स्वामी विवेकानंद - शेवटचे दिवस
( स्वामी विवेकानंद )
४ जुलै १९०२ या दिवशी स्वामी विवेकानंदांचे निधन झाले. महान व्यक्तिंना त्यांच्या निधनाची पूर्वकल्पना असते असे वाटते. महाभारतामध्ये भीष्माचार्यांची गोष्ट आहे. त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला होता.त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मृत्यूचा दिवसही निश्चित केला होता. अनेक महान व्यक्तींबद्दल असे म्हणता येते.स्वामी विवेकानंदांना आपला निधनाचा दिनांक ४ जुलै असावा असे वाटत होते. त्या महिन्याच्या दिनदर्शिकेवर ४जुलैच्या दिनांकावर त्यांनी खूण करून ठेवली होती. दोन दिवस आधी त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता त्यांना भेटायला आल्या. स्वामीजींनी त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यांना प्रेमाने जेवू घातले. जेवण झाल्यानंतर स्वामीजींनी भगिनी निवेदितांच्या हातावर पाणी घातले. त्यांचे हात स्वतः पुसून कोरडे केले. स्वामीजींनी यापूर्वी असे कधीच केले नव्हते. तेव्हा भगिनी निवेदिता संकोचल्या.त्यांनी स्वामीजींना विचारले, "स्वामीजी आपण काय करता आहात?" स्वामीजी म्हणाले, " येशू ख्रिस्ताने नाही का त्याच्या शिष्यांचे पाय धुतले होते." निवेदितांच्या मनामध्ये येऊन गेले , " ते त्याच्या आयुष्यातील अखेरचे जेवण होते." पण त्या काहीच बोलल्या नाहीत.दोनच दिवसानंतर ज्यावेळी स्वामीजींच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा भगिनी निवेदिता यांना या प्रसंगाची संगती लागली. तसेच अन्य शिष्यांनाही स्वामीजींनी ४ जुलैच्या दिनांकावर का खूण केली हे लक्षात आले.
( भगिनी निवेदिता )
Comments
Post a Comment