समस्यापूर्ती

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या आजोळी मानाजीनगर(पणदरे जवळ) तालुका बारामती इथे जात असू. त्याकाळात दूरचित्रवाहिन्या, मोबाइल यासारखी साधने नव्हतीच. अशावेळी वेळ घालवण्यासाठी मैदानी खेळांबरोबर पत्ते खेळणे, गप्पा मारणे हे पर्याय होते. अशा वेळी आम्ही हुमान (कोडं) घालणं करत असू. सहज त्याची आठवण झाली. त्यातील काही कोडी अजून आठवतात.

प्रश्न:- इथंच आहे पण दिसत नाही.
उत्तर:- वारा
प्रश्न:- वारा त्याला पाच दारा (दारं)
उत्तर:- पावा (पाच छिद्रे असलेला)
प्रश्न:- हुमान हुमनं नाकात टुमनं
उत्तर:- नथ
प्रश्न:- एवढंसं कार्ट घर पुरं राखतं
उत्तर:- कुलूप
प्रश्न:- आधी लाल लाल मग गोल गोल मग थैय्याक थैय्या
उत्तर:- लाल मिरच्या गोल उखळात कुटणे
प्रश्न:- सूपभर लाह्या त्यात चांदीचा रूपया
उत्तर:- आभाळात असणारा चांदण्यातील चंद्र
अशा समस्यापूर्तीची परंपरा खूप जुनी आहे. उदाहरणार्थ पूर्वी राजदरबारामध्ये कवींना चवथा चरण देऊन त्यावरून श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होत असे. संस्कृत भाषेतील समस्यापूर्तीचे हे एक उदाहरण
भोजनान्ते च किं पेयं
जयन्तः कस्य वै सुतः ।
कथं विष्णुपदं प्रोक्तं
तक्रं शक्रस्य दुर्लभम् ॥
अर्थ
जेवण झाल्यावर कोणते पेय प्यावे (ताक)? जयंत हा कोणाचा मुलगा आहे (इन्द्राचा)? विष्णुपद मिळण्यास कसे आहे (अतिशय अवघड)? ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड.
शेवटचं वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी पहिले तीन योग्य असे चरण कवीने रचले आहेत.
एका कथेनुसार राजा भोज याने आपल्या नगरात फिरताना एक दृश्य पहिले. त्यावर चौथी ओळ सांगितली आणि असं म्हणतात की कवी कालिदासाने उत्तर दिले.
चंद्रनना फुंकित पावकाला |
सखेद आश्चर्य गमे मनाला |
अहो समाचार विचित्र झाला |
आकाशिचा चंद्र चुलीत गेला ||
अर्थ -चंद्राप्रमाणे चेहरा असलेली एक सुंदरी चुलीतील अग्नी प्रज्वलित करण्यासाठी चुलीजवळ तोंड नेऊन फ़ुंकर मारत होती. तो प्रकार पाहून मला आश्वर्याप्रमाणेच खेदही वाटला कारण असे विचित्र झाले की, मला जणू आकाशातला चंद्रच चुलीत गेल्याचा भास झाला!
अशाच समस्यापूर्तीचं उदाहरण महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला प्रकार तमाशा यात सवाल जवाब यातही आढळतं. एका प्रसिद्ध तमाशापटातील हा सवाल जबाब
प्रश्न:- जगी विषारी नागीण फिरते विष घेऊन ओठात
विष आणि अमृत आहे जिच्या जवळ ती नागीण आहे कुठं?
उत्तर :- जिच्या विषारी फुत्काऱ्याने गेली साम्राज्यं संस्थानं
जिच्या करारी फटकाऱ्याने होते माणसाची धूळधाण
जिच्या मुखातून अमृत झरतं थेंब होतसे शब्दांचा
जिच्या कृपेच्या वर्षावाने वृक्ष वाढतो ज्ञानाचा
असली नागीण दोन जिभांची तिला लेखणी म्हणती गं
शाहीर रूपी तिचा गारुडी उभा ठाकला पुढती गं
शाळा महाविद्यालयांमध्ये मुलं मुली खजिनाशोध (ट्रेझर हंट) खेळत असतात. त्यातही अशाच पद्धतीनं कोड्यात मजकूर देऊन ठिकाण शोधायला सांगितलं जातं.
मानवी बुद्धिला चालना देणारा हा प्रकार मनोरंजकही आहे.
सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. शालेय दिवसांची आठवण झाली अनेक वेळा मित्रांबरोबर शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी परत येताना पायाच्या अंगठ्याने दगड पुढे ढकलणे आणि एकमेकांना कोडी घालने हा नियमित खेळ होता. आमच्या लहानपणीचे सर्वात प्रसिद्ध असे कोड्याचे गाणे म्हणजे राज कपूर व नर्गीस यांच्या श्री 420 या चित्रपटातील इचक दाना बिचक दाना. अनेक वेळा शाळेमध्ये आमचे शिक्षक सुद्धा आम्हाला कोडी घालत असत. विस्मरणात गेलेल्या खेळाची आठवण करून दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद.
    मानाजी नगर व मानप्पा वस्ती हे एकच आहेत ना?

    ReplyDelete
    Replies
    1. मानाजी नगर आणि मानप्पा वस्ती एकच आहेत.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची