स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही अद्भुत प्रसंग...(भाग २)
१ लहानपणी नरेंद्र सहजपणे ध्यानस्थ व्हायचा. ध्यानस्थ झाल्यानंतर त्याला आपल्या भुवयांच्या मध्ये प्रकाश दिसायचा. त्यावेळी त्यांना वाटे की सगळ्यांनाच असा प्रकाश दिसतो. पण नंतर खुलासा झाला की ही योग साधनेतील एक अवस्था आहे. साधनेच्या एका टप्प्यानंतर ती अनुभवायला येते. पण नरेंद्राला लहानपणापासूनच ही अवस्था अनुभवायला येत असे.
२ गुरु रामकृष्ण यांच्याशी झालेल्या दुसऱ्या किंवा तिसर्या भेटीत रामकृष्णांनी नरेंद्राला(विवेकानंद हे नाव स्वामीजींनी जीवनात नंतर उशीरा धारण केले.) स्पर्श केला. त्यानंतर संपूर्ण विश्व गरगर फिरते आहे असा अनुभव नरेंद्राला येऊ लागला. हे काय होते आहे हे न समजल्याने नरेंद्र एकदम ओरडला , "तुम्ही हे काय करत आहात? मला घरी आई-वडील आहेत ना?" रामकृष्णांनी परत एकदा स्पर्श केला आणि या अनुभवातून नरेंद्राला बाहेर काढले.
३ नरेंद्राचे वडील बाबू विश्वनाथ दत्त यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दारिद्र्याची कुऱ्हाड कोसळली. अनेक दिवस उपास पडू लागले. यातून बाहेर पडण्यासाठी कालीमातेचे आशीर्वाद मागा असे सांगण्यासाठी नरेंद्र रामकृष्ण परमहंस यांच्याकडे पोचला. रामकृष्णांनी सांगितले की आजपर्यंत मातेकडे वैयक्तिक आयुष्यासाठी काहीच मागितले नाही पाणी मागणारही नाही. पण तुला तिचे दर्शन घडेल असा आशीर्वाद देतो आणि तुझे तूच मागून घे. नरेंद्रला तीन वेळा कालीमातेचे दर्शन घडले. तीनही वेळा नरेंद्राने ज्ञान, विवेक आणि वैराग्य मागितले.
४ रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनातील अखेरच्या काळात एके दिवशी त्यांनी नरेंद्राला जवळ बोलावले. त्याला स्पर्श केला आणि नरेंद्र समाधीमध्ये गढून गेला. थोड्यावेळाने पुन्हा स्पर्श करून नरेंद्राला भानावर आणले. नरेंद्राने जेव्हा समाधीसुखात गढून राहू द्या असे गुरूंना सांगितले तेव्हा रामकृष्ण म्हणाले की तुझे हे सुख मी पेटीत कुलुपबंद करून ठेवले आहे आणि त्याच्या कुलपाची चावी माझ्याकडे आहे. तू कालीमातेचे कार्य पूर्ण केल्यावरच तुला या सुखाचा लाभ होईल.
५ आपल्या मृत्यूपूर्वी रामकृष्णांनी नरेंद्राला जवळ बोलावले. त्याला स्पर्श केला आणि आपल्याजवळील सर्व शक्ती,सिद्धी नरेंद्राला देऊन टाकल्या. आज तुला सर्व देऊन मी भिकारी झालो असे उद्गार रामकृष्णांनी काढले.
६ १८९० मध्ये नरेंद्र भारताच्या परिक्रमेसाठी कलकत्यात बाहेर पडला. मेरठमध्ये आजारपणामुळे दीर्घकाळ राहावे लागले. तेव्हा तेथील ग्रंथालयातून आणलेले मोठे मोठे ग्रंथ अल्पावधीत वाचून पूर्ण केले. जेव्हा ग्रंथपालाला याबाबत शंका आली त्यावेळी त्याला भेटून, प्रचीती दाखवून त्याचे शंकानिरसन केले. राजस्थानमधील खेतडी या संस्थानचे राजे अजित सिंह यांच्या विनंतीमुळे विवेकानंद हे नाव धारण केले. नंतर जेव्हा स्वामीजी युरोपच्या दौऱ्यावर होते तेव्हा जर्मनीमधील कील याठिकाणी पॉल डायसन नावाच्या प्राध्यापकांना भेटायला गेले तेव्हा अगदी थोड्या वेळात मोठे पुस्तक वाचून पूर्ण केले. डायसन यांच्या शंकेचे निरसन स्वामीजींनी केले. स्वामीजींच्या निधनाआधी एक वर्ष आधी त्यांनी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशाचे खंड मागवले होते. त्यांच्या भरभर वाचल्यामुळे शिष्याला आलेली शंका त्यांनी दूर केली. अशी स्मरणशक्ती वाढण्यासाठी काय करावे हे शिष्याने विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले की अभ्यास, वैराग्य( ब्रह्मचर्य) आणि श्रद्धा या तीन गोष्टींमुळे हे शक्य होते.
सुधीर गाडे, पुणे
दैवी शक्ती
ReplyDeleteहो
Delete