राजर्षी शाहू आणि स्ट्युअर्ट मिटफोर्ड फ्रेजर
राजर्षी शाहू आणि स्ट्युअर्ट मिटफोर्ड फ्रेजर
महान व्यक्ती या स्वयंभू असतात अनेक गुण त्यांना जन्मतः प्राप्त झालेले असतात. पण तरीही असे आढळते की त्यांच्या जीवन प्रवासात काही व्यक्ती त्यांच्यावर विलक्षण परिणाम करून जातात.असेच आढळते ते राजर्षी शाहू महाराज आणि त्यांना गुरूतुल्य असणारे स्ट्युअर्ट मिटफोर्ड फ्रेजर.
फ्रेजर हे ब्रिटीश प्रशासनात ICS अधिकारी होते. त्यांनी नासिक येथे उपजिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी म्हणून काम केलेले होते.१८८९ मध्ये त्यांची राजर्षी शाहू यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी नेमणूक झाली.तिथून पुढे या दोघांचा स्नेहसंबंध वृद्धिंगत होत गेला.
१८८६ ते १८८९ या काळात राजर्षी शाहू यांचे शिक्षण राजकोट येथे झाले. तिथे ब्रिटीश सरकारने भारतीय संस्थानिकांच्या मुलांसाठी विशेष महाविद्यालय काढले होते. त्यात शाहूंचे शिक्षण झाले होते. परंतु नंतर शाहूंच्या शिक्षणाची वेगळी व्यवस्था करण्याचा निर्णय झाला.तेंव्हा फ्रेजर शाहूंच्या आयुष्यात आले.
१८८९ पासून पुढे काही वर्षे राजर्षी शाहू, त्यांचे बंधू बापूसाहेब, भावनगरचे भाऊसिंगजी महाराज आणि अन्य काही जणांची शिक्षणाची व्यवस्था धारवाड येथे करण्यात आली. फ्रेजर यांनी स्वतः बारकाईने लक्ष देऊन ही व्यवस्था निर्माण केली. त्यांनी शाहू, त्यांचे बंधू बापूसाहेब, भावनगरचे भाऊसिंगजी आणि इतरांच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक, अगत्याने लक्ष दिले. धारवाड येथील औपचारिक शिक्षणाबरोबरच फ्रेजर यांनी " केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार " ही गोष्ट लक्षात ठेवून राजर्षी शाहू आणि इतरांना भारतभ्रमण घडवून आणले. या यात्रेत शाहूंना इतिहास, भूगोल, लोकजीवन यांची माहिती मिळाली.
राजर्षी शाहू यांच्या राजकोट विद्यालयातील दिवसांपासून कृष्णाजी भिकाजी गोखले यांनी त्यांच्या शिक्षकाचे काम केले.नंतर धारवाड येथे त्यांच्याबरोबर हरिपंत गोखले हेदेखील शिक्षक होते. कृष्णाजी भिकाजी गोखले यांच्या शिकवणुकीने शाहूंच्या मनावर वेगवेगळे संस्कार झाले.कृष्णाजी भिकाजी गोखले यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याजागी रघुनाथ व्यंकोजी सबनीस यांची नेमणूक झाली.
फ्रेजर यांच्या सहवासात राज्यकारभार, प्रशासन यांचे ज्ञान राजर्षी शाहूंना झाले. त्याबरोबर राज्यकारभाराच्या आधुनिक तंत्र, कल्पना यांचा परिचयदेखील त्यांना झाला. फ्रेजर यांनी महात्मा फुले यांचे सहकारी परमानंद यांच्या " Letters to an Indian Raja " या पुस्तकाचे आवर्जून वाचन शाहूंच्याकडून करून घेतले.शाहूंचे मूळचे विशाल असलेलं मन आपल्या अधिकारांचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी कसा करता येईल याचा सतत विचार करू लागले आणि नवनवीन कल्पना, योजना यातून ते प्रत्यक्षात यावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. सामाजिक न्यायचा गंगौघ भारतात सुरू झाला आणि वंचितांच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस येण्यास सुरूवात झाली.
"अंतरीची खूण अंतरी पटल्याने " राजर्षी शाहू आणि फ्रेजर यांचे नाते गुरू शिष्यांसारखे झाले. आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगी राजर्षी शाहू यांना पत्रे पाठवली, त्यांच्याशी विचारविनिमय केला.
या सर्वांना विनम्र अभिवादन.....
👍👍👍
ReplyDelete🙏🙏
Delete