सामाजिक जाणिवेतून...

    २०१३ हे स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने दरवर्षी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेतली जाते आणि त्यातून स्वामीजींचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.२०१२ पासूनच आमच्या म.ए.सो.गरवारे महाविद्यालयातील तसेच म.ए.सो. वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यात सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले. या परीक्षेत वसतिगृहातील अनेक मुला-मुलींनी भाग घेतला. त्याच बरोबर स्वामीजींचे जीवन व कार्य वसतिगृहाच्या सर्व मुला-मुलींना समजावे यासाठी स्वामीजींच्या जन्मदिनी २०१२ मध्ये दामोदर रामदासी यांचा स्वामीजींच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग,  २०१३ मध्ये  कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे  कीर्तन ,तर २०१४ मध्ये शाहीर बापू पवार यांचे पोवाडा गायन या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. हे सगळे कार्यक्रम करत असताना मुला मुलींच्या विचारांना चालना मिळत होती. 

२०१५ मध्ये देखील या परीक्षेला मुलेमुली बसली होती. त्यानंतर एके दिवशी रात्री मी या मुला-मुलींशी बोललो. स्वामीजींचा कोणता विचार सगळ्यात महत्त्वाचा वाटतो यावर मनमोकळी चर्चा झाली. मी मुला-मुलींना म्हटले की, " स्वामीजींचा मला सगळ्यात महत्त्वाचा विचार वाटतो ते म्हणजे तो म्हणजे मणभर वटवट करण्यापेक्षा कणभर केलेली कृती श्रेष्ठ. तर मुला-मुलींना आपण कोणते सामाजिक कार्य करू शकतो?"  यावर पुढे चर्चा झाली आणि ठरली की जवळच्या खिलारेवाडीतील शाळकरी मुला मुलींचा अभ्यास घेण्याचा उपक्रम आपण करू शकतो. याची पूर्वतयारी म्हणून खिलारेवाडी जाऊन तेथील स्थानिक प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या. तेथील मंदिराच्यावर असणाऱ्या सभागृहात अभ्यासिका चालवता येईल याबद्दल चर्चा करून त्यांची संमती घेतली. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी सुमारे दीड महिना ही अभ्यासिका चालली. वसतिगृहातील मुला मुलींनी सोमवार ते शनिवार यामध्ये आपापला वार ठरवून घेतला होता. रोज संध्याकाळी साधारण दीड ते दोन तास मुला मुलींचा अभ्यास घेतला जाई. त्या त्या दिवशी असणारे वसतिगृहाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी छोट्या छोट्या गटांमध्ये ताई दादांच्या प्रेमाने या शाळकरी मुलांचा अभ्यास घेत. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत. हा उपक्रम नंतर पुढच्या वर्षीदेखील सुरू राहिला. अभ्यासाबरोबरच मुला मुलींचे नैमित्तिक कार्यक्रम, तज्ञांचे भाषण, गप्पा, स्पर्धा इत्यादी गोष्टी आयोजित केल्या जात असत. मुलांनी सुरूवातीला थोडावेळ शांत बसून मन एकाग्र करणे, अभ्यासिका संपताना सर्वांनी पसायदान म्हणणे या गोष्टी करत असू. पसायदान म्हणता यावे यासाठी वसतिगृहाची गोड गळ्याची विद्यार्थिनी शलाका रोकडे हिच्या सुरेल आवाजात पसायदान ध्वनिमुद्रित करून घेतले होते. मुले मुली ते ऐकून पसायदान म्हणत असत.



या सगळ्या उपक्रमामध्ये त्यावेळी वसतिगृहात असणारे धीरज पाटील , उत्कर्षा धोंडगे,  प्रज्ञा पाचपाटील,  ऐश्वर्या आगरकर, तेजश्रो ढमढेरे, प्रतीक्षा माने, कादंबरी कदम, कौस्तुभ भिसे, म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील आकाश बुरगुटे, सुबोध विभुते हे विद्यार्थी विद्यार्थिनी मनापासून सहभागी होत असत. त्यांचे मित्र मैत्रिणी देखील सहभागी होत असत. पुढच्या वर्षी काही महिने हा उपक्रम चालला. त्यात वसतिगृहातील  सागरिका मुलगे, शौनक उमाळकर, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील  महाविद्यालयातील साईश करडे हे विद्यार्थी त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सहभागी होत असत. खिलारेवाडीतील मुला-मुलींना छोटे छोटे प्रयोग करून दाखवता यावेत यासाठी उपकरणांचा संच विकत घेण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. नीलम कुलकर्णी, प्रा. मोहिनी कुलकर्णी यांनी आर्थिक मदत केली होती.




नंतर वस्तीतील काही घडामोडींमुळे हे सभागृह उपलब्ध होऊ शकले नाही. म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील वर्ग उपलब्ध होऊ शकत होता पण खिलारेवाडीतील पालकांची मुला-मुलींना संध्याकाळच्या रहदारीच्यावेळेला महाविद्यालयात पाठवण्यासाठी समंती मिळाली नाही. त्यानंतर खिलारेवाडीजवळच्या धोंडूमामा साठे वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग मिळतो का याचा प्रयत्न केला.परंतु तो उपलब्ध होऊ शकला नाही आणि हा उपक्रम बंद पडला.







 साधारण दीड वर्षे चाललेला हा उपक्रम मुला-मुलींच्या सामाजिक जाणिवेला खतपाणी घालून गेला. 


( सोबत २०१५ मध्ये  अभ्यासिकेत घेतलेल्या कार्यक्रमांची छायाचित्रे)


सुधीर गाडे पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख