अक्षरधाम मंदीर दिल्ली
ऑक्टोबर २०१७ मध्ये दिल्लीला गेल्यावर आवर्जून भेट दिली ती अक्षरधाम मंदिराला. दुपारी एकच्या सुमारास मंदिरात पोचलो. सुट्टीचा वार नसतानाही मंदिरात चांगली गर्दी होती.आत जाताना मोबाइल, पुस्तक इ.सर्व साहित्य जमा केलं. विशेषतः मोबाइल जमा केल्यामुळे आता एका नव्या अनुभवाचा निर्विघ्न आनंद घेता येणार होता.या आंनदानुभवाचं हे वर्णन.
१०० एकर परिसरात हजारो कारागिरांनी काही वर्षे खपून भारतीय संस्कृतीचे हे मनोहर शिल्प उभं केलं आहे.ते बघताना काही किलोमीटर पायपीट ही होतेच.त्यात आनंद आहे.( ज्यांना चालण्याची अडचण आहे त्यांच्यासाठी चाकाची खुर्ची उपलब्ध करून दिली जाते.ढकलणारे खंबीर लोक बरोबर हवेत.
आवश्यक अशा सुरक्षातपासणीतून आत गेल्यावर काय बघू आणि काय नको असं वाटेल इतकं आत बघण्यासारखं आहे.तिथल्या छोट्या माहितीपत्रकात दिल्याप्रमाणे जायचं तर सुरुवातीला दहा दिशांची प्रतीकं म्हणून दशद्वार आहेत.त्या कमानीसारख्या दारांवरून पाणी सारखं खाली पडत असतं. जणू त्या दारांवर पारदर्शक पडदाच लावला आहे.पुढे गेल्यावर भक्तीद्वार आहे.हिंदू तत्वज्ञानानुसार ज्ञान, कर्म आणि भक्ती हे तीन मार्ग मुक्तीसाठी सांगितले आहेत.पैकी कलियुगात भक्तीचे विशेष महत्त्व संतमहात्म्यांनी सांगितले आहे.त्या भक्तीचे हे प्रतीक. त्याच्यापुढे येतं ते श्रीहरीचरणारविंद. ज्या स्वामींनारायणांचं नाव या संप्रदायाला दिलं आहे त्यांच्या चरणकमलांची ही कुंडात असलेली प्रतिकृती. तिच्यावर सतत जलाभिषेक चालू असतो.त्यानंतर येतं ते मयूरद्वार. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याच्या नृत्य करणाऱ्या ८५० हून अधिक मूर्ती याठिकाणी आहेत. यानंतर प्रवेश करायचा तो भव्य मुख्य मंदिरात. तिथे भगवान स्वामीनारायण यांची भव्य सोनेरी मूर्ती डोळ्याचं पारणं फेडते.या संप्रदायाची धुरा आजपर्यंत ज्यांनी वाहिली त्यांच्यादेखील मूर्ती मुख्य मूर्तीसमोर पूजा करताना दाखवल्या आहेत.या मंदिराच्या खांबांवर, छतावर पारंपरिक भारतीय कलाकुसरीचा उत्तम आविष्कार पहायला मिळतो.मंदिराच्या भिंतींवर भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनातील काही प्रसंग भव्य चित्रांद्वारे दाखवले आहेत.याच मंदिरात स्वामीनारायण यांच्या वापरातील काही वस्तू ठेवलेल्या आहेत. मुख्य मंदिरातील दर्शन पूर्ण झालं की पायऱ्या उतरून मंदिराला प्रदक्षिणा घालायला सुरूवात करायची.हे मुख्य मंदीर ज्या चौथऱ्यावर आहे त्याला नाव दिलं आहे गजेंद्रपीठ. गुलाबी रंगांच्या दगडांमध्ये हत्तीच्या लहान मोठया अशा शेकडो मूर्ती कोरल्या आहेत.या मूर्तींच्याद्वारे हत्तीचं आणि इतर प्राण्यांचं, माणसाचं आणि हत्तीचं नातं दाखवलं आहे, समुद्रमंथन,गजेंद्रमोक्षासारख्या काही पौराणिक गोष्टीही दाखवल्या आहेत तर शहाजीराजांनी तुळापूरला केलेल्या हत्तीच्या वजनाची ऐतिहासिक गोष्टदेखील दाखवली आहे. हा चौथरा एका विशाल अशा कुंडावर आहे.या कुंडात परमेश्वराच्या १०८ नावाचं प्रतीक असणाऱ्या १०८ गोमुखातून पाण्याची संततधार पडत असते. ह्या मंदिराचे कुंड आणि बाजूला असलेल्या प्रदर्शनींच्या जागेमध्ये आहे दहा विशाल पाकळ्यांचं "योगीहृदयकमल". याच्या तळाशी लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोक्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. हे योगीहृदयकमल ओलांडून प्रदर्शनांच्या विभागात जाता येतं. प्रदर्शनांच्या या विभागात "सहजआनंद", "नीलकंठदर्शन", "संस्कृती दर्शन" अशी एकाहून एक सुंदर प्रदर्शनं आहेत. "सहजआनंद" प्रदर्शनामध्ये भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनातील काही प्रसंग हलत्या मूर्तींद्वारे हुबेहुबपणे दाखवले आहेत.( हे पाहताना गणेशोत्सवातील देखाव्यांची आठवण येत राहते.) या प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दगडी शिळेतून स्वतःच स्वतःला घडवणारा माणूस दाखवून " स्वतःच घडवत स्वतःच मूर्ती होणे" हा संदेश दिला आहे. तो मनावर चांगलाच ठसतो.प्रदर्शनाच्या एक विभागातून दुसऱ्या विभागात गटागटाने जाताना आता पुढे काय बघायला मिळणार याची उत्सुकता आपल्याला पुढे पुढे नेत राहते.भगवान स्वामीनारायण गुरू रामानंद यांच्याकडे स्थिरावले तेव्हाच्या प्रसंगांच्या विभागात बंदिस्त जागेत आकाशाचा अनुभव मनावर विशेष कोरला जातो. सहज आनंद ह्या प्रदर्शनानंतर अतिभव्य अशा पडद्यावर भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनावरील चित्रपट पहायला मिळतो.याचा पडदा भव्य चित्रपटगृहातील पडद्याच्या जवळपास दुप्पट आकाराचा आहे.हा चित्रपट एक सर्वांगसुंदर असा अनुभव देऊन जातो.चित्रीकरणदेखील अतिशय जिवंत पद्धतीने केले आहे.उदाहरण म्हणून सांगायचं तर या चित्रपटात बाल नीलकंठ( भगवान स्वामीनारायण यांचं परिक्रमा कालावधीतील नाव) जेव्हा गृहत्याग करून फुफाटत वाहणाऱ्या नदीतून गटांगळ्या घेत जातो तेव्हा आपणही गटांगळ्या घेत आहोत असं वाटतं. असे अनेक प्रसंग आपल्याला भारावून टाकतात. ह्या दोन्ही प्रदर्शनातून भगवान स्वामीनारायण यांच्या साधनेचं, तपश्चर्येचे, महात्म्याचं, करुणेचं दर्शन तर घडतंच पण त्याचबरोबर ही परंपरा आजदेखील कशी चालू आहे हे देखील बघायला मिळतं. यानंतर "संस्कृती दर्शन" हे प्रदर्शन. हजारो वर्षे प्राचीन असणाऱ्या भारतीय परंपरेतील ज्ञान, तत्वज्ञान, कला, शिल्प, वैद्यक, विज्ञान, लोकजीवन, संतमहात्मे यांच्या अविरत परंपरेचं अखिल भारतीय दर्शन एका विशाल अशा गुहेतून जाताना बघायला मिळतं.त्यासाठी संपूर्ण गुहेत एक छोटा कालवा केला आहे.त्या कालव्यातून आपण होडीचा आकार दिलेल्या गाडीतून फेरफटका मारतो. हा फेरफटका चालू असताना होडीतील ध्वनिवर्धकावर आजूबाजूला दिसणाऱ्या देखाव्यांची माहिती सांगितली जाते. या प्रदर्शनात आपल्याला भारताच्या सर्व कानाकोपऱ्यातील महान व्यक्तींचं दर्शन घडतं.ही सैर संपवताना या वैभवशाली परंपरेला पुढे नेण्याचं आवाहन कानातून आपल्या मनात पोचतं. परिसरात एक अभिषेक मंदीर देखील आहे.त्यात असणाऱ्या नीलकंठ रूपातील भगवान स्वामीनारायण यांच्या सोन्याच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक करता येतो.त्यानं एक आध्यात्मिक समाधान मनाला मिळतं. दुपारी बघायला सुरुवात केलेली प्रदर्शनत्रयी बघताबघता संध्याकाळ होत आलेली असते.आता उत्सुकता असते ते जलदृकश्राव्य खेळाची ( लेझर वॉटर शोची ). यासाठी विस्तीर्ण असं कुंड केलेलं आहे.त्याच्या चहूबाजूंनी मंदिरांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती आहेत.पायऱ्यापायऱ्यांवर बसण्याची व्यवस्था आहे.वेळेवर उद्घोषणा होते.सुरुवातीला नीलकंठ रुपात असणाऱ्या भव्य पुतळ्याची सुस्वर आरती होते. ही आरती मनात पावित्र्याची भावना जागवते. आणि मग प्रत्यक्ष या खेळाला सुरुवात होते. कठोपनिषदातील वरूण, अग्नी,वायू,सूर्य यांच्या गर्वहरणाच्या एका कथेवर आधारित असा हा खेळ बघताना आपण तल्लीन होऊन जातो. सर्व मंदीर परिसरात स्वच्छता, टापटीप चांगली आहे.खाण्यापिण्याची सोयही चांगली आहे.पण तुलनेने पदार्थांचे दर जास्त वाटतात.या नयनरम्य परिसराची आठवण जागी राहण्यासाठी विविध वस्तूंच्या विक्रीचं एक दुकानही आहे.परिसरात फिरताना अनेक भारतीय भाषा कानावर पडतात.काही परदेशी नागरिकही दिसतात.त्यातल्या कुणी विशेषतः महिलांनी छोटे कपडे घातले असतील तर मंदिराच्या नियमानुसार घ्याव्या लागणाऱ्या लुंग्या त्यांनी गुंडाळलेल्या दिसतात.गजेंद्रपीठावरील मूर्तींना काही ठिकाणी तडे गेले आहेत. ते खटकतं.मोबाईल, कॅमेरा इ काहीच बरोबर नसल्यानं सर्व अनुभव डोळे आणि कानांनी हा उत्कट अनुभव मनात साठवायचा.आठवणीत कायमचा जपून ठेवायचा. जेव्हा जेव्हा पुन्हा स्मरण होईल तेव्हातेव्हा तो मनाच्या कप्प्यातून बाहेर काढायचा आणि त्यात रमायचं. अंधार होता होता मंदीर परिसरातील दिव्यांची रोषणाई सुरू झालेली असते.या प्रकाशात मुख्य मंदिराचे सौंदर्य आणखी वेगळ्या प्रकारे खुलून दिसते. हे रूप साठवत साठवत आपण बाहेर पडतो ते अनुभवाच्या शिदोरीत एका सर्वांगसुंदर, मनोहर अनुभवाची भर पडल्याच्या अतीव समाधानाने. भारताच्या राजधानीत भारताच्या प्राचीन परंपरेचं सर्वांगीण दर्शन घडवणारा हा परिसर आपलीही मान उंचावतो आणि या परंपरेला पुढं चालवण्याचा जबाबदारीचं भानही देतो.
Comments
Post a Comment