पुस्तक परिचय :- गोल्डा एक अशांत वादळ

 लेखिका वीणा गवाणकर

प्रकाशक इंडस सोर्स बुक्स, मुंबई



नुकतेच हे पुस्तक वाचून पूर्ण केले. जवळपास दोन हजार वर्षे स्वतःचे राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय अढळ ठेवत ज्यू लोकांनी १४ मे १९४८ ला इस्त्राइल राष्ट्र पुन्हा उभे केले. हे उभे करण्यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती अशांपैकी एक म्हणजे गोल्डा मायर(१८९८-१९७८). त्या इस्राईलच्याच्या १९६९-१९७४ या काळातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. प्रवाही पद्धतीने लिहिलेल्या या पुस्तकातील भावलेले काही अंश
ज्यांचे नाव गोल्डा यांना देण्यात आले त्या त्यांच्या पणजी ज्यूंच्या हालअपेष्टांची जाणीव रहावी म्हणून मीठ घालून चहा पीत असत.
लहानपणी अमेरिकेत स्थलांतर झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी शाळेतील गरजू मुलांसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करून निधी जमा केला. पुढे मोठेपणी इसराइल साठी कोट्यावधी डॉलरचा निधी अमेरिकेतून उभा केला.
संघटना, पक्ष यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीला वाहून घेतलेल्या गोल्डा अर्धशिशीमुळे दोन दिवस विश्रांतीसाठी घरी राहिल्या तर त्यांच्या लहान असलेल्या मेनाहेम,सारा या मुला-मुलींना अत्यानंद झाला आणि त्यांनी दोन्ही दिवस दंगा-मस्ती केली. आईच्या सहवासाला आसुसलेली मुले बघून आईच्या हृदयात कालवाकालव झाली. ही कालवाकालव हृदयात ठेवून त्या अखंड कार्यमग्न राहिल्या.
विचारसरणीने समाजवादी असलेल्या गोल्डा अतिशय कमी वेतनावर काम करीत असत.
स्वतंत्र इस्राईलच्या कामगार मंत्री, परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिलेल्या गोल्डा दिवसातील १४-१८ तास कार्यरत असत.
आपल्याकडे येणारे अधिकारी मंत्री कार्यकर्ते यांची तर त्या स्वतः पदार्थ तयार करून सरबराई करीत पण त्याचबरोबर पहारेकऱ्यांना देखील आपुलकीने स्वतः बरोबर बसवून स्वतः केलेला चहा केक खायला देत.
स्त्री म्हणून त्यांना कोणत्याही विशेष वागणुकीची अपेक्षा नसायची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांचे मत नोंदवले आहे की गोल्डा पुरुषाप्रमाणे वागते आणि (स्त्री म्हणून कोणतीही विशेष सवलत न देता) पुरुषाप्रमाणे वागविलेले तिला हवे असते.
वाढणाऱ्या स्त्री अत्याचारांबद्दल इस्राईलच्या संसदेत (केनॅसेट) चर्चा झाली. त्यावेळी काही पुरुषांनी स्त्रियांनी संध्याकाळी फार उशिरानंतर बाहेर पडू नये अशी सूचना मांडली. त्यावर अत्याचार करणारे पुरुषच असतात, ही बंदी त्यांच्यावर घालायला हवी असे उद्गार गोल्डा यांनी काढले.
पंतप्रधान झाल्यानंतर, त्या वेगवेगळ्या मंत्र्यांना गरजेनुसार घरी बोलवत. स्वतःच्या स्वयंपाकघरात काम करता करता आणि विचारविनिमय करून निर्णय घेत. या निर्णयांवर नंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होई. यातूनच 'किचन कॅबिनेट' असा शब्दप्रयोग रूढ झाला.
आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना त्या स्वतः पंखे दिवे बंद करत.
ऑक्टोबर १९७३ मध्ये इजिप्तने योम किप्पूर या ज्यूंच्या सणाच्यावेळी अचानक हल्ला केला. असा हल्ला होणारच नाही असा अतिआत्मविश्वास बाळगणारे संरक्षण मंत्री मोशे दायान खचले. तेव्हा ७५ वर्षाच्या गोल्डा यांनी धीरोदात्तपणे नेतृत्व केले आघाडीवर भेट देऊन सैनिकांचे मनोधैर्य वाढविले. मोठा विजय मिळवला.
सुधीर गाडे, पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख