जिवाभावाचे असावे कोणीतरी
माणूस हा समाजाभिमुख प्राणी आहे. त्यामुळे समूहाने राहणे ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. आपला जन्म ,बालपण, नोकरी व्यवसाय या सगळ्या टप्प्यांतून आपले नातेसंबंध निर्माण होतात. यातील नाती ही रक्ताची असतात तर संबंध हे वेगवेगळ्या निमित्ताने येतात. परंतु या नात्यांपैकी किंवा संबंधांपैकी काही जणांची माणसाशी कळत नकळत जवळीक निर्माण होते आणि त्यातून जीवाभावाचे मैत्र तयार होते. वेळ प्रसंगाला, अडीअडचणीला हे मैत्र , ही नाती उपयोगी पडतात. पण काही वेळा परिस्थिती अशी येते किंवा निर्माण होते त्यावेळी असे जिवाभावाचे कोणी नाही याची खंत वाटते. त्याचा स्वाभाविक परिणाम माणसाच्या आयुष्यावर होतो. तणावातून , निराशेतून काही दु:खदायक प्रसंग देखील घडतत. अशा परिस्थितीत विचारपूर्वक मार्ग काढला पाहिजे. याबाबतीतले माझे दोन अनुभव सांगावेसे वाटले म्हणून लिहिले आहेत.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
साधारण सहा-सात वर्षांपूर्वी एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा योग आला. नोकरी निमित्ताने अन्य राज्यातील हा कार्यकर्ता पुण्यात आला होता. त्यावेळी सोबत त्याची पत्नी होती. नवीनच लग्न झालेले होते. मूलबाळ काही नव्हते. एका बंगल्यांच्या वसाहतीत हे दोघच जण भाड्याने राहत होते. नवरा एकटाच नोकरी करत होता. बायको दिवसभर घरी एकटी असायची. त्या वसाहतीत शेजारपाजार असा काही प्रकार नव्हता. हे दोघेही ज्या राज्यातील होते त्या राज्यात अजूनही स्त्रियांना फार मोकळेपणाची वागणूक नसल्याची स्थिती होती. नवरा दिवसभर कामावर गेला तर काय करायचे हा त्याच्या बायकोला रोज पडणारा प्रश्न असावा. कारण शहरात तिच्या वैयक्तिक ओळखीचे किंवा संबंधाचे कोणीही नव्हते. हे सगळं संवादातून लक्षात आलं. मी बोलता बोलता त्या कार्यकर्त्याला म्हणालो की , "आवर्जून बायकोला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात जा. तुझ्या नोकरीतील सहकारी, संघातील सहकारी यांच्या घरच्या मंडळींशी तिची ओळख होईल याची जरा खटपट कर. काही निमित्त काढून सहकुटुंब एकत्रीकरण, भेटी होतील असे बघ. त्यातून तिला काही जणांशी संबंध जोडता येतील. तिचा एकटेपणा थोडा कमी होईल." त्या कार्यकर्त्याला हे पटले आणि तसे प्रयत्न करायचे त्याने मान्य केले.
असाच दुसरा एक प्रसंग. माझ्या परिचयाचे एक व्यावसायिक साधारण तीन वर्षापूर्वी मला म्हणाले, " माझ्या वैयक्तिक अडचणीबद्दल बोलायचं आहे. माझा मुलगा अन्य देशात नोकरी करतो. एका विद्यापीठात प्राध्यापक आहे. तिथे बहुतेक सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती घेऊन शिकायला येतात. परंतु बरेचजण अभ्यासात मात्र चालढकल करतात. तरीही माझ्या मुलाने त्यांना पास करावे अशी त्यांची अपेक्षा असते. मुलाने असे केले नाही तर ही मुले निगेटिव्ह फीडबॅक देऊ शकतात. त्याचा मुलाच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो. याबाबत काय करायचे हे सुचतं नाही तुम्ही काहीतरी सांगा." मी त्यांना म्हणालो, " अन्य देशात असल्यामुळे त्याच्या ओळखीचे फार कोणी तिथे असणार नाही. त्यामुळे प्रयत्नपूर्वक ओळखी वाढवायला हव्यात. यासाठी आपले महाराष्ट्र मंडळ अथवा संघाच्या कार्यकर्त्यांशी जोडून घ्यायला मुलाला सांगा. त्यातून त्याला काही जण भेटतील. त्यांच्यापैकी कोणाशी तरी तो मोकळेपणाने समक्ष बोलू शकेल. याच्यातून त्याच्या मनावरचा ताण थोडा हलका होईल. कामाच्या ठिकाणची परिस्थिती बदलण्यासाठी कदाचित याचा थेट उपयोग होणार नाही परंतु आपली अडचण बोलून दाखवल्यामुळे त्याला बरे वाटेल. राहता राहिला विद्यार्थ्यांशी वागण्याचा किंवा त्यांच्या अपेक्षांना पुरे करण्याचा मुद्दा याबाबत कधी कठोर कधी लवचिक असे वागावे लागेल."
आमचे हे बोलणे झाले. त्यानंतर काही महिन्यांनी त्या व्यवसायिकांनी मला सांगितले की माझा सल्ला त्यांनी मुलाला कळवला. मुलाने विचार करून त्याच्या शहरात असलेल्या महाराष्ट्र मंडळात सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. मंडळाच्या कामात त्याची पत्नीदेखील सहभागी होते. या जोडप्याला लहान मुलगी होती. तिला देखील काही नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या आहेत. या मुलाच्या मनावरचा ताण पुष्कळ कमी झाला आहे. कामाच्या ठिकाणी देखील हळूहळू मार्ग शोधतो आहे." त्यांनी सांगितलेले सर्व ऐकून मला आनंद झाला आपल्या सल्ल्याचा उपयोग झाला याचा हा आनंद होता. नंतर काही महिन्यांनी हा मुलगा भारत भेटीवरती आला होता. त्यावेळी आठवणीने त्याचे वडील या मुलाला भेटायला घेऊन आले.त्या मुलाशी बोलल्याने मला आनंद झाला.
असे काही प्रसंग मनाला वेगळा आनंद देऊन जातात अशा प्रकार अनुभवात आपणही काही ना काही शिकत जातो.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments
Post a Comment