थोडी धडपड तहानलेल्यांसाठी...

 

एप्रिल २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या म.ए.सो.संस्थेच्या पुण्यातील शाखांनी दुष्काळ निवारण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम ठरवला. आमच्या गरवारे महाविद्यालयानेदेखील त्यात सहभाग घेतला.
तो आठवडाभर आम्ही सगळे त्या धावपळीत होतो. रस्त्यावर स्टॉल लावणे, पत्रके वाटणे, कॉलेजमध्ये वैयक्तिक भेटून, बैठकांमध्ये आवाहन करणे असे वेगवेगळया पद्धतीने प्रयत्न केले गेले.अनेकजण यामध्ये सहभागी झाले.रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांनी निधी कलशात टाकलेल्या पैशांपासून अनेकांनी आपणहून दिलेल्या रोख रकमा आणि धनादेशापर्यंत अनेक मार्गांनी निधी गोळा झाला. अनेक नवनवे अनुभव मिळाले.

या आठवड्यातील कौटुंबिक समाधानाचा एक दिवस...
दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलनाचा सप्ताह सुरू झाला. रात्री होस्टेलच्या मुलांबरोबर बसून स्टॉलच्या कामाचे नियोजन केले. जवळपास ६-७ तास त्या कामात गेले. या कामात नियोजनापासून ते स्टॉलच्या कामात माझी पत्नी सौ.शैलजा आणि मुलगा शंतनू यांचा सक्रीय सहभाग होता. स्टॉलच्या कामात तर त्यांनी भाग घेतलाच पण त्याचबरोबर दोघांनीही आपापल्या पैशातून दुष्काळग्रस्त मदतनिधीला पैसे दिले. शंतनूने तर आपल्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातून मदत केली. ह्यामुळे एका चांगल्या कामात भाग घेतल्याचे कौटुंबिक समाधान मिळाले. आणि अजून काम करत राहण्यासाठी हुरूप वाढला.

                                ( उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.एन.एस.उमराणी)
अनेक नवनवे अनुभव......
रस्त्यावरून जाणाऱ्या विवाहित तरुणीने आपल्या पर्समधील पैसे काढून दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर दिसलेले अतीव समाधानाचे भाव,
काही दिवसांपूर्वीच जनकल्याण समितीला याच कामासाठी काही लाख रुपये ज्यांनी दिले ते प्रसिद्ध ऍड एस.के. जैन स्टॉल बघून थांबले आणि काही न देता तसेच पुढे जायचं नाही म्हणून त्यांनी कर्तव्यभावनेतून निधीकलशात टाकलेले पैसे,
                                                       ( ऍड एस.के. जैन यांची भेट  )

निवृत्त शिक्षक असणाऱ्या वयोवृद्ध दाबके सरांनी कर्तव्य भावनेतून स्वतःहून आणून दिलेला धनादेश,
अन्य सामाजिक संस्थांना या कामासाठी आधी मदत केली असतानादेखील या आवाहनाला प्रतिसाद देऊन परत निधी देणारे सहकारी प्राध्यापक तसेच कर्मचारी बंधू भगिनी,
आवाहनाला प्रतिसाद म्हणून निधी देणाऱ्या मा. प्राचार्य गुप्ता सरांपासून ते अन्य सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी,विद्यार्थी मित्रमैत्रिणी,
सामाजिक कर्तव्य भावनेतून निधी दिला म्हणून माझे आभार मानण्याची आवश्यकता नाही असे आग्रहाने सांगणारे सहकारी प्राध्यापक बंधू
स्टॉलवर वर आल्यावर खिशात पुरेसे पैसे किंवा धनादेश नाही हे लक्षात आल्यावर लगबगीने जवळच्या ATM मध्ये जाऊन आणलेले पैसे देणारे ससून हॉस्पिटलचे डॉ.डॅनियल,
"एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याला मदत" असं म्हणत निधी देणारे कॉलेजच्या नोकरीबरोबरच गावाकडे ऊसबागायत करणारे सहकारी प्राध्यापक बंधू ,
स्टॉलवर सर्व कामे करणारी मुलेमुली यांचे मनापासूनचे प्रयत्न
असे अनेकानेक क्षण या आठवड्यात अनुभवले. यातून सामाजिक ऋणातून उतराई होण्याची सर्वांची भावना तर मला कळालीच पण ह्यासारख्या क्षणांमुळे माझा आठवडा अधिक चांगला गेला.
या सगळ्या खटाटोपातून जमा झालेला रूपये १,७५,००० पेक्षा जास्त निधी जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त करण्यात आला.


सुधीर गाडे पुणे 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख