साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ११)
सौ.श्रध्दा संजय वाळिंबेबाई
वाळिंबेबाईंनी आम्हाला इंग्लिश आणि भूगोल शिकवला. बाईंचं तळमळीनं शिकवणं जाणवायचं.त्यांनी स्नेहसंमेलनात बसवलेल्या कार्यक्रमात मला भाग घ्यायची संधी मिळाली.एका कार्यक्रमात लो.टिळक आणि दुसऱ्या कार्यक्रमात संत तुकारामांची भूमिका होती. अन्य नाटिकांपेक्षा या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे थोर व्यक्तींच्या जीवनाचा धावता परिचय कार्यक्रमात करून दिला होता. टिळकांच्या भूमिकेत न्यायालयातील प्रसंगात माझ्या तोंडी " या न्यायालयाने मला दोषी ठरवले असले तरी वरच्या न्यायालयात मी निर्दोष आहे.मी दोषी नाही." अशी काहीशी वाक्ये होती.नंतर मी गमतीने ( अर्थात मित्रामित्रांच्यात ) " मी दोषी नाही दोशी आहे." असं म्हणायचो.तेवढीच चंमतग.
बाई जेव्हा जेव्हा मोकळ्या ( ऑफ ) तासाला वर्गावर यायच्या तेव्हा स्पेलिंग ओळखण्याचा खेळ घ्यायच्या.मग आपल्या गटाचा विजय व्हावा यासाठी शब्दकोश ( डिक्शनरी) बघून काही नवीन शब्द मी लक्षात ठेवले होते.
आम्ही बहुधा आठवीत असताना छात्रसेनेच्या (एनसीसी) नेमबाजी प्रशिक्षणासाठी जवळच्या पाच सर्कलला गेलो होतो.प्रशिक्षण दुपारी १:३० - २ च्या सुमारास संपल्यावर शाळेत न येता परस्पर घरी गेलो म्हणून दुसऱ्या दिवशी बाईंची चांगलीच बोलणी खाल्ली होती.आपल्या कामात चालढकल न करण्याचा बाईंचा स्वभाव नंतर अनेक वर्षांनी ( बहुधा २००५ मध्ये) अनुभवायला मिळाला. आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या वाळिंबेबाई मुख्याध्यापिका झाल्या. युवा प्रेरणा दिनाच्या दिवशी बाई मुख्याध्यापक होत्या त्या सैनिकी शाळेच्या मुलींची प्रात्यक्षिके १२ जानेवारीला होती.आदल्या दिवशी दवाखान्यात झोपून असलेल्या बाईंनी डॉक्टरांकडून घेतलेल्या इंजेक्शनच्या बळावर उभे राहिलेल्या बाईंनी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्तम पद्धतीने केलं.
बाई सध्या पिरंगुटजवळ राहतात. त्यांना विनम्रपणे नमस्कार..!
फोटो क्षिप्रा वाळिंबे यांच्याकडून
Comments
Post a Comment