साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ७)
वि.गो.ऐनापुरेसर आणि सु.वि.ऐनापुरेबाई
आमच्या शाळेतील शिक्षक मला वेगवेगळ्या कारणांनी लक्षात राहिले आहेत.तसही शालेय विद्यार्थ्याचं भावविश्व शाळेशी खूपच बांधलं गेलेलं असतं.
ऐनापुरे सर माझ्या लक्षात राहिले ते गावातील सर्व स्तरातील लोकांशी असलेल्या त्यांच्या संवादामुळे.सर साखरवाडीतील बाजारपेठेत आले की जवळपास सगळ्या दुकानदारांशी, हातगडीवाल्यांशी,भाजीवाल्यांशी त्यांचं मनमोकळं बोलणं व्हायचं.आणखी एक विशेष म्हणजे ते हॉटेलात आवडीने चहा भजीचा आस्वाद घेताना दिसायचे.
विद्यार्थ्यांनी मनापासून शिकलं पाहिजे अशी त्यांची तळमळ असायची.मला चांगलं आठवतंय आम्ही ७ वीत असताना शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी शिक्षक वसाहतीत त्यांच्या घरी जादा तासांना जायचो. आमच्या वर्गात असणारा कै.(कै. लिहिताना जिवावर येतंय) सुनील माडकर (त्याच्याबद्दल परत कधीतरी) जवळपास महिना दीड महिना त्यांच्याकडे आला नव्हता.त्यामुळे पुन्हा आला त्यादिवशी त्याला सरांनी चांगलच मारलं.तसं शाळेतही सर मुलांवर चिडायचे, तारस्वरात ओरडायचे, मुलांना मारायचे देखील.गोरेपान असणारे सर रागाने बेभान आणि लालेलाल व्हायचे.त्यांचं तारस्वरातलं बोलणं आजूबाजूच्या वर्गातही ऐकायला जायचं. त्या वयात असं वाटायचं की सर असं इतकं रागावून का बरं मारतात.पण नंतर केंव्हातरी लक्षात आलं की " छडी लागे छमछम विद्या येई घमघम " हे ज्यांच्या मनावर वज्रलेप झालं होतं अशा लोकांपैकी ते एक होते.इतक्या वर्षानंतर आता मला यात त्यांची तळमळच दिसून येते.कदाचित त्याचे परिणाम काही भले काही बुरे असेही झाले असतील.
ऐनापुरेबाई यासुद्धा आमच्या वर्गाला एक दोन वर्षे शिकवायला होत्या. त्यांनी बसवलेल्या एका नाटकात मी पाचवीत असताना कामही केलं होतं. बाईंचा स्वभाव मात्र सरांच्या अगदी विरुद्ध वाटायचा. त्यांचं बोलणंही मोजकेच विषयापुरत मर्यादित एका आखीव पद्धतीने असायचं.इतक्या वर्षांनी तेव्हा त्या रागावल्याच आठवत नाही.नववीत त्या आम्हाला मराठी शिकवायला होत्या. बहुधा सहामाही परीक्षेत मी लिहिलेल्या निबंध त्या प्रकारचा नव्हता.याबाबत त्यांनी अन्य शिक्षकांशी चर्चा करून मला त्या निबंधासाठी एक गुण दिला होता.आणि एक गुण का दिला हे त्यांनी सांगितल्याचे आठवतं.
अशा या पतीपत्नींचा मनावर एक वेगळाच ठसा उमटला.
ऐनापुरेसरांचं १/२/२००६ ला निधन झालं.सरांना विनम्र अभिवादन.!
ऐनापुरेबाई त्यांच्या मुलामुलीकडे, गावी आळीपाळीने असतात.बाईंना विनम्र प्रणाम.!
फोटो अनुपमा देशपांडे यांच्याकडील जुन्या " प्रकाश " वार्षिकांकातून
Comments
Post a Comment