लोकशाही मूल्ये जगणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एप्रिल १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथील पोटनिवडणुकीसाठी उभे होते. समाजवादी पक्षाचे अशोक मेहता देखील त्यांच्यासोबत उभे होते. समाजवादी पक्ष आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांच्यातील समजुतीच्या करारामुळे एकमेकांनी दुसऱ्याच्या उमेदवाराला आपले दुसरे मत द्यायचे असे ठरले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेबांना आधीच्या अनुभवावरून असे सांगितले की," आपली मते समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला जातील, पण त्यांची मते तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुम्ही पराभूत व्हाल. त्यामुळे आपण दुसरे मत जाळू( म्हणजे दुसरे मत कोणालाही द्यायचे नाही.) डॉ. बाबासाहेब म्हणाले," मी हरणे पसंत करीन पण तुम्हा लोकांना दुसरे मत जाळण्याची परवानगी देणार नाही. मी भारतीय घटना तयार केली , त्या घटनेच्या तरतुदींचा अवलंब करताना असा गैरप्रकार मी कधीही सहन करणार नाही." डॉ.बाबासाहेबांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी काम केले. मेहतांना बाबासाहेबांच्या प्रभावक्षेत्रात कमी मते मिळाली पण समाजवादी पक्षाची मते बाबासाहेबांना मिळाली नाहीत. परिणाम मेहता निवडून आले पण डॉ. बाबासाहेब पराभूत झाले. राजकीय लाभासाठी घटनात्मक मूल्ये पायदळी न तुडवणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन..!
(संदर्भ: पान १२९, सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ.आंबेडकर , लेखक द.बा ठेंगडी )
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment