स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग....(भाग ३ )
( स्वामी विवेकानंद )
७ भारतभ्रमणाच्या काळात गाजीपुर येथे पवहारी बाबांशी नरेंद्राची भेट झाली. नरेंद्राने त्यांचे शिष्यत्व पत्करावे असे ठरवले. सलग एकवीस दिवस रामकृष्ण नरेंद्राच्या स्वप्नात येऊन अश्रू ढाळत. त्यानंतर नरेंद्राने पवहारी बाबांचा अनुग्रह घेण्याचा विचार सोडून दिला.
८ भारतभ्रमणाच्या काळात एके दिवशी नरेंद्र स्नानासाठी नदीमध्ये उतरला. तेव्हा त्यांची वस्त्रे माकडाने पळवून नेली. नरेंद्र नग्नावस्थेत जवळच्या जंगलात माणसांपासून दूर जाऊ लागला. तेव्हा कुठून तरी एक व्यक्ती नवीन वस्त्रे घेऊन आला आणि त्याने ती वस्त्रे नरेंद्राला दिली.
९ भारतभ्रमणाच्या काळात एके दिवशी नरेंद्र आगगाडीतून प्रवास करीत होता. त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी ऐतखाऊ म्हणून नरेंद्राला हिणवले आणि भुकेल्या नरेंद्राला काहीही न देता स्वतः जेवण करू लागला. पुढील तारागढ यख स्टेशनवर जेव्हा गाडी थांबली तेव्हा त्या गावातील एक हलवाई मिठाई पुरी भाजी घेऊन आला आणि त्याने नरेंद्रला प्रेमाने जेऊ घातले. त्या हलवायाला विचारले असता मला दुपारच्या झोपेत स्वप्नात तुम्ही दिसलात आणि तुम्हाला भूक लागली आहे असे समजले म्हणून मी घेऊन आलो असे तो म्हणाला.
१० शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेची माहिती कळाली पण तेथे जाण्यासाठी अजून गुरूंची आज्ञा मिळाली नाही असे स्वामीजींना वाटत होते. तेव्हा एके दिवशी रामकृष्ण परमहंस समुद्रावरून चालत जात आहेत असा दृष्टांत झाला. यानंतर काही दिवसातच त्यांनी माता सारदा देवी यांना पाठविलेल्या पत्राला माताजींचे उत्तर आले आणि माता सारदा देवी यांनीदेखील शिकागोला जाण्याची आज्ञा केली.
११ शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेसाठी स्वामीजी खूपच आधी तिथे पोचले. पण शिकागोतील महागड्या राहणीमानामुळे ते शिकागो सोडून अन्य ठिकाणी राहायला गेले. या वास्तव्यात प्रा.जॉन राइट यांनी ,' स्वामीजी तुम्हाला प्रमाणपत्र विचारणे म्हणजे सूर्याला प्रकाशण्याचा काय अधिकार असे विचारण्यासारखे आऊ' असा उद्गार काढून परिषदेसाठी आवश्यक असे ओळखपत्र स्वामीजींना दिले. परिषदेच्या आधी स्वामीजी जेव्हा शिकागोत पोचले तेव्हा त्यांचे साहित्य चोरीला गेले . रात्रभर रेल्वेच्या डब्यात मुक्काम करावा लागला. हरवून गेलेले स्वामीजी हताशपणे कालीमातेवर भार टाकून शिकागोच्या रस्त्यावर बसून राहिले. काही वेळाने समोरील बंगल्यातील श्रीमती जॉर्ज डब्ल्यू हेल यांनी दरवाजा उघडला स्वामीजींची जवळ येऊन चौकशी केली आणि त्यांना परिषदेच्या सभागृहात नेले आणि तिथून पुढे इतिहास घडला.
१२ भगिनी निवेदिता आणि अन्य काही शिष्य मंडळी यांच्याबरोबर स्वामीजी भारतभ्रमणासाठी बाहेर पडले. हिमालयात आल्यानंतर स्वामीजींच्या स्पर्शाने भावांतर झाल्याचा अनुभव भगिनी निवेदिता यांना आला.
स्वामीजींच्या प्रेरणादायक आयुष्याचा अद्भुत परिणाम म्हणजे इंग्रजांच्या बुद्धिभेदाने आणि कुटीलतेने मरगळलेल्या हिंदू समाजात नवचैतन्य निर्माण झाले. पश्चिमेचे तंत्रज्ञान आणि भारताचे अध्यात्म या आधारावर संपूर्ण मानवजातीचे सुख आणि साफल्य मिळवण्याचे भव्य उदात्त ध्येय त्यांनी आपल्यासमोर ठेवले. आपली प्रिय भारतमाता विश्र्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे हे त्यांचे भाकीत प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहूया.
समाप्त
सुधीर गाडे, पुणे
Very nice presentation
ReplyDeleteधन्यवाद
Delete