समुद्रावर स्वारी

     'अनंत अमुचि ध्येयासक्ती किनारा, तुला पामराला' अशी ओळ कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत लिहिली आहे. त्यात कवी समुद्राला उद्देशून म्हणतो की माणसाची ध्येयासक्ती इतकी मोठी आहे की समुद्राचा अफाट विस्तार तिला रोखू शकत नाही. समुद्र जरी विस्तीर्ण असला तरी देखील त्याला किनारा आहे. पण माणसाच्या इच्छाशक्तीला किनारा नाही. समुद्रावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन वेगवेगळ्या राजांची माहिती यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. 

       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

     यातील पहिले राजे म्हणजे प्रभू श्री राम! रावणाने कपट करून सीतामाईचे हरण केले. सुग्रीवाच्या मदतीने, हनुमंतांची योजना झाली . त्यातून सीतामाई लंकेत आहे हे समजले. प्रभू श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले. श्रीराम , लक्ष्मण यांच्याबरोबर प्रचंड मोठ्या संख्येने वानर सैन्य चालू लागले. शेवटी ते समुद्र किनाऱ्यावर पोचले. लंका हे समुद्रातील बेट असल्यामुळे समुद्राने वाट दिली तर पुढे जाता येणार होते. श्रीरामांनी तीन दिवस समुद्राची विनवण केली. परंतु समुद्राने वाट दिली नाही त्यामुळे तिसऱ्या दिवशी श्रीरामांनी आपला बाण उगारल्यानंतर समुद्राने सांगितले की, " वानर सैन्यात असलेला नल हा विश्वकर्मा यांचा पुत्र आहे. तो सेतू बांधण्याची विद्या जाणतो." हे समजल्यावर नल यांच्या नेतृत्वाखाली वानरसैन्याने  झाडे ,वेली दगड, वाळू या सगळ्यांच्या साहाय्याने सेतू उभारला आणि त्या सेतूवरून चालत जाऊन लंकेवर हल्ला केला.अन्याय अत्याचार करणाऱ्या रावणाचा वध झाला. श्रीरामांचा विजय झाला. सीतामाई मुक्त झाली. साधुसंत , सज्जन सुखावले.

      या मालिकेतील दुसरा राजा म्हणजे इतिहासात प्रसिद्ध असलेल्या रोमन साम्राज्याचा राजा कलिगुला. साधारणपणे रोमन सम्राट ५०० वर्ष टिकले. तेथील संसदेत लोकप्रतिनिधी असत. रोमन नागरिक सार्वभौम मानले जात‌. तिथेही राजेशाहीला सुरुवात झाली. यातील प्रसिद्ध राजा म्हणजे ज्युलियस सीझर. याच राजमालिकेत सन ३७ ते सन ४१ या वर्षात कलिगुला हा राज्यावर होता. राज्यावर आल्यावर त्याने सन ४०-४१ मध्ये आपण समुद्राविरुद्ध युद्ध पुकारले आहे असे जाहीर केले. समजुतदार लोकांनी सांगायचा प्रयत्न केला. पण 'राजहट्टा'पुढे कुणाचे चालले नाही . कलिगुलाने सैन्याला समुद्रकिनाऱ्यावर जायला भाग पाडले. सैनिकांना तलवारी भाले यांनी समुद्रावर हल्ला करायला लावला. शेवटी आपण जिंकलो असे जाहीर केले आणि समुद्रकिनारी सापडलेले शंख,शिंपले विजयाची निशाणी म्हणून रोममध्ये मिरवत आणले. तसेच या विजयाचे स्मारक म्हणून एक दीपगृह उभारले. मानवी स्वभावाचा हा एक विचित्र नमुनाच!

     या मालिकेतील तिसरे राजे म्हणजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याला त्रास देणाऱ्या शत्रुंमध्ये एक होता तो म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्दी. आपल्या बळकट जंजिऱ्याच्या बाहेर पडून स्वराज्यात लुटालूट, जाळपोळ करुन तो पुन्हा जंजिऱ्यात दडून बसायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकायचे प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. संभाजी महाराजांनी देखील आपल्या कारकीर्दीत जंजिरा जिंकण्याचे प्रयत्न केले. त्यात १६८२-८३ मध्ये त्यांनी जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधायचा प्रयत्न सुरू केला. पण एकाच वेळी अनेक दिशांनी आक्रमणे होत असल्याने हा प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा‌ लागला. परंतु समुद्रावर सेतू बांधू पहाणाऱ्यांच्या मालिकेत संभाजी महाराजांचे नाव नोंदवले गेले.

     तीन वेगवेगळ्या कालखंडातील हे तीन राजे. पैकी कलिगुलाचा प्रयत्न हा वेडगळपणाचाच नमुना म्हणावा लागेल. पण श्रीराम आणि संभाजी महाराज यांच्या प्रयत्नांमागे अन्यायाचा बीमोड ही प्रेरणा होती असे निश्चितपणे म्हणता येते. श्रीराम आणि संभाजी महाराज यांनी त्यांच्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. आज तंत्रज्ञानाच्या विलक्षण प्रगतीमुळे समुद्रात सेतू बांधणे माणसाच्या आवाक्यात आले आहे. परंतु त्या काळाचा विचार करता या दोघांचीही 'इच्छाशक्ती अनंत' होती असेच म्हणावे लागेल. याच इच्छाशक्तीमुळे त्यांची नावे अजरामर झाली आहेत. ती कायम प्रेरणा देत राहतील.


सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

  1. सुंदर माहिती... तिन्हीराजांचे प्रयत्न याचे सुंदर लेखन केला आहे.. 🙏

    ReplyDelete
  2. Respected sir, the article is thought provoking

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची