गुजरात सहल
कोविडच्या वर्षी २०२० मध्ये आमचा मुलगा चि.शंतनू दहावीला होता. त्याची परीक्षा झाली की कुठेतरी सहलीला जायचे असं ठरवलं होतं. पण कोविडमुळे त्यावर्षी जमलं नाही आणि पुढची दोन वर्षे जमलं नाही. पण मग हा योग नोव्हेंबर २०२३ मध्ये आला. त्यावर्षी सहलीला जायचं यावर चर्चा सुरू झाली आणि मग गुजरातला जायचं असं नक्की झालं. मी आणि माझे साडू श्री जवाहर उपासे दोघांनीही १६ ते २१ नोव्हेंबर या दिवसात सहकुटुंब जायचं ठरवलं. गुजरात सहलीचे सगळे नियोजन आमचा भाचा चि.सिद्धांत उपासे याने केले.
गुजरातमध्ये बघण्यासारखी प्राचीन, ऐतिहासिक, निसर्गरम्य, धार्मिक अशी अनेक स्थळे आहेत. पण चर्चेतून ठरलं की आताच्या काळातील आश्चर्य असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा जिथे उभारला आहे त्या सरदार सरोवर प्रकल्पाला भेट द्यायची आणि येताजाता अहमदाबादमध्ये काही ठिकाणे पाहायची. १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता त्यामुळे त्यादिवशी अहमदाबादमध्ये राहण्यासाठी पाहिजे तसे हॉटेल मिळत नव्हते. म्हणून त्यादिवशी बडोदा येथे मुक्काम करायचा असे ठरवले. या सगळ्यामुळे १६ ला अहमदाबाद, १७ १८ सरदार सरोवर, १९ बडोदा आणि २० परत अहमदाबाद असे मुक्काम ठरले.
पहिल्या दिवशी अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हर फ्रंट, अटल ब्रिज, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा, लेझर शो, तेथील बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस् गार्डन, आयुर्वेद गार्डन, रोझ गार्डन, लाईट गार्डन, झू ही ठिकाणे तर बडोद्यात महाराज सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास पॅलेस, गांधीनगर येथील स्वामीनारायण मंदीर, साबरमती आश्रम, अहमदाबादमध्ये शहरातील भटकंतीची काही ठिकाणे अशा गोष्टी पाहून झाल्या.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला भेट हा सर्वात अविस्मरणीय प्रसंग होता. पुतळ्याची भव्यता, त्यासाठी वापरलेले अद्ययावत तंत्रज्ञान, तेथील पर्यटकांच्या भेटीसाठी केलेले नियोजन हे सगळे अनुभवण्यासारखे होते. या सर्वावर कळस चढवला तो तेथील लेझर शोने! पुतळ्याचाच वापर करुन सरदारांचा जीवनपट , त्यांचे कार्य त्यांचे विचार उपस्थितांना दाखवण्यात आले. सरदारांचे जीवनकार्य आणि विशेषतः त्यांनी घडवून आणलेले संस्थानांचे विलीनीकरण यातून राष्ट्रीय एकात्मता कशी साधली गेली हे पाहताना अतिशय आनंद झाला.
एकूणच या प्रकल्पाला पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी याचे चांगले नियोजन केले आहे. केवळ पुतळाच नाही तर परिसरातील वेगवेगळ्या प्रकारची उद्याने, प्रकल्प हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे विषय झाले आहेत. या सगळ्यामुळे स्थानिक माणसांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यात मला विशेष भाग वाटला तो म्हणजे फक्त महिला चालकांनी चालवलेल्या ई-रिक्षा. महिला सक्षमीकरणाचा हा एक आदर्श उपक्रम आहे. यात सहभागी महिला आत्मविश्वासाने काम करत आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. हा एक महत्त्वाचा पैलू आहे.
( साबरमती आश्रम )
साबरमती आश्रमात महात्मा गांधी जिथे राहत असत त्या खोल्यांना भेट देणे त्यांचे स्मरण करणे हादेखील एक संस्मरणीय अनुभव होता. या प्रवासात स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी नेतृत्व केले अशा भारतमातेच्या दोन महान सुपुत्र महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे पुन्हा स्मरण झाले.
इंग्रजांच्या काळात ज्या भारतीय राजांनी आपली दूरदृष्टी, प्रजाहितदक्षता, राष्ट्रभक्ती या गुणांमुळे इतिहासावर ठसा उमटवला त्यामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचे नाव उच्च स्थानावर आहे. त्यांना लाभलेल्या दीर्घ आयुष्यात त्यांनी आपल्या अधिपत्याखाली बडोदा संस्थानात लक्षणीय सुधारणा घडवल्या. या महापुरुषाच्या कार्याचे स्मरण पुन्हा एकदा झाले. लक्ष्मी विलास पॅलेसला भेट देणाऱ्यांना माहिती देण्यासाठी रेकॉर्डेड मजकूर वेगवेगळ्या भाषेत ऐकण्याची सोय होती. ती उपयुक्त वाटली. ( म्हणून फोटोत कानात घातलेल्या इयरफोनची वायर दिसते आहे. )
( लक्ष्मी विलास पॅलेस )
स्वामीनारायण मंदिरात जाण्याचा यावेळी दुसऱ्यांदा योग आला. यापूर्वी १९९८ मध्ये स्वामीनारायण मंदिरात गेलो होतो. भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे हे संकुल भारताच्या आध्यात्मिक वारशाचीदेखील जाणीव करून देते.
या चारपाच दिवसांत विमान, रेल्वे (वंदेभारत), रिक्षा, कॅब, बस अशा सगळ्या प्रकारच्या वाहनातून प्रवास झाला. आम्हा तिघांचा हा एकत्रित असा पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे तो कायम स्मरणात राहील. या प्रवासात विमानतळावरील स्वच्छता ते रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता अशी दोन टोके पाहयला मिळाली. आपलेच देशबांधव स्वच्छता पाळू शकतात तसे अस्वच्छताही करतात हे पुन्हा एकदा लक्षात आले. नेहमीसारखाच अस्वच्छ परिसर डोळ्यालाही टोचला आणि मनालाही. आपण भारतीय स्वच्छता पाळायला कधी शिकणार हे पुन्हा एकदा मनात येऊन अस्वस्थ झालो.
सरदार सरोवर प्रकल्पाला भेट देताना आम्ही तेथील 'टेंट सिटी' येथे राहिलो. नाव टेंट सिटी असले तर सर्व सोयी अतिशय आरामदायक होत्या. या ठिकाणी सगळ्यात आवडलेली व्यवस्था होती ती जेवणाची. नाष्टा, जेवण यासाठी खाद्यपदार्थ, खाद्यपेये यांची रेलचेल होती. सर्वच पदार्थ अतिशय चविष्ट होते. इतर ठिकाणीदेखील चविष्ट जेवण मिळाले पण टेंट सिटीचे जेवण सगळ्यात जास्त आवडले.
१९९५ मध्ये मी तीन महिने दमण येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होतो. तेव्हा गुजराती भाषा बऱ्यापैकी समजू लागली होती. काही वाक्येदेखील बोलता येऊ लागली होती. त्या भाषेचा परत एकदा अनुभव घेता आला आणि आनंद झाला. 'कुछ दिन तो गुजारो गुजरात में ' हे वाक्य अनुभवता आले.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
'कुछ दिन तो गुजारो गुजरात में ' या वाक्याला साजेस तुमचा प्रवास वर्णन आहे. सुंदर लेखन🙏
ReplyDeleteगुजरात या राज्याचे दर्शन या लेखनातून झाले सर खूपच सुंदर माहिती तुमच्या लेखनातून मिळाली 🙏
ReplyDelete