दिसामाजी काहीतरी लिहित जावे...
कोरोनाच्या संकटामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. ती म्हणजे लेखन ( हाताने लिहिणे). शाळेत असल्यापासून मला बॉलपेन ऐवजी शाईपेन आवडतो. बॉलपेन हा तेव्हादेखील स्वस्त होता आणि साखरवाडीमध्ये बॉलपेनच्या नळीमध्ये शाई संपल्यानंतर शाईदेखील काही पैशात भरून मिळत असे.(म्हणजे शब्दशः रिफिलिंग!) परंतु मला शाईपेनच आवडायचा.
साधारण पाचवीत गेल्यानंतर मला पुण्यातील काळे बंधूंचा शाईपेन मिळाला. तेव्हापासून अगदी नियमितपणे शाईपेन चा वापर सुरू केला. साखरवाडीहून पुण्याला येणाऱ्या परिचितांमार्फत हा शाईपेन घेऊन यायची व्यवस्था होत असे. कधी कधी आमचे वडील कै. बापूदेखील शाईपेन माझ्यासाठी घेऊन येत असत. ठराविक अंतराने हा पेन स्वच्छ धुणे,नीब बदलणे, शाईची बाटली घेऊन येणे या गोष्टी करत असे. कधी वर्गात अचानक एखाद्याच्या पेनची शाई संपली की पाच-दहा थेंबांची शाईदेखील घेत किंवा देत असू. मग दुसऱ्या दिवशी आठवणीने तेवढे थेंब शाई परत करायची.(ही देवाण-घेवाण अगदी महत्वाची असायची काटेकोरपणा आवश्यक असायचा. आता याची गंमत वाटते.) काळे बंधूंचे दुकान गेल्या काही वर्षात हळूहळू बंद पडत गेले. त्यामुळे आता कॅम्लिन कंपनीचे पेन माझ्याकडे आहेत.
इयत्ता पाचवीत असताना मी वर्षभर अगदी नियमितपणे रोज शुद्धलेखन करीत असे. त्यामुळे अक्षर बऱ्यापैकी सुधारले.
हल्ली 'वापरा आणि फेका' याचे प्रस्थ वाढल्यामुळे बॉलपेनच्या नळीमध्ये शाई भरून घेणे हे होतच नाही. त्यातून प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो आणि प्रश्न देखील तयार होतात. आता समाजाची एकंदरीत आर्थिकस्थिती सुधारल्यामुळे शाईच्या पाच-दहा थेंबांची देवाण-घेवाण असा प्रकारच होत नाही.
कोरोनामुळे वर्षभर लेखनाचे विशेष काम नसल्याने शाईपेन वापरला गेला नाही. कारण शाईपेन सतत वापरला नाही तर तो व्यवस्थित चालत नाही. पुन्हा परिस्थिती कधी निवळेल आणि शाईपेन नियमित वापरता येईल हे अजून काही सांगता येत नाही.
(सोबत माझ्याकडच्या सध्याच्या शाईपेनांचे आणि म.ए.सो.गरवारे महाविद्यालयाच्या १४/०४/२००९ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमानिमित्त सूत्रसंचालनासाठी लिहिलेल्या मजकुराच्या काही भागाची छायाचित्रे)
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment