रवृक्ष होता. राजेसाहेब त्या वृक्षाच्या पायथ्याशी बसले आणि जणू एखाद्या जिवलगाला आपले दुःख सांगावे तसे त्या वृक्षाला आपले दुःख सांगू लागले. ओढवलेल्या प्रसंगामुळे विक्रगुप्त भावनाविवश झाले. गेले आठ दिवस मनात सर्व भावना कोंडून ठेवलेल्या होत्या. एखाद्या झाकण ठेवलेल्या भांड्यामध्ये पाणी उकळत राहावे असे दुःख, औदासिन्य , चिंता, अविश्वास या सर्व भावना त्यांच्या आतल्या आत खदखदत होत्या.‌ या सर्व भावना तोंडावाटे बाहेर पडल्या. डोळ्यांवाटे अश्रूंच्या धारा लागल्या. 

      जवळपास अर्धा प्रहर विक्रमगुप्त त्या वृक्षाशी बोलत होते. बोलून बोलून त्यांच्या घशाला कोरड पडली. पाणी उकळत असलेले भांडे झाकण काढून खाली ठेवले की उकळते पाणी हळूहळू थंड होत जाते तशा प्रणवगुप्त यांच्या भावना, विचार हळूहळू शांत होऊ लागले. मनात कोणत्याही प्रकारचे विचार आता उद्भवत नाही अशा एका अवस्थेपर्यंत प्रणाम विक्रमगुप्त पोचले. काही काळ ही अवस्था राहिली.

      विक्रमगुप्त यांच्या लक्षात आले की आपले दुःख, परिस्थिती बोलून दाखवल्यामुळे त्यांचे मन आता थोडेसे शांत झाले आहे. आता ते थोडा तर्कसंगत पद्धतीने विचार करू शकत आहेत. गेल्या पंधरा दिवसात त्यांची तर्कशक्ती, विचार प्रक्रिया जणू खुंटली होती. आज मात्र ते मोकळे झाले होते. अटळ मृत्यूला सामोरे जाण्यापूर्वी काय काय करावे लागेल याची योजना त्यांनी आपल्या मनात केली. त्याचे टप्पे काय असावेत याचादेखील बारकाईने विचार केला. सर्व योजनेचा पुन्हा एकदा आपल्या मनात आढावा घेतला आणि ते उठून रथाकडे चालू लागले. आता त्यांच्या चेहऱ्यावर निश्चय दिसत होता. 

सुधीर गाडे, पुणे 

( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची