साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग (भाग १)
आचार्य अत्रे यांनी केशवकुमार या नावानं लिहलं आहे " ही आवडते मनापासुनी मज शाळा लाविते लळा माऊली जशी बाळा". शाळेतून बाहेर पडून इतकी वर्षे झाल्यावर या ओळी किती सार्थ आहेत याचा अनुभव येतो. आमच्या साखरवाडीच्या शाळेबद्द्ल आता तसच वाटतं. आपटे यांनी साखरवाडीत कारखाना सुरू केल्यावर काही वर्षांनी एक शिक्षण संस्था स्थापन करून एक प्राथमिक आणि एक माध्यमिक शाळा सुरू केली.याच शाळांमध्ये माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं. प्राथमिक शाळेच्या काही आता मोजक्याच आठवणी लक्षात आहेत.पण माध्यमिक विद्यालयाच्या तुलनेने बऱ्याच आठवणी लक्षात आहेत.
आम्ही पाचवीला माध्यमिक शाळेत गेलो तेव्हा शाळेचे खूप मोठे मैदान होते.शाळेसमोर एक कारंजंही होतं. पण एकदोन वर्षातच मैदानाच्या १/३ भागात चॉकलेट कारखाना सुरू झाला आणि साधारण त्याच सुमारास कारंजंही गेलं.
इतक्या वर्षांनी शाळेतील कार्यक्रम, पाठांतर, वक्तृत्व, निबंध,वर्गसजावट यासारख्या अनेक स्पर्धा, स्नेहसंमेलन इ.अनेक गोष्टी अजूनही लक्षात आहेत. शाळेतील माणसं, वर्ग, बाक, वऱ्हांडे, मैदान अशा गोष्टीही लक्षात आहेत.
पण शाळेनं लावलेला लळा म्हणजे तिच्या मैदानाने, इमारतीने लावलेला लळा नाही तर तिथल्या माणसांनी म्हणजे मुख्यतः शिक्षकांनी लावलेला लळा होय.आणि काही प्रमाणात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लावलेला लळा होय.अशाच काही शिक्षकांची ही स्मरणरंजनमाला.
त्यावेळचं साखरवाडी तुलनेनं छोटं गाव होतं. बहुतेक सगळे जण एकमेकांना ओळखायचे.वातावरणही वेगळं मोकळं असायचं. काही घरातील दोनदोन पिढया एकाच शिक्षकांकडून शिकल्या. या सगळ्यांमुळे शिक्षकांची आपुलकी लक्षात यायची.बहुतेक सर्व शिक्षक मनापासून शिकवायचे. शिक्षकांच्या घरी दसरा, संक्रांत यासारख्या सणांमुळे आणि इतरही कारणाने येणजाण होतं. त्यामुळे स्नेहसंबंध चांगले दृढ झाले होते.
Comments
Post a Comment