शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध हे जिवंत प्रकारचे असतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर देतातच परंतु विद्यार्थ्यांच्याबद्दल शिक्षकांच्या मनात असलेला जिव्हाळा, गुणग्राहकता हे त्या नात्याची उंची वाढवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यामध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना जातींच्या उच्चनीचतेच्या चुकीच्या कल्पनांमुळे अपमानाचे अनेक प्रसंग सहन करावे लागले. या अपमानामुळे तळमळत असलेल्या त्यांच्या मनावर दोन शिक्षकांच्या वागणुकीमुळे जणू फुंकर घातली गेली. बाबासाहेब मोठ्या जिद्दीचे होते. एके दिवशी खूप पाऊस पडत असताना ते जिद्दीने शाळेत जाण्यास निघाले आणि अर्थातच शाळेत जाईतोपर्यंत पूर्णपणे भिजून गेले. शाळेत गेल्यावर तिथे पेंडसे नावाच्या त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्याची मायेने विचारपूस केली. भीमराव पूर्णपणे भिजून आला आहे हे लक्षात घेऊन पेंडसे गुरुजींनी आपल्या मुलाबरोबर भीमरावाला स्वतःच्या घरी पाठवले. त्याला आंघोळीला गरम पाणी देण्याची व्यवस्था केली आणि त्याला कोरडे कपडेही दिले. बाबासाहेबांच्या मनात हा प्रसंग कोरला गेला.
याच माध्यमिक शाळेत आंबेडकर नावाचे दुसरे एक शिक्षक होते त्यांचे देखील भीमरावावर खूप प्रेम होते. त्यांनी भीमरावाचे आंबावडेकर हे नाव बदलून स्वतःचे आंबेडकर हे नाव दिले. तशी कागदोपत्री नोंद केली. आंबेडकर गुरुजींना आपल्या वृद्धावस्थेतदेखील आपल्या प्रिय विद्यार्थ्याचा विसर पडला नाही.बाबासाहेब ज्यावेळी गोलमेज परिषदेसाठी जाण्यास निघाले तेव्हा या आंबेडकर गुरुजींनी बाबासाहेबांना एक पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. हे आंबेडकर गुरुजी मुंबईला एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटावयास गेले. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गुरुजींना नम्रपणे नमस्कार केला. तसेच पोशाख देऊन त्यांचा योग्य सन्मान केला.
पुढे बाबासाहेब जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत होते तेंव्हा प्रा. एडविन कॅनन हे त्यांचे मार्गदर्शक होते. बाबासाहेबांनी स्वतःच्या अभ्यासाच्या आधारावर थोर अर्थशास्त्रज्ञ केन्स याच्या मतांवर आपल्या प्रबंधात " द प्रॉब्लेम ऑफ रुपी" या प्रबंधात टीका केली. ही टीका प्राध्यापक यांना कॅनन यांना मान्य नसल्याचे त्यांनी लिहिले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूलगामी विचार करण्याच्या क्षमतेचे कौतुकदेखील केले. या प्रसंगातून बाबासाहेबांचा आपल्या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांवर ठाम राहण्याचा स्वभाव जसा दिसून येतो तसाच प्रा.कॅनन यांचा मनमोकळेपणा आणि त्यांची गुणग्राहकता दिसून येते.
या सर्वांना विनम्र अभिवादन...
संदर्भ
" डॉ.बाबासाहेब आंबेडकर " ले.धनंजय कीर
" सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ.आंबेडकर " ले. द.बा.ठेंगडी
छायाचित्र Wikipedia - लंडन स्कुल ऑफ इकॉनिमिक्समधील
Comments
Post a Comment